सुन्न करणारे दिवस! | पुढारी

सुन्न करणारे दिवस!

- विवेक गिरधारी

सध्या महाराष्ट्रात पक्ष प्रवक्त्यांच्या झुंजी सुरू आहेत. या झुंजी इतक्या घमासान की, त्यात सत्तासंघर्ष आणि पक्षीय कुरघोड्यांची कुणी नोंदही घेऊ नये. नेते कोमात अन् प्रवक्ते जोरात, अशी ही स्थिती मूळ पक्षांसाठी मात्र पोषक नाही. कारण, या प्रवक्त्यांवरून लोक पक्षांची पारख करू लागले, तर संजय राऊत आणि नितेश राणे आपापल्या पक्षांची अवस्थाच करू शकतात!

आमदार नितेश राणे आणि खासदार संजय राऊत अशी तुलना कुणी करणार नाही. ती होत नाही; पण या तुलनेला निमंत्रण मुळात संजय राऊत यांनी दिले. राऊत ‘ईडी’च्या कोठडीत जाण्यापूर्वी आक्रमक होते. पत्रकार परिषदेत शिव्यांची बरसात त्यांनीच सुरू केली. ‘ऑर्थर रोड’च्या दीर्घ मुक्कामातून बाहेर पडल्यावर राऊत नरमले म्हणण्यापेक्षा विनम— झाल्याचा भास महाराष्ट्राला नक्कीच झाला होता. अत्यंत संयम आणि सहनशील सूर त्यांनी तुरुंगात कमावला असावा; पण तो तात्कालिक प्रकृतीचा परिणाम असू शकतो. अलीकडे त्यांचा सूर पूर्वीच्याच पट्टीत लागू लागला आहे. शिंदे सेनेला नामोहरम करणार्‍या पत्रकार परिषदा ते रोज सकाळी घेऊ लागले. केवळ मुद्दे असतील, तर त्यांस मुद्द्यांनी उत्तर देता येते; पण राऊत गुद्द्यांवर उतरले. शिव्यांशिवाय पत्रकार परिषद नाही. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ या घोषणेचा जनक कोण हे सांगण्याची गरज नाही. ही घोषणा राऊतांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत रुजवली आणि लोकप्रिय केली.

अजित पवारांचे आणि राऊतांचे तसे जमत नाही. काकांचा कुणीही मित्र हा अजित पवारांचा शत्रू असतो; पण राऊतांनी बुलंद केलेल्या या घोषणेच्या प्रेमात अजित पवारही पडले. शिंदे सेनेला गद्दार ही उपाधीही राऊतांचीच. आता कोणत्याही भाषणात अजित पवारही, गद्दारांना महाराष्ट्र धडा शिकवणार, असे सांगतात आणि ‘एकदम ओके’च्या घोषणेचा अर्थही लावतात. या घोषणेला उत्तर देता-देता शिंदे सेनेच्या नाकी नऊ आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून सत्तेतील अनेकांनी प्रयत्न करून पाहिला; पण राऊतांनी महाराष्ट्रावर सोडलेली ही घोषणा काही निष्प्रभ होऊ शकली नाही. इथपर्यंत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण म्हणून महाराष्ट्राने याकडे पाहिले. ज्या क्षणी संजय राऊतांनी शिव्यांचा यथेच्छ वापर सुरू केला, त्या क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बिघडला आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेऊन प्रश्न विचारताच राऊत वृत्तवाहिन्यांच्या कॅमेर्‍यांसमोर पचकन थुंकले, त्या क्षणी आपल्या राजकीय संस्कृतीचा पदर ढळला.

सकाळी उकडा लावलेले दूध घरी येते, तसा राऊतांच्या पत्रकार परिषदांचा उकडाच सुरू आहे. त्यास आक्षेप घेण्याचे कारण नाही; पण रोज सकाळी राऊत आरोपांची राळ उडवणार, शिवीगाळ करणार तर त्याला उत्तर कोण देणार? या प्रश्नाचे उत्तर भाजपला स्वतःच्या संस्कृतीत मिळणार नव्हते. भाजपमध्ये गेल्या काही वर्षांत जो सर्वपक्षीय संगम झाला, त्या संगमावरच राऊतांना त्यांच्या भाषेत उत्तर देणारा असू शकतो. आमदार नितेश राणे हेच यापुढे राऊतांना उत्तर देतील आणि रोज देतील, असे जाहीर करून भाजपची मंडळी बाजूला झाली. आता रोज सकाळी थोरा-मोठ्यांचे एकेरी उल्लेख, धमक्या, यथेच्छ शिव्या, कपडे काढण्याची, नागडे करण्याची भाषा, गाडण्याची भाषा असे सारे सुरू आहे.

ठाकरेंची शिवसेना आणि भाजप या पक्षांनी आपापली बाजू मांडण्यासाठी प्रवक्ते नेमलेत, की कमी उंचीचे बाऊंसर्स? चिरंजीव राणे आणि संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदांचे टेबल समोरासमोर लावले, तर फक्त गुद्द्यांची बात होईल, इतके हे प्रवक्तेपण हिंसक झाले आहे. यात भाजपचा तसा नाईलाज झाला. राऊतांचे हल्ले परतवून लावायचे म्हणजे, भाजपसाठी ती दुहेरी जबाबदारी. राऊतांचे मुख्य टार्गेट आहे, ती शिंदे सेना. शिवसेनाप्रमुखांची शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याचे शिवधनुष्य उचलून शेवटचा बाण सेनेवरच चालवण्याचे टार्गेट भाजपने शिंदे यांना दिले आहे. तोपर्यंत या शिंदे सेनेचे संरक्षण करणे भाजपला भाग आहे. म्हणूनच भाजपने आपला प्रवक्ता म्हणून नितेश राणे यांना पुढे आणले.

आज भाजपचा कुणीही प्रवक्ता राऊतांना उत्तर देत नाही. भाजपने आपले घरंदाज प्रवक्ते या दलदलीत न उतरवता नितेश राणेंना संजय राऊतांवर सोडले. राऊत कोणत्या पातळीवर घसरून बोलतात, त्यांच्या पत्रकार परिषदांची उंची किती, हे दाखवण्यासाठीच भाजपने नितेश राणेंना राऊतांसमोर उभे केलेले दिसते. संजय राऊतांनी कष्टाने कमावलेल्या आपल्याच उंचीचा मान ठेवला नाही. आता राणेंच्या बोलण्याकडे कान द्या आणि आपली उंची जोखा, असेच भाजपने राऊतांना सुचवले असावे. म्हणजे, नितेश राणेंचा फोटो डकवलेला आरसाच राऊतांसमोर धरला म्हणा ना!

भाजपमध्ये विलीन होऊनही शिल्लक दाखवणार्‍या शिवसेनेतील कुणाही आमदाराला संजय राऊत यांच्या उंचीची कल्पना असण्याचे कारण नाही. या सेनेतील कुणीही आमदार कधी आपला मतदारसंघ आणि जिल्हा सोडून बाहेर पडला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी शिवसेना वाढत गेली. या विचारांचे एक वडवानल उभे करण्यात संजय राऊत नावाचा अस्सल पत्रकार सतत पडद्यामागे काम करायचा. युतीची पहिली सत्ता आणण्यातही राऊतांचे योगदान मोठे आहे. ‘ प्रेतांनो, जिवंत व्हा, आज सुडाचा दिवस’ हे मतदानाच्या दिवशीचे त्यांचे मथळे महाराष्ट्रात तेव्हा झेरॉक्स काढून विकले गेले. प्रसंगी त्या एकेक झेरॉक्ससाठी लोकांनी पन्नास-पन्नास रुपये मोजले.

‘असा खलनायक शेक्सपियरलाही रंगवता आला नाही, ’ हा शरद पवारांवरचा राऊतांचा अग्रलेखही याच मालिकेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, शि. म. परांजपे, आगरकर, महात्मा फुले अशा ऐतिहासिक लेखनशैलींचा संस्कार त्यांनी करून घेतला. त्यातून मराठीसाठीचे निशाण घेऊन त्यांची पत्रकारिता उभी ठाकली, विरोधकांना चेकमेट करण्याचे सामर्थ्य तिने कमावले. बिहार पालथे घालत गुन्हेगारीचे सुन्न करणारे दिवस त्यांनी मराठी वाचकांसमोर उभे केले.

महाभारतातील संजय उवाच त्यांनी स्वतःला जोडून घेतले तेव्हा राऊतांना काय म्हणायचे आहे, हे जाणून घेण्यासाठी लोक शेवटच्या शब्दापर्यंत जाऊन थांबत; पण मूळ संजय कुरुक्षेत्रावर कधीच उतरला नव्हता. युद्धभूमीवर जे घडते आहे, ते जसेच्या तसे, संपादन न करता तो सांगत राहिला. ठाकरे सेनेचा हा संजय मात्र प्रत्यक्ष महाभारतात, कुरुक्षेत्रावर आहे. तेव्हा राजकीय युद्धाचे नीतीनियम पाळावे लागतील. ते मोडले म्हणूनच आता ‘संजय उवाच’ नको, संजय उगाच म्हणण्याची वेळ आली आणि राऊतांच्या कमावलेल्या उंचीने नितेश राणेंची बरोबरी साधली!

 

Back to top button