हवामान बदलाने फळ उत्पादन घटले! | पुढारी

हवामान बदलाने फळ उत्पादन घटले!

जून महिन्यात अप्रत्यक्षरूपाने वाढलेल्या तापमानामुळे लिची आणि आंब्यांची रसाळ चव चाखायला मिळाली नाही. फळातील रस कमी झाला आहे. आकारही लहान झाला आहे. उत्पादनावरदेखील परिणाम झाला आहे. बिहारच नाही, तर संपूर्ण देशात हीच स्थिती आहे. आंबा आणि लिची चाहत्यांची यंदा निराशा झाली आहे. चांगल्या चवदार फळांचा त्यांना शोध घ्यावा लागला आहे. या गोष्टी हवामान बदलामुळे होत आहेत.

आगामी काळात हवामान बदलाचा आणखी व्यापक परिणाम पाहवयास मिळेल. हवामान बदलामुळे लिची आणि आमराई संकटात सापडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एप्रिल ते मे महिन्यांत कमाल तापमान 40 अंशांपेक्षा अधिक राहिले आहे. जून महिन्यात तर तापमान 44 अंशांपेक्षा अधिक राहिले आहे. लिची या फळ काढणीच्या वेळी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. यावेळी उष्णता अधिक राहिल्याने लिचीचे आवरण खराब झाले. आवरणातील कोशिका मृत झाल्या. 60 टक्क्यांपेक्षा अधिक फळ बागेतच फुटले. शेतात ओलावा न राहिल्याने फळ पडण्याची प्रक्रिया वेगाने झाली. फळ लवकर तयार होऊ लागल्याने बागायतदारांना बरेच नुकसान सहन करावे लागले. आजघडीला भारतात 97.91 हजार हेक्टरवर लिचीची शेती होते आणि त्यामुळे 720.12 हजार मेट्रिक टन उत्पादन मिळते. बिहारमध्ये लिचीची शेती 36.67 हजार हेक्टरवर होते. यापासून 308.06 हजार मेट्रिक टन फळ मिळते. भारतात एकूण उत्पादित होणार्‍या लिचीतील सुमारे 40 टक्के वाटा बिहारचा आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यातदेखील लिचीची शेती होते. एकट्या बिहारच्या मुझफ्फरपूर येथे 11 हजार हेक्टरवर लिचीची बाग आहे. बहुतांश शेतकरी लिचीच्या शाही आणि चायना प्रकारातील शेती करतात.

भारतात लिची 18 व्या शतकात चीनहून म्यानमारमार्गे दाखल झाली. लिचीच्या जगातील एकूण उत्पादनांपैकी 91 टक्के वाटा भारत आणि चीनचा आहे. परंतु, हवामान बदलामुळे आणि फळ लवकर खराब होऊ लागल्याने त्याची विक्री स्थानिक पातळीवरच अधिक होताना दिसून येते. तापमान, आर्द्रता, फळाची कळी, फूल येणे, फळ विकसित होणे, गुणवत्ता, चवीचा विकास यावर परिणाम होतो. लिचीची शेती ही डिसेंबर ते फेब—ुवारी या काळात किमान तापमान 10 अंश सेल्सिअस आणि एप्रिल ते जून महिन्यात 38 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या भागात होते. फूल आणि फळ यादरम्यानच्या प्रवासात वातावरणातील तापमान 21 ते 37 अंश सेल्सिअस हे आदर्श मानले जाते. आजकाल तापमान यापेक्षा अधिकच राहत आहे. चव वाढविण्यासाठी लिचीच्या बागेत मधमाशी पालन केले जाते. त्यामुळे पंधरा ते वीस टक्के उत्पादनात वाढ होते.

अधिक उष्णता असेल, तर मधमाशा कमी सक्रिय राहतात आणि त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि चवही जाते. अशीच स्थिती आंब्यांची आहे. त्याच्या विकासासाठी अनुकूल वातावरणाची गरज आहे. अधिक ऊन पडल्यास आंब्यांचा विकास होत नाही. फळांचा आकार कमी राहतो. दर झाडामागे आंब्यांची संख्यादेखील घटते. सनबर्न किंवा झाडावरच पिकण्याची समस्या वाढते. यावर्षीदेखील असेच चित्र पाहवयास मिळाले. या कारणांमुळेच आंब्यांचा आकार आणि चव पूर्वीसारखी दिसून आली नाही. अनेक राज्यांत अधिक तापमान राहिल्याने आंब्यांचा मोहर गळून पडला आणि उत्पादन कमी राहिले. हवामान बदलाचा परिणाम आणि अधिक तापमानामुळे फळ लवकर पिकले. उष्णतेच्या लाटेने पिकलेल्या फळाचे आयुष्य घटले. फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी लिची आणि आमराईसाठी शास्त्रीय मार्गाने व्यवस्थापन करायला हवे. या आधारावरच आपण हवामान बदलाच्या संकटापासून बचाव करू शकतो. सरकारनेदेखील बागायतदारांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांनी मोहर येण्याच्या काळापासूनच बागेचे नियोजन करायला हवे. याप्रमाणे आपण दर्जेदार लिची आणि आंब्यांची उच्च प्रतीची चव अनेक दिवसांपर्यंत घेऊ शकू.

– रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

Back to top button