ईव्हीएमची पूजा करणे भोवले; रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल | पुढारी

ईव्हीएमची पूजा करणे भोवले; रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तिसर्‍या टप्प्यातील मतदान राज्यभरात आज पार पडत असताना बारामती लोकसभेसाठी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर धायरी परिसरात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएमची पूजा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात भरारी पथकाचे डॉ. अनुराग राजेशकुमार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुणे पोलिसांनी भादंवी कलम 188,186, लोकप्रतिनिधी अधिनियम 131, 132 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. धायरी परिसरात त्या राहण्यास आहेत. दरम्यान, आज सकाळी बारामती लोकसभेसाठी मतदान पार पडले. त्यात पुणे शहरातील धायरी, नर्‍हे कात्रज व वारजे असा परिसर येतो.

शहरात 127 केंद्रे होती. त्यात 618 बूथवर मतदान पार पडले. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी धायरी येथील एका मतदान केंद्रावर सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी ईव्हीएम मशिनची पूजा केल्याचे समोर आले. यामुळे मोठा गोंधळ उडाला. पुरोगामी पुण्यात असे प्रकार घडल्यानंतर मतदार आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

Back to top button