ममता बॅनर्जी यांचा विजयाचा अर्थ | पुढारी

ममता बॅनर्जी यांचा विजयाचा अर्थ

बंगालच्या विधानसभेसाठी तीन जागी पोटनिवडणूक झाली आणि त्यात तृणमूल काँग्रेसने सर्व जागा जिंकून बाजी मारली. त्याचे फार कौतुक करण्याची गरज नाही. याचे कारण अलीकडेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्याच पक्षाने दोन तृतीयांश जागा जिंकून तिसर्‍यांदा सत्ता स्थापन केली होती. शिवाय त्यात भाजप वगळता उर्वरित सर्व पक्षांचे नामोनिशाणच जणू संपवले होते. त्यामुळे दोन-तीन महिन्यांनी झालेल्या अशा पोटनिवडणुकीत पुन्हा त्याच पक्षाचा झेंडा फडकला तर नवल नाही; पण तरीही या मतदानाला इतके कौतुक मिळाले. कारण, त्यातून खुद्द राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सत्तापदावर शिक्कामोर्तब व्हायचे होते. सार्वत्रिक मतदानात ममतांनी आपल्या पारंपरिक भवानीपूर या कोलकात्यातील जागेवरून लढण्यापेक्षा नंदिग्राममध्ये जाऊन शुभेंदू अधिकारी यांना आव्हान देणे पसंत केले. ते काही महिन्यांपूर्वीच तृणमूल सोडून भाजपमध्ये गेले होते आणि जणू ममतांना आव्हान देणारा भाजपचा बंगाली चेहरा म्हणून उभे ठाकले होते. त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्या घरातच त्यांना आव्हान देण्याचा आक्रमक पवित्रा ममतांनी घेतला. त्याचा लाभ त्यांना एकूण राज्यभरातील मतदानात नक्‍की मिळाला; पण शुभेंदू यांना पराभूत करण्यात ममता किरकोळ मतफरकाने अपयशी ठरल्या. वास्तवात त्यांना या आपल्या जुन्या सहकार्‍याला पराभूत करायचेच नव्हते. त्यापेक्षा आपला लढवय्या चेहरा पुढे करून अवघा बंगाल जिंकायचा होता. कारण, मुख्यमंत्री होण्यासाठी आमदार होण्यापेक्षा बहुमत मिळण्याला प्राधान्य असते. आमदार नंतरही होता येते. त्यात ममता कमालीच्या यशस्वी झाल्या. शुभेंदू जिंकले आणि बंगाल जिंकण्याचे भाजपचे स्पप्न भंगले. त्यामुळेच नंदिग्राम विधानसभा मतदारसंघात हरलेल्या ममताच मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांना आमदार होण्यासाठी पोटनिवडणूक लढणे भाग होते. त्यांच्या पारंपरिक भवानीपूर मतदारसंघात निवडून आलेल्या त्यांच्या पक्षाच्या आमदाराने त्यासाठी राजीनामा दिला आणि जागा मोकळी केली. आता तिथून ममता जिंकल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. त्याचवेळी त्यांच्या पक्षाने मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज आणि जंगीपूर अशा दोन्ही जागाही जिंकल्या आहेत; पण या विजयाचे वा यशाचे मोल बंगालपुरते नाही. त्यापेक्षा त्याला राष्ट्रीय राजकारणात मोठे महत्त्व आहे. कारण, ममता आता राष्ट्रीय राजकारणात अवतरण्याच्या तयारीला लागल्या असून, काँग्रेस पक्षांतर्गत माजलेल्या अराजकाने त्यांना पोषक वातावरण निर्माण करून दिले आहे. मागल्या सहा-सात वर्षांपासून देशभरचे विरोधी पक्ष मोदींना आव्हान देऊ शकणार्‍या नेतृत्वाच्या व चेहर्‍याच्या शोधात आहेत. ममता त्याच भूमिकेत जायला उत्सुक आहेत आणि ताजा विजय त्यांच्यासाठीचा मार्ग प्रशस्त करणारा आहे.

अगदी अलीकडेच ममतांनी दिल्लीवारी केली होती आणि काँग्रेसला बाजूला ठेवून देशभरच्या भाजप विरोधी राजकीय पक्षांची मोट बांधण्याचा प्रयास त्यांनी सुरू केला होता. त्यात कटाक्षाने काँग्रेसने योजलेल्या बैठकीत त्यांचा पक्ष गैरहजर राहिला; पण त्यांनी स्वत:च वेगळी विरोधकांची बैठक बोलावली होती. दिल्लीहून माघारी परतल्यावर ममतांनी विविध प्रांतांमध्ये विस्कळीत व निराश असलेल्या कार्यकर्त्यांना चुचकारून आपल्या पक्षात आणण्याची मोहीम हाती घेतली. त्रिपुरामध्ये त्यांचा पुतण्या अभिषेक मोहिमेवर गेले होते आणि प्रशांत किशोर या रणनीतीकाराने गोव्यात ठाण मांडले होते. दोन्ही जागी काँग्रेसच्या प्रादेशिक नेत्यांना तृणमूलमध्ये आणले गेले, तर खुद्द बंगालमध्ये अनेक काँग्रेस नेत्यांनी ममतांच्या निकटवर्तीयांना भेटून आपला मूळ पक्ष सोडला. त्यापैकीच एक सुश्मिता देव आता राज्यसभेच्या सदस्यही झाल्या आहेत. 2014 मध्ये काँग्रेसतर्फे लोकसभेत गेलेल्या आणि टीम राहुलमध्ये दिसणार्‍या सुश्मिता देव आता ममतांच्या गोटात आल्या आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरोही तसेच बाहेर पडले आहेत. या सगळ्या मोहिमेला वेग व चालना मिळण्यासाठी भवानीपूरचा हा विजय खूप मोठा हातभार लावणार आहे. त्यातच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका चार-पाच महिन्यांवर आल्या असून, तिथे काँग्रेस पक्षाचा पुरता बोजवारा उडाला आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसचे शेकडो नेते, कार्यकर्ते आपल्या श्रेष्ठींच्या अजब वर्तनाने नाराज व निराश आहेत. त्यांना आपल्या भागात व राज्यात भाजपशी दोन हात करायचे आहेत; पण त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडून कुठली शक्‍ती व प्रोत्साहन मिळत नाही. अशावेळी त्यांना भाजप विरोधातील राजकारणासाठी राष्ट्रीय खंबीर नेतृत्व हवे आहे. ते देण्याची क्षमता आपली नाही, हेच पंजाबच्या पेचप्रसंग निर्मिण्यातून राहुल गांधींनी सिद्ध केले आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी ममतांनी कंबर कसलेली आहे. आता ताज्या विजयाने त्यांच्या मागे बंगालमधल्या राजकारणाचा ससेमीरा संपलेला आहे. त्यामुळेच अधिक वेगाने त्या विविध राज्यांतील काँग्रेसला खिंडारे पाडून तिथे तृणमूल काँग्रेसची संघटनात्मक बांधणी उभी करायला मोकळ्या झाल्या आहेत. जवळपास सगळे पक्ष व नेते भाजपसमोर निष्प्रभ झालेले दिसत असताना ममतांचा उदय म्हणूनच त्यांना राष्ट्रीय राजकारणात येण्यास मोठी चालना देणारा ठरू शकणार आहे. भवानीपूरचा विजय हा त्यातलाच एक महत्त्वाचा टप्पा ठरायला अजिबात हरकत नाही. अर्थात, भाजपसाठी हा पराभव तसा अपेक्षित होता. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी बंगालमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून मिळवलेले स्थान यावेळीही पोटनिवडणुकीत शाबूत राहिले, यातच त्यांचे नेतृत्व समाधानी असेल. तृणमूलच्या या विजयाची चिंताच करायची असेल तर ती काँग्रेसने म्हणजे त्या पक्षाच्या जुन्या ज्येष्ठ नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी करण्याला पर्याय नाही. इतकाच या निकालांचा अर्थ होतो.

Back to top button