Politics : छोटे पक्ष, मोठे पक्ष! | पुढारी

Politics : छोटे पक्ष, मोठे पक्ष!

विवेक गिरधारी

दिल्ली आणि बंगळुरूच्या बैठकांत एक जबरदस्त साम्य आहे. दिल्लीत जगज्जेता सिकंदर असलेला भारतीय जनता पक्ष छोट्या पक्षांच्या पंक्तीला येऊन बसला. बंगळुरात भारतावर प्रदीर्घ काळ राज्य करणारा आणि आज दोन-चार राज्यांचा अधिपती असलेला माजी सिकंदर काँग्रेस पक्षही छोट्या प्रादेशिक पक्षांशी गुजगोष्टी करताना दिसला. जग जिंकून आल्यानंतर सिकंदराने गावच्या कोतवालापुढे मैत्रीसाठी हात पसरावा, इतके भाग्य छोट्या पक्षांचे अचानक कसे फळफळले? कारण, आजी आणि माजी, दोन्ही सिकंदरांना सैन्य हवे आहे.

2024 च्या रणधुमाळीचे पडघम वाजू लागताच हे सिकंदर छोट्या-छोट्या पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले. मागच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले, तर या छोट्या पक्षांना लोकसभेच्या दहा जागाही धड जिंकता आलेल्या नाहीत. तरीही आजी-माजी जगज्जेते सिकंदर या छोट्या पक्षांच्या दारी कशासाठी? तुमच्या जातीला जागे करायचे असेल, तर जातीसाठी राजकीय पक्ष काढा. जातीचे लक्ष वेधून घ्या…मग बघा, बडे-बडे पक्ष तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत पोहोचतील, असे बसपचे संस्थापक कांशीराम म्हणाले होते. जाती ध—ुवीकरणाचा हा मंत्र नेमका बसपच्या मायावती विसरल्या आणि उत्तर प्रदेशातल्या ओबीसींनी मात्र प्रत्यक्षात आणला. सुहेलदेव भारतीय समाज पार्टी भाजपच्या एनडीएमध्ये दाखल झाली ही उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलची बातमी नॅशनल न्यूज ठरली.

या पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर म्हणतात, मी ओबीसी आहे हे कालपर्यंत कुणाला माहीत नव्हते; पण मी ओबीसींचा पक्ष काय स्थापन केला, भाजप तर माझ्या दारात येऊन उभा राहिला! मागच्या लोकसभेला राजभर एक टक्का मतेदेखील मिळवू शकले नाहीत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्वांचलचे निकाल भाजपच्या बाजूने फिरवण्याची भाषा मात्र ते आज करतात. त्यांची ही ताकद भाजपलाही मान्य आहे. उत्तर प्रदेशात पूर्वांचलसारखा मोठा प्रदेश जिंकण्यासाठी भाजपने समाजवादी पार्टीचे ओबीसी नेते फोडले, तसे राजभर-सारख्या ओबीसी नेत्यांचे छोटे पक्षही सोबत घेतले. हिंदुत्व सोडले आणि जातींचे तत्त्व पत्करले. हिंदुत्वाच्या हाकेला अठरापगड जाती ओ देत नाहीत. उजवे की डावे हा पेच त्याच्यासमोर नाही. सेक्युलॅरिझम आणि हिंदुत्ववादाच्या पखाली वाहण्यापेक्षा या छोट्या पक्षांना आपले छोटे-छोटे जातिसमूह जास्त महत्त्वाचे वाटतात. त्यातून प्रत्येक छोट्या पक्षाने आपली व्होट बँक मजबूत केली. भाजप आणि काँग्रेससारखे आजी-माजी सिकंदर अशाच वोट बँकांपुढे आज हात पसरून उभे आहेत. यातून जातीचे राजकारण आणि समाजातील जातींची उतरंड आणखी मजबूत होणार असली, तरी तो काही आजचा राष्ट्रीय चिंतेचा विषय नाही. चिंता आहे ती 2024 ची !

2024 मध्ये आपण स्वबळावर फार फार तर 270 जागांपर्यंत पोहोचू, असे लक्षात आले आणि सर्व मोठ्या राज्यांत जुन्या-नव्या मित्रांना जोडण्याचे मिशन भाजपने हाती घेतले. आज केंद्रातल्या 76 मंत्र्यांमध्ये भाजपच्या फक्त तीन मित्रपक्षांचे मंत्री दिसतात; पण ‘मिशन 2024 इम्पॉसिबल’चा ट्रेलर प्रत्येक सर्वेक्षणात दिसू लागताच एनडीएचा रौप्यमहोत्सव आठवला आणि तब्बल अडतीस मित्र भाजपने जमा केले. या सर्व मित्रांना लोकसभेच्या राजकारणात रस नाही. भाजपला केंद्राची सत्ता सलग तिसर्‍यांदा, तर भाजपच्या या अनेक मित्रांना त्यांच्या राज्याची सत्ता पहिल्यांदा मिळवायची आहे. ज्या चिराग पासवानांचा पक्ष भाजपने फोडला ते आता भाजपचे मित्र झाले. चिराग म्हणतात, आम्हाला भाजपची गरज आहे आणि भाजपलाही आमची! 2019 ला असुरी बहुमत मिळाल्यानंतर भाजपला तसे मित्र नकोच वाटू लागले होते. आज तोच भाजप मित्रांशिवाय एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार करत नाही. कारण, येत्या लोकसभा निवडणुकांचे नेतृत्व राज्या-राज्यातले प्रादेशिक पक्ष करणार आहेत.

हे प्रादेशिक पक्ष लढतील आणि भाजप तथा काँग्रेससारख्या पक्षांना जिंकून देतील. हाच विचार करून काँग्रेसनेही ‘इंडिया’ नावाची नवी आघाडी उघडली आणि तुल्यबळ म्हणता येतील असे 28 घटकपक्ष बाजूने उभे केले. एनडीए आणि इंडिया यात तुलना करायची, तर भाजप आपल्या मित्रांच्या बाबतीत अधिक उदार म्हणून आघाडीच्या राजकारणात यशस्वी झाला, असे दिसते.काँग्रेसला स्वतःपेक्षा कुठलाच पक्ष मोठा कधी वाटला नाही. या अहंमन्यतेतून काँग्रेसला आपल्या आघाडीचे मूळ नाव ‘संपुआ’देखील सोडावे लागले. ते जुनाट आणि काँग्रेसी शिक्का असलेले नाव नको म्हणून ‘इंडिया’ हे नवे नाव स्वीकारले गेले. ही नावापुरती तुलना सोडली, तर या दोन्ही आघाड्यांचा संघर्ष कोण जिंकतो हे कुणाचे मित्रपक्ष जातीचे, वंचित, उपेक्षित घटकांची मते अधिक खेचतात यावर अवलंबून असेल. महाराष्ट्र असो की राष्ट्र, छोट्या पक्षांना मोठे महत्त्व आले आहे आणि या छोट्या पक्षांशिवाय मैदानात उतरण्याची हिंमत भाजपमध्ये नाही आणि काँग्रेस, राष्ट्रवादीतही नाही!

जातीपातीचे आणि उपेक्षित घटकांचे हे महाभारत जिंकण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहारच्या तुलनेत भाजपला महाराष्ट्रात मात्र फार जोरदार मित्र मिळालेले नाहीत. अर्धी राष्ट्रवादी काँग्रेस फोडूनही फक्त अजित पवारांसह नऊ आमदार सोबत आले. जे आमदार राजभवनच्या पंक्तीला दिसले ते विधिमंडळातील गणतीला दिसत नाहीत. एकनाथ शिंदे यांचा चाळीस फुटीर आमदारांचा गट भाजपसोबत आहे. दिल्ली बैठकीत शिंदेही अजित पवारांप्रमाणेच पहिल्या रांगेत होते. उद्याच्या लोकसभा निवडणुकीत मात्र महाराष्ट्र आपल्याला पहिल्या पंक्तीला बसवेल याची खात्री शिंदे यांनाच वाटत नाही. हीच खात्री भाजपलाही वाटते, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित गटाला भाजपने सोबत आणले. 48 पैकी 45 जागा जिंकू असे भाजपचे नेते आज सांगतात. बाकी तीन जागा कुणाला सोडल्या? शरद पवारांना? मग हा लोकसभेपुरता तूर्तातूर्त समझोता मानायचा का?

भाजपचे मित्र म्हणून जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे, प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू दिल्ली बैठकीला होते. कोरे हे तसे एका मतदारसंघापुरते उपयोगी पडतील. अमरावतीत राणा दाम्पत्याच्या चालीसा पठणात विघ्न नको म्हणून बच्चू कडूंना चुचकारले गेले असू शकते; पण अजून तरी कडू भाजपच्या मैत्रीबद्दल गोड बोलायला तयार नाहीत. सदाभाऊ खोत, महादेव जानकर हे मित्र भाजपसोबत दिसत नाहीत. शिवसंग्रामचे तर कुठे नावही घेतले जात नाही. एकूण महाराष्ट्र जिंकून देतील, असे मित्र भाजपच्या गाठीशी फार नाहीत. अर्धी शिवसेना आणि चतकोर राष्ट्रवादी घेऊन भाजप लोकसभेचा रणसंग्राम कसा जिंकणार हे येणारा काळ सांगू शकेल.

Back to top button