आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने! | पुढारी

आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने!

प्रा. डॉ. विजय ककडे

राजकीय स्वातंत्र्य हा अत्यंत महत्त्वाचा आणि मानवी विकासातील जसा महत्त्वाचा टप्पा ठरतो, त्याप्रमाणे आर्थिक स्वातंत्र्य अथवा अर्थस्वावलंबन व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर महत्त्वाचे ठरते. जीवन जगण्यासाठी आवश्यक असणार्‍या खर्चाची शाश्वत व्यवस्था करणे जेव्हा शक्य होते, तेव्हा हा आर्थिक स्वावलंबनाचा टप्पा गाठला जातो. यासाठी अर्थसाक्षरता, वित्त नियोजन महत्त्वाचे ठरते.

केवळ उत्पन्न मिळवणे, कष्ट करणे व मिळवलेल्या उत्पन्नाच्या पुरेशा बचतीतून गुंतवणूक न करणे यातून आर्थिक गुलामी वाट्याला येते. विशेषतः, आयुष्याच्या उत्तरार्धात हे अधिक चिंताजनक व त्रासदायक ठरते. हे टाळणे आणि लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य कसे संपादित करू शकू, हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अर्थसाक्षरता समजून घेणे आणि आपली आर्थिक ध्येये निश्चित करून वाटचाल करणे याची गरज प्रत्येकास असते. नव्या तंत्रज्ञानाच्या प्रसारासोबत गुंतवणूक क्षेत्र विस्तारले असून, गुंतवणूक पर्याय आणि सुविधा विस्तारल्या आहेत. साहजिकच, नवे गुंतवणूक कौशल्य संपादन करण्याची गरजही निर्माण झाली आहे. आपल्या आर्थिक कल्याणासाठी विविध वित्तीय साधनांचा कौशल्यपूर्ण वापर करणे म्हणजे, आर्थिक साक्षरता असे म्हणता येईल. यासाठी आर्थिक कल्याण म्हणजेच आपली विविध आर्थिक ध्येये, विविध टप्प्यांवर साध्य करण्यासाठी आवश्यक ज्ञान कौशल्ये वापरून गुंतवणूक निर्णय घेणे, फसवणूक आणि गुंता टाळणे, असा त्याचा अर्थ होतो.

गुंतवणुकीबाबत जोखीम आणि परतावा या दोन बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. संपूर्ण जोखीममुक्त असा गुंतवणुकीचा कोणताही प्रकार नसतो, हे प्रथम लक्षात घेणे आवश्यक ठरते. विशेषतः, तरुण कालखंडात जोखीम व परतावा अधिक असणार्‍या गुंतवणुकीची रचना नंतर कमी जोखीम व वाजवी परतावा, अशी करणे आवश्यक ठरते. विशेषतः, अतिक्षय व अतिलोभ या दोन्हीचा अतिरेक न टाळल्यानेच वित्तीय घोटाळे व नुकसान होते. अतिमोठा परतावा कसा देऊ शकतात, याबाबत स्पष्टीकरण, माहिती न तपासता दरमहा 6 टक्के म्हणजे, वार्षिक 72 टक्के परतावा देणार्‍या योजनेत गुंतवणूक करणारे फसलेले दिसतात. दुसर्‍या बाजूला 4 टक्के परताव्याच्या सुरक्षित गुंतवणूक योजनेत असणारेदेखील नुकसानच करून घेत आहेत. महागाई दर 7 टक्के व परतावा 4 टक्के म्हणजे 3 टक्के उणे परतावा हे नुकसानच आहे.

यासाठी सुरक्षित, रोखता असणारी म्हणजे, पैसे हवे तेव्हा उपलब्ध करून देणारी व महागाईपेक्षा अधिक परतावा देणारी आपली गुंतवणूक हवी, तसे नसल्यास आपली मालमत्ता घसरत असून, आपण नुकसान स्वीकारत आहोत, हे समजणे महत्त्वाचे ठरते. यासाठी तुमची गुंतवणूक रचना तपासणे व आपल्या गरजेनुसार पुनर्रचित करणे आवश्यक ठरते. वित्तीय साक्षरतेचे प्रमाण सर्वच देशांत अल्प असून, आपल्याकडेही ते 24 टक्क्यांपर्यंतच आहे. चक्रवाढ व्याज, महागाईचा परिणाम, पेन्शनची तरतूद, शेअर बाजार याबाबत अज्ञान व गैरसमज असल्याने नुकसानच होते. गुंतवणुकीच्या अधिक चांगल्या, सुरक्षित, लाभकारी योजना असूनही फसव्या योजनेत जाणारे वाढताना दिसतात.

भारतीयांच्या गुंतवणूक रचनेत 50 टक्के गुंतवणूक स्थावर मालमत्तेत म्हणजे प्लॉट, फ्लॅट यामध्ये, तर 18 टक्के सोने व 15 टक्के मुदत ठेवीत दिसते. चलनी किंवा वित्तीय गुंतवणूक अल्प प्रमाणात असल्याने गुंंतवणूक सांभाळणे व गरजेनुसार वापरणे कठीण होते. प्लॉटमधील गुंतवणूक फायद्याची वाटल्याने केली व अल्पकाळात पैशांची गरज भासली, तर प्लॉट विकण्यास अडचण आल्याने वित्तीय संकट येते, यासाठी एकूण गुंतवणुकीपैकी 80 टक्के गुंतवणूक रोखता असणार्‍या मालमत्तेत असणे योग्य ठरते. आर्थिक साक्षरतेच्या प्रसारासाठी रिझर्व्ह बँक, पायाभूत आणि विनियम संस्था (सेबी), ईडी व पेन्शन व्यवस्था पाहणारी पीएफआरडीए या संस्था गेल्या दशकभराहून अधिक काळ प्रयत्नशील आहेत. केवळ वारस नोंद नसल्याने 84 हजार कोटी लोक बेवारस आहेत. यातून आर्थिक निरक्षरता किती नुकसान करते हे स्पष्ट होते.

आर्थिक स्वातंत्र्याची चतुःसूत्री

आर्थिक स्वातंत्र्याच्या ध्येय प्राप्तीसाठी सुरुवात जेवढी लवकर करणे शक्य असेल तेवढी करणे हा महत्त्वाचा गुरुमंत्र वॉरेन बफे यांनी दिला आहे. वयाच्या अकराव्या वर्षापासून गुंतवणुकीस प्रारंभ करणारे वॉरेन बफे जागतिक श्रीमतांच्या यादीत अग्रगण्य आहेत. वित्तीय स्वातंत्र्य म्हणजे, आपल्या उत्पन्नाचा सातत्यपूर्ण, विनासायास मिळणारा भाग हा गुंतवणुकीच्या परताव्यातून येणारा असतो तो आपल्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करेल इतका असणे अभिप्रेत आहे. आपले सक्रिय उत्पन्न हे आपण कष्ट, नोकरी, उद्योग केल्याने मिळते व ते साधारणतः वयाच्या साठीनंतर थांबते.

वाढत्या वयासोबत गुंतवणूक उत्पन्नाची सावली वाढती पाहिजे, हा रॉबर्ट कियासाकीचा संदेश महत्त्वाचा ठरतो. खरे तर पैसा हे साधन असून, उत्तम जीवन जगण्यास तो आवश्यक आहे. तरीही जगण्याचा उद्देश विसरता कामा नये. आपली आवड, क्षमता जोपासण्यासाठी मुक्त जीवन हवे. यासाठी ‘रिटायर अर्ली’ म्हणजे, लवकर सेवानिवृत्ती घेणे होय! येथे सेवानिवृत्ती म्हणजे, काम थांबवणे असे नाही, तर उत्पन्न मिळवण्यास काम करण्याची गरज नाही, असा टप्पा अभिप्रेत आहे. हिच स्वातंत्र्याची चतुःसूत्री जीवन संतुलन दाखवते. त्यासाठी वित्तीय ध्येय निश्चिती व नियोजन अपरिहार्य ठरते!

सावधानता आवश्यक

गुंतवणुकीच्या आकर्षक, सोयीस्कर पर्यायांच्या उपलब्धतेबरोबर अनेक फसव्या योजनांचे मायाजाल वाढत आहे. नव्या तंत्राचा वापर फसवणुकीसाठी अधिक कुशलतेने होत आहे. यामागे सर्वात महत्त्वाचा घटक हा लाभापेक्षा लोभास महत्त्व देण्याच्या मानसिकतेत आहे. अधिक परतावा का व कसा दिला जातो, याची पडताळणी न करता केवळ आश्वासनावरच गुंतवणूक करणारे फसतात. यासाठी प्रथम अतिमोठा परतावा हा फक्त फसवणुकीसाठीच असतो हे पक्के लक्षात घेतले पाहिजे. आर्थिक सल्ला घेताना ती व्यक्ती अथवा संख्या नोंदणीकृत आहे का, हे तपासणे आवश्यक ठरते. आपण वारस नोंद नीट न केल्याने भविष्यकाळात अडचण व नुकसानीस आमंत्रित करतो. यासाठी आर्थिक जागरूकता महत्त्वाची ठरते. केवळ उत्पन्न मिळवण्यासाठीच अहोरात्र कष्ट करण्यापेक्षा मिळवलेल्या पैशांचे नीट व्यवस्थापन केले व फसव्या योजनांपासून सावध राहिलो, तरी अर्थस्वावलंबन प्राप्त होऊ शकतो.

Back to top button