Life insurance : मॅच्युरिटीनंतर दावा करताना… | पुढारी

Life insurance : मॅच्युरिटीनंतर दावा करताना...

राधिका बिवलकर

जीवन विमा पॉलिसी (Life insurance) परिपक्व झाल्यानंतर संबंधित कागदपत्रांची आणि माहितीची पूर्तता केल्यानंतर, जीवन विमा पॉलिसी कंपनी विमाकर्त्याच्या खात्यात पैसा जमा करते. विमाधारक जिवंत असल्यास विम्यावर दावा करणे सोयीचे आहे. मात्र, तो हयात नसेल तर वारसदारास दाव्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे जमा करावी लागतात.

जीवन विमा पॉलिसी (Life insurance) अनेकांना परिपक्व झाल्याचे ठाऊकदेखील नसते. म्हणूनच आपल्याकडील सर्व विमा पॉलिसी आणि अन्य गुंतवणुकीबाबतची माहिती कुटुंबीयांना देणे आवश्यक आहे. पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर दावा कसा करता येईल, हे पाहू.

एन्डोन्मेंट पॉलिसीत मिळतो पैसा : जीवन विम्याच्या (Life insurance) केवळ एन्डोन्मेंट पॉलिसीतच बचतीचा मुद्दा असतो. टर्म पॉलिसीत बचतीचा विषय नसतो. याचा अर्थ टर्म पॉलिसी खरेदी केली असेल, तर त्याच्या मॅच्युरिटीनंतरही विमा कंपनीकडून एक रुपयाही मिळत नाही. आपण एन्डोन्मेंट पॉलिसी खरेदी केली असेल, तर पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर कंपनीकडून मॅच्युरिटीची रक्कम मिळेल.

विमा कंपनीकडून पत्र : एलआयसी (LIC) आपल्या पॉलिसीधारकांना मॅच्युरिटीच्या किमान दोन महिने अगोदर पत्र पाठविते. या माध्यमातून मॅच्युरिटीची तारीख आणि रकमेची माहिती दिली जाते. मॅच्युरिटीच्या दिवशीच पॉलिसीधारकाच्या हाती रक्कम पडावी यासाठी जीवन विमा कंपनी प्रयत्नशील असते. एवढेच नाही, तर एलआयसीकडून ग्राहकांना ऑनलाईन दावा करण्याचीदेखील सुविधा देण्यात आली आहे. विमाधारकाला दाव्याचा अर्ज भरताना पॉलिसी डॉक्युमेंट, आयडी आणि बँक विवरण द्यावे लागते. त्यानंतरच दाव्याची प्रक्रिया सुरू होते आणि काही दिवसांतच पैसे बँकेत जमा होतात.

दाव्याच्या अर्जात महत्त्वपूर्ण माहितीचा उल्लेख : जीवन विमा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला असेल, तर दावा करणार्‍यांना प्रामुख्याने वारसदारांना फॉर्म ए भरावा लागतो. यात पॉलिसीधारकांचे विवरण असते. दावा करणार्‍यांनादेखील स्वत:ची माहिती भरावी लागते. दाव्याच्या अर्जासमवेत पॉलिसीधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे लागते. मूळ पॉलिसीचे कागदपत्रेदेखील द्यावी लागतात.

पॉलिसी सुरू झाल्यानंतर तीन वर्षांत मृत्यू झाल्यास : पॉलिसी खरेदी केल्यानंतर तीन वर्षांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्यासाठी वारसदाराला फॉर्म बी भरावा लागतो. पॉलिसीधारकावर उपचार करणार्‍या डॉक्टराचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास फॉर्म बी-1 चा वापर करावा लागतो. ‘क्लेम सी’मध्ये विमाधारकाची ओळख आणि अंत्यविधीचे प्रमाणपत्र जोडावे लागते.

‘एनईएफटी’ची वेळेत नोंद करा : एलआयसीचा विमा हप्ता ऑनलाईन भरण्याची सुविधा लोकप्रिय आहे. याशिवाय दाव्याची रक्कम कोणत्या खात्यात जमा करावी, याची नोंद करण्याची सुविधादेखील ऑनलाईनवर देण्यात आली आहे. विमाधारकाने विमा पॉलिसीच्या काळातच बँक खात्याचे विवरण नमूद केले, तर दाव्याची रक्कम आपोआप खात्यात जमा होते. खाते क्रमांक, आयएफएसजी कोड, एमआयसीआर कोड नमूद करावा लागतो. त्यानंतर कॅन्सल चेक जोडून तो अपलोड करावा लागेल. एलआयसीकडून खात्याची खातरजमा झाल्यानंतर ते खाते विमा पॉलिसीला जोडले जाते.

हेही वाचा :

Back to top button