कथित जागा वाटप फॉर्म्युल्याने ‘महाविकास’मध्ये संशयकल्लोळ | पुढारी

कथित जागा वाटप फॉर्म्युल्याने ‘महाविकास’मध्ये संशयकल्लोळ

लोकसभा निवडणुकीचा मुहूर्तही निघालेला नाही, तोच गुरुवारी अचानकच महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटक पक्षातील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सुरू झाली. या कथित फॉर्म्युल्यामध्ये महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला 21, राष्ट्रवादी काँग्रेस 19 आणि काँग्रेसला अवघ्या 8 जागा असे जागा वाटपाचे स्वरूप असल्याचेही वृत्त झळकले. काँग्रेस पक्षाला दोन आकडीही जागा नसल्याने काँग्रेस पक्षातून तीव्र प्रतिक्रिया आली आणि अशा कोणत्याही फॉर्म्युल्याची चर्चाच झाली नसल्याचा स्पष्ट खुलासाही काँग्रेसने केला. काँग्रेसला जागा वाटपात नगण्य स्थान देण्यामागे, राष्ट्रवादी काँग्रेसची काही खेळी असावी काय, त्यानिमित्ताने चाचपणी करण्याचा मनसुबा असावा काय, असा काँग्र्रेस पक्षात संशयकल्लोळ सुरू झाला आहे.

महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली होती. भाजपने 25 आणि शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या. त्यात भाजपला 23 आणि शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले होते. भाजपला सर्वाधिक म्हणजे 27.8 टक्के एवढी, तर शिवसेनेला 23.5 टक्के एवढी मते मिळाली होती. 21 जागा लढवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा आणि 15.7 टक्के मते मिळाली होती. काँगे्रसला अवघी एक जागा मिळाली होती. काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा अधिक म्हणजे 16.4 टक्के एवढी मते मिळाली होती.

गेल्या चार वर्षांत राज्यातील राजकीय चित्र पूर्ण बदलले आहे. भाजप-सेना युती तुटली आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आहे, तर दोन्ही काँग्रेस आणि उद्धव यांची शिवसेना यांची महाविकास आघाडी विरोधी भूमिकेत आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचे सरकार सत्तेवर आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी असल्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे आणि धनुष्यबाण हे चिन्हही त्यांना बहाल केले आहे.

अशा नव्या राजकीय पटावर आता लोकसभा निवडणुका होणार आहेत. 24 महापालिका, 26 जिल्हा परिषदा, त्याअंतर्गत असलेल्या 300 हून अधिक पंचायत समित्या आणि 225 नगरपालिका यांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीआधी व्हायच्या आहेत. या निवडणुकीत राज्यातील जवळजवळ बहुसंख्य मतदार भाग घेणार आहेत. एकाअर्थी ही लोकसभेची रंगीत तालीमच आहे. त्यात कोण बाजी मारणार, त्यावर राज्यातील लोकसभा जागांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.

जागा वाटपाचे पिल्लू नेमके आले कुठून?

अद्याप महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांचा बिगुलही वाजलेला नाही आणि लोकसभेचे घोडा मैदान तर दूरच आहे, तरीही महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे पिल्लू पद्धतशीरपणे सोडण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामध्ये उद्धव यांच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहेत आणि त्यांना बोलायला वाव ठेवण्यात आलेला नाही. याउलट काँगे्रसला नगण्य जागा दाखवून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न चालल्याची चर्चा आहे. अर्थात यामागे बोलवते धनी राष्ट्रवादी काँग्रेसचेच चाणक्य असणार, हे उघडच आहे. काँग्रेसच्या प्रतिक्रियेची चाचपणी करावी, असाही शहाजोग मनसुबा यामागे असेल, हेही सांगायची गरज नाही.

अलीकडे झालेल्या विधानसभा पोटनिवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालेले आहे, तर 1962, 1980 या निवडणुकीत 52, 53 टक्के, 1999 मध्ये 29 टक्के आणि अलीकडे 16.4 टक्के मतदान घेणार्‍या काँग्रेसने, राष्ट्रवादीपेक्षा नेहमीच अधिक मते घेतली आहेत. काँग्रेसची वाताहात झालेली असली, तरी भाजपनंतर देशातील सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष काँग्रेसच आहे. काँग्रेसला खच्ची करण्याच्या नादात महाविकास आघाडीलाच फटका बसण्याचा धोका आहे. चाणक्यांची अशी खेळी भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्याच पथ्यावर पडेल. कदाचित अशीच धूर्त चाल चाणक्यांच्या खेळीमागे असावी, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

सुरेश पवार

Back to top button