लवंगी मिरची : काय काय करणार आहात? | पुढारी

लवंगी मिरची : काय काय करणार आहात?

अहो परवा तुमच्या नावाचे स्टेडियम असलेल्या गुजरातमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला वाटेल तसे नाचायला लावले. नवरात्रीला सुरुवात झाली आणि अचानक सर्वांना गरब्याची आठवण झाली. गुजरातचा गरबा आता देशभर खेळला जात आहे. महाराष्ट्राच्या नागरी भागातसुद्धा गरब्यामध्ये कसा नाच करायचा, याचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था उभ्या राहिल्या आहेत. अनेक युवक-युवती गरबा डान्स ट्रेनिंग घेऊनच मैदानात उतरत आहेत. पण हे काय मोदीजी? राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर इतके व्यस्त असताना तुम्हाला गरबासाठी गीत लिहिण्याला वेळ तरी कसा मिळाला? तुमचा दिनक्रम पाहिल्यानंतर आम्ही चाट पडतो की, हा माणूस कसे हे सगळे मॅनेज करत असेल? गरबा गीत लिहिण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.

गेला महिनाभर तुम्ही त्या कॅनडाच्या ट्रुडोला पाहिजे तसे नाचवले आहे. त्याने आधी तुमचा निषेध केला. त्याला वाटले की, हा पूर्वीचाच भारत आहे म्हणजे कुठलीही ठाम भूमिका न घेणारा. म्हणजे पूर्वीचा भारत बर्‍याचदा भूमिका घेताना इतका वेळ लागत असे की, त्यासंबंधीची उत्सुकता पूर्ण संपलेली असे. आपल्या देशाकडून प्रतिक्रियाच दिली जात नसे. पण तुमचे सगळे काही अजबच आहे. ट्रुडोवर आरोप केल्याबरोबर तुम्ही तत्काळ दुसर्‍या दिवशी त्याला कडक शब्दात उत्तर दिले आणि त्याचे दूतावासातील कर्मचार्‍यांना तत्काळ देश सोडण्याचे आदेश दिले. एवढेच नाही, तर चक्क पुढच्या 24 तासांत कॅनडाच्या व्हिसाची प्रक्रिया पूर्ण थांबवलीत. असे काही होईल याची कल्पना नसलेला तो पंतप्रधान शेवटी मागे हटला आणि आपल्याला भारताबरोबर संबंध चांगले करायचे आहेत, असे म्हणू लागला.

आता त्या एवढ्या मोठ्या देशाच्या पंतप्रधानाला पाहिजे तसे गरबा खेळायला लावून तुमचे समाधान झालेच नाही म्हणून तुम्ही गरबा गीत लिहिलेत. आम्ही म्हणतो काय गरज होती एवढ्या गडबडीत, एवढ्या धावपळीत गीत लिहिण्याची? लोक आहेत ना ते लिहायला. म्हणजे बघा, महाराष्ट्रापुरता विचार केला तर नुसता आवाज दिला तरी पाच-पन्नास कवी येतील आणि प्रत्येकी दहा रचना संध्याकाळपर्यंत तयार करून देतील. हो, म्हणजे पाचशे गरबा गीते काही तासांत लोकांनी लिहून दिली असती. म्हणून आम्ही म्हणतो की, तुम्ही कशाला लिहीत बसलात? लोकांना ती कामे करू द्या ना?

संबंधित बातम्या

आता दुसरे म्हणजे शेजारी पाकिस्तान. त्याला तर नेमके कोणत्या गाण्यावर नाच करावा, त्याचा ताल कसा असावा हेपण कळेनासे झाले आहे. इतकी दुर्दशा तुम्ही त्या देशाची केली आहे. त्या देशाकडे कोणी पाहायलापण तयार नाही आणि त्याच्याशी कोणी बोलायलापण तयार नाही. मोदीजी, शेजारधर्म म्हणून काही असतो की नाही? जाऊ द्या ना. किती मारणार आहात त्या पाकिस्तानला?

हमास आणि इस्रायलचे युद्ध सुरू झाले. अवघ्या 72 तासांत तुम्ही इस्रायलच्या बाजूने समर्थपणे उभे राहिलात. तुम्ही सोबत असल्यामुळे इस्रायल आत्मविश्वासाने या संकटाला सामोरे जात आहे. आपल्या देशाच्या विरुद्ध कारवाया करणार्‍या अतिरेक्यांना मारणारी अज्ञात शक्ती म्हणजे मोसाद तर नाही ना? कारण हो, ती शक्यता तर होतीच. युद्धामध्ये इस्रायलला सक्रिय मदत करायची आणि त्या बदल्यात इस्रायलने अज्ञात शक्ती होऊन विविध देशांमधून आपल्या भारताविरुद्ध कार्यरत असणार्‍या शत्रूंच्याविरुद्ध छुप्या कारवाया करायच्या, असे काही ठरले नाही ना? म्हणजे जगाच्या रणांगणात आपलाच देश गरबा खेळतो आहे, मग पुन्हा तुम्हाला गरबासाठी गीत लिहिण्याची काय इच्छा झाली?

Back to top button