कीर्तन-प्रवचन परंपरेचा सूर हरपला! | पुढारी

कीर्तन-प्रवचन परंपरेचा सूर हरपला!

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, संत साहित्याचे अभ्यासक

‘कीर्तनाची गोडी देव निवडी आपण’ या संतवचनाप्रमाणे ज्यांनी कीर्तनाची गोडी निवडली आणि ती शेवटच्या श्वासापर्यंत कायम राखली असे बाबामहाराज सातारकर म्हणजे वारकरी संप्रदायी कीर्तनाचा जणू आदर्श वस्तुपाठच होते. भावार्थ आणि निरूपण यांच्या सूत्रात ते पारंपरिक चालींची फुले गुंफायचे. राज्यात, देशात आणि परदेशातही वारकरी कीर्तन सर्वतोमुखी करण्यात बाबामहाराजांचे मोलाचे योगदान आहे.

‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी’ संपूर्ण महाराष्ट्रातील हरिनाम कीर्तन सप्ताह ज्यांच्या सुमधूर वाणीने वाजत-गाजत राहतात, ज्यांची ‘संपूर्ण हरिपाठ’ ही कॅसेट गावोगाव लावली जाते अशा कर्णमधूर वाणीचे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण बाबामहाराज सातारकर, म्हणजेच नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे नेरूळ येथे वैकुंठवासी झाले. ‘मागे वाढ वेळ झाला उभा पांडुरंग’ अशा स्थितीतच बाबामहाराज वैकुंठवासी झाले. ‘कीर्तनाची गोडी देव निवडी आपण’ या संतवचनाप्रमाणे ज्यांनी कीर्तनाची गोडी निवडली आणि ती शेवटच्या श्वासापर्यंत कायम राखली असे बाबामहाराज म्हणजे वारकरी संप्रदायी कीर्तनाचा जणू आदर्श वस्तुपाठच होते. भावार्थ आणि निरूपण यांच्या सूत्रात ते पारंपरिक चालींची फुले गुंफायचे. हरिभक्त परायण धुंडामहाराज देगलूरकर, हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकारांसारखी बाबामहाराज यांनी कीर्तनाची परंपरा राखली. ‘पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी’ हा संकल्प बाबामहाराजांनी सिद्धीस नेला. पंढरीच्या वारीत शिष्य संप्रदाय निर्माण केला.

बाबामहाराजांना कीर्तन-प्रवचनाची दीक्षा त्यांच्या घरातूनच मिळाली. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 चा. त्यांच्या घरात सुमारे 135 वर्षांपासूनची वारकरी संप्रदायाची परंपरा सुरू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संतवाङ्मयाची विशेष आवड होती. त्यांनी परमार्थाचे धडे गिरवले ते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज या चुलत्यांकडून. वयाच्या आठव्या वर्षांपासूनच ते सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. बाबामहाराजांनी अगदी लहान वयातच शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. प्रसिद्ध गायक गजाननबुवा पुरोहित आणि आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू झाले होते.

संबंधित बातम्या

बाबामहाराजांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले; मात्र इंग्रजी माध्यमात शिक्षण झाले, तरी घरातला वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा त्यांनी टाकला नाही. उलट शेवटपर्यंत त्यांनी तो निभावला. वयाच्या 12 व्या वर्षापासून बाबामहाराजांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली होती. वडिलांकडून त्यांनी वादनाचेही शिक्षण घेतलेले होते. त्यामुळे त्यांना लय-तालाचे नेमके भान होते. भारतीय संगीताचे संशोधक-अभ्यासक असलेल्या डॉ. अशोक रानडे यांना बाबामहाराजांच्या याच गुणांनी भुरळ घातली आणि त्यांनी त्यांची मुंबई दूरदर्शनवरील प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात मुलाखत घेतली. त्याशिवाय विविध दूरचित्रवाणी वाहिन्या, तसेच मुंबई दूरदर्शनवर त्यांच्या ‘कैवल्याचा पुतळा’, ‘ज्ञानाची दिवाळी’, ‘तुका झालासे कळस’ अशा अनेक प्रवचन मालिका सादर झाल्या.

केवळ महाराष्ट्र, भारत एवढ्यापुरतेच त्यांचे कीर्तन-प्रवचन मर्यादित राहिले नाही, तर पार लंडन, अमेरिकेत जाऊन तिथेही त्यांनी रसाळ वाणीत कीर्तन-प्रवचन केले आणि तिथल्याही बांधवांना त्यांनी वारकरी संप्रदायाशी जोडून घेतले. विशेष म्हणजे, केवळ कीर्तन-प्रवचन करून ते थांबले नाहीत. त्यांनी सुमारे 15 लाख व्यक्तींना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली आणि त्यांना व्यसनमुक्त केले. या सामाजिक कामासाठी त्यांनी 1983 मध्ये श्री चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. बाबामहाराजांनी केलेले सांप्रदायिक काम असो किंवा त्यांनी केलेले सामाजिक काम असो, त्याची दखल घेऊन शासनाबरोबरच इतरही अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला. बाबामहाराजांचा जीव खर्‍या अर्थाने रमायचा तो कीर्तन-प्रवचनातच. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाच्या कीर्तन-प्रवचन परंपरेचा सूरच जणू हरपलाय!

Back to top button