भरारी : दोन ‘नोबेल’ विजेती रसायनशास्त्रातील महाराणी | पुढारी

भरारी : दोन ‘नोबेल’ विजेती रसायनशास्त्रातील महाराणी

  • देवीदास लांजेवार  

संघ लोकसेवा आयोगाची ‘यूपीएससी’ परीक्षा असो, ‘एमपीएससी’ असो की स्टॉफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा; पहिल्या प्रयत्नात नापास झाले की, या उमेदवारांना त्यांचे जगणे तुच्छ वाटू लागते. कारणही तसेच असते. एका परीक्षेत नापास होणे म्हणजे दोन वर्षे वाया जाणे. त्यामुळे हे जग दुःखाने भरलेले आहे. आपण ही परीक्षा पास होणार की नाही, असे रडगाणे गात अपयशी उमेदवार दुःखांना गोंजारत बसतात. मात्र, अशा उमेदवारांनी स्वत:चे दुःख विसरून जगाच्या कल्याणासाठी मेरी क्युरीने केलेल्या संशोधनकार्याचे अनुकरण केले, तर ते नक्कीच अपयशाला हुलकावणी देऊ शकतील.

मेरी क्युरी ही जगातील महान शास्त्रज्ञांपैकी एक स्त्री शास्त्रज्ञ समजली जाते. कितीही अवघड टास्क असले तरी तमाम महिलांनी तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिंकायचा निर्धार करावा, एवढी उत्तुंग कामगिरी मेरी क्युरी या रसायनशास्त्रज्ञाने केली आहे. म्हणूनच तिला रसायनशास्त्रातील महाराणी म्हटले जाते. दोन नोबेल पुरस्कार मिळवणारी मेरी क्युरी ही जगातील पहिली व्यक्ती होती. रसायनशास्त्रातील अनेक शोधांना जन्म देणार्‍या पेरी क्युरी यांच्यावर मेरी क्युरी जिवापाड प्रेम करीत असत. अनेक रसायनांच्या क्रिया-प्रतिक्रियांनी नवनवीन रासायनिक द्रव्यांची निर्मिती करणार्‍या मादाम मेरी क्युरी आणि पेरी क्युरी यांच्या प्रेमाचे रसायनही पॅरिस येथील सोबोर्न विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत निर्माण झाले. या प्रेमरसायनांची रिअ‍ॅक्शनही या दोघांच्या विवाहरूपी प्रॉडक्टरूपाने तडीस गेली; मात्र एक दिवस अचानक पेरी क्युरी यांचे निधन झाले आणि मेरी क्युरी यांनी हाय खाल्ली. हे जग त्यांना एकाकी, एकटे अन् निरस वाटू लागले. कित्येक दिवस त्यांची प्रयोगशाळा पेरीविना पोरकी झाली होती.

मादाम मेरी क्युरी यांचा जन्म तत्कालीन रशियन साम—ाज्यातील पोलंड या देशात झाला. झार हा देशातील स्त्री-पुरुषांना शिक्षण देण्याच्या विरोधात होता. मात्र, मेरीची शिक्षणाविषयीची ओढ तीव— होती. त्यामुळे वडिलांनी तिची शिक्षणातील आणि ज्ञानातील प्रगती लक्षात घेऊन मेरी क्युरीला वैद्यकीय शिक्षणासाठी पॅरिसमध्ये ठेवले. तेथे त्यांनी पदार्थविज्ञानाचा अभ्यास सुरू केला. याच सुमारास हेनरी बेक्वेरेल या शास्त्रज्ञाने युरेनियम हे मूलद्रव्य आणि त्यातून बाहेर पडणार्‍या गूढ किरणांचा एक भन्नाट शोध लावला. या शोधामुळे मेरीची उत्सुकता वाढीस लागली. अणूतून बाहेर पडणारी किरणे म्हणजे काही रासायनिक प्रक्रिया नसून अणूचाच एक गुणधर्म होय, असे तिचे ठाम मत होते. तिने त्यावर सखोल संशोधन सुरू केले. युरेनियममधून बाहेर पडणारी किरणे हा अणूचा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे. या मूलद्रव्यातून किरणे बाहेर पडण्याच्या गुणधर्माला तिने ‘किरणोत्सर्ग’ असे नाव दिले. तिने हा शोध वयाच्या तिसाव्या वर्षी लावला.

मेरी क्युरी व पेरी क्युरी या दाम्पत्याने ‘पिचब्लेड’ या खनिज द्रव्यावर संशोधन सुरू केले. ‘पिचब्लेड’ हे किरणोत्सारी युरेनियम असल्याने त्यात एकापेक्षा जास्त किरणे असतील, असा त्यांचा तर्क होता. अविश्रांत परिश्रम आणि चिकाटीने केलेल्या शेकडो प्रयोगांनंतर या दाम्पत्याला शेवटी यश आले आणि ‘पिचब्लेड’ या खनिजातून दोन किरणोत्सर्गी मूलद्रव्य त्यांनी शोधून काढले. त्यापैकी एका मूलद्रव्याचे (किरणाचे) नाव रेडियम, तर दुसर्‍या किरणाचे नाव ‘पोलोनियम’ असे ठेवले. मेरी क्युरीचा मायदेश पोलंड असल्याने आपल्या देशाचे नाव त्यांनी किरणाला दिले. या शोधामुळे मेरी क्युरी आणि पेरी क्युरी यांची कीर्ती जगभर पसरली. मात्र, त्यानंतर पेरी क्युरीची साथ फारकाळ मेरीला लाभली नाही. 1906 साली पेरी क्युरीचे निधन झाले. मेरीसाठी हा जबर धक्का होता; मात्र मेरीने आपले दुःख विसरून जगातील असंख्य विज्ञानप्रेमी माणसांना आपल्याकडून विज्ञानसेवेची अपेक्षा आहे व ती आपण पूर्ण केली पाहिजे, हे जाणून पुन्हा संशोधनकार्य सुरू केले. संशोधन करीत असताना मेरीने किरणोत्सर्गावर पहिला ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यानंतर दुसर्‍या वर्षी रेडियमच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले अन् दोन नोबेल पारितोषिक पटकावणारी मेरी क्युरी जगातील पहिली महिला ठरली. युद्धकाळात जखमी सैनिकांवर औषधोपचार करणार्‍या मोटारगाडीत ‘क्ष’ किरण उपकरणे बसविण्याचे तंत्रही पुढे तिने शोधून काढले. 1921 साली तिने ‘क्ष’ किरणशास्त्रावर एक ग्रंथ लिहिला. अहोरात्र संशोधन करीत असल्याने आणि किरणोत्सारी पदार्थांशी सतत संपर्क आल्याने शेवटी तिला ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) हा गंभीर रोग जडला आणि एक महान, कर्तृत्ववान महिला शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेली.

Back to top button