लवंगी मिरची : भाऊबंदकी | पुढारी

लवंगी मिरची : भाऊबंदकी

कोणताही पेपर वाचायला सुरुवात केली की, महाराष्ट्रामध्ये एकच नाट्य प्रयोग चालू आहे, असे वाटते मित्रा. म्हणजे बघ त्या नाटकाचे नाव आहे भाऊबंदकी. भावकीवरून भांडण हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. म्हणजे होतं काय की, दोन सख्खे भाऊ असतात. ते दोघे एकमताने मिळून मिसळून राहत, एकत्रित शेती करत असतात. पुढे त्या दोन्ही भावांना आपापली मुले बाळे होतात. लहानपणी ते पण सगळे मिळून मिसळून राहत असतात. दोन्ही भावांची मुले मोठी झाली की, ही मुले एकमेकांची चुलत भावंडे असतात. आजवर खेळीमेळीत चाललेले सगळे भावकीमध्ये रूपांतरित होते आणि भावकी आली की, भांडण आलेच हे ठरलेलेच आहे.

तू म्हणतोस ते बरोबर आहे; पण महाराष्ट्रात अशी कोणती भाऊबंदकी चालू आहे ते तर सांग आधी?
अरे साधी गोष्ट आहे. बारामतीकरांच्या घराण्यात चालू आहे, मुंबई येथील बांद्रा निवासी घराण्यात चालू आहे, परळी निवासी भाऊ-बहिणी मध्ये अर्थात चुलत भाऊ-बहिणीमध्ये भावकीचाच वाद सुरू आहे. असेच भावकीचे वाद प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू असतात. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण रंगतदार होत असते.

अच्छा म्हणजे, म्हणून महाराष्ट्रामध्ये या प्रश्न- उत्तर सभा सुरू आहेत तर? म्हणजे एका भावाने किंवा काकांनी विशिष्ट भागांमध्ये जाऊन काही प्रश्न उभे केले की, पाठोपाठ चुलत भाऊ किंवा चक्क पुतण्या त्याच गावात जाऊन त्या प्रश्नांची उत्तरे देतो.

संबंधित बातम्या

हे बघ हे एवढे साधे कळत नसेल, तर तू राजकारणाच्या भानगडीत पडू नकोस. ते भले मोठे हार, जेसीबीमधून उधळली जाणारी फुले, ते बँडवाले ते हारतुरे हे सगळे नेत्याच्या जवळचे जे लाभार्थी असतात त्यांनी मॅनेज केलेले असते. नेता मोठा झाल्याशिवाय कार्यकर्त्याला त्याचा काही लाभ होत नाही, त्यामुळे जवळचे कार्यकर्ते संपूर्ण ताकद लावून नेत्याचे जोरदार स्वागत करतात आणि आपल्यासारखे खुळे लोक टीव्हीवर ते पाहत बसतात. या सर्व प्रकारांमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरे कुठेच नसतात. प्रश्नही त्यांचेच आणि उत्तरेही त्यांचीच. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण इथून पुढे रंगतदार होत जाणार हे नक्की.

नक्कीच होणार आहे. परवापर्यंत थोरल्या साहेबांसाठी जीव देण्याची भाषा करणारे लोक आज थेट थोरल्या साहेबांना सोडून धाकल्या साहेबांकडे जाऊन त्यांच्यासाठी जीव देण्याची भाषा करत आहेत. या सगळ्या प्रकारांमध्ये आपला म्हणजे सामान्य जनतेचा जीव मेटाकुटीला आला आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही, हे त्यांचे नाही आपले दुर्दैव आहे. तरी पण एवढ्या गदारोळात ठाणेकर मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. शासनाकडे चकरा मारून थकलेल्या लोकांना शासन आपल्या दाराशी आल्याचा आनंद नक्कीच होत असतो. परवाच्या परभणीच्या सभेचे म्हणजे, शासकीय कार्यक्रमाचे उदाहरण घे. मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन सहकारी यांच्या पक्षाचा तिथे आमदार किंवा खासदार नाही तरीही परभणी जिल्ह्याचा विकास करण्याचे आश्वासन या तिघांनीही तेथील जनतेला दिले. एक लाख समस्या असलेल्या गावामधील जनतेला आता आपल्यासाठी कोणी काही करेल याविषयी अजिबात विश्वास राहिलेला नसतो. तेव्हा प्रशासन गतिमान करण्याबरोबरच गतिमान विकासावर भर दिला तरच राज्याचे काही भले होणार आहे. भावकी चालू द्या, भाऊबंदकी असू द्या, कोणाचा कोणाला मेळ नसू द्या; पण फक्त विकासाचे चाक राजकारणाच्या चिखलात अडकू देऊ नका म्हणजे झाले.

Back to top button