देशभरातील पेपरफुटीचे आव्हान | पुढारी

देशभरातील पेपरफुटीचे आव्हान

दिल्लीतील अभियांत्रिकीचा पेपर लीक होणे, राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित सीनिअर टीचर (माध्यमिक शिक्षण विभाग) परीक्षा-2022 च्या ‘सामान्य ज्ञान’ या विषयाची प्रश्नपत्रिका फुटणे, हिमाचल प्रदेशात कर्मचारी निवड आयोगाच्या आयटी भरतीच्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटणे, बिहारमध्ये बीएसएससी तृतीय वर्षाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक होणे, अशी पेपरफुटीची मालिका सध्या देशभरात सुरू आहे.

राजस्थानमध्ये गेल्या11 वर्षांपासून 38 पेक्षा अधिक मोठ्या परीक्षांचे पेपर लीक झाले आहेत. नुकतेच नीट व एसआय भरतीचे पेपरसुद्धा लीक झाल्याची बाब समोर आली आहे. पेपरफुटी हे आज शिक्षणक्षेत्रापुढील सर्वांत मोठे आव्हान बनले आहे.

अलीकडच्या काळात देशात स्पर्धा परीक्षा आणि बोर्ड परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. नवी दिल्लीतील एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याला परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका मिळाल्या. त्याने मित्रांनाही त्या वाटल्या आणि या सर्वांनी निवांतपणाने ही परीक्षा दिली. शिक्षण प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली; पण परीक्षाही रद्द करण्यात आली. हे एकमेव उदाहरण नाही. गेल्या काही दिवसांत राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्ये भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे लाखो युवकांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या कडक देखरेखीखाली ठेवलेल्या असतानाही या प्रश्नपत्रिका कशा काय फुटतात? परीक्षा व्यवस्थापनातील हा गैरकारभार कुणाच्या माथी मारला जाणार आहे? परीक्षा व्यवस्थापनाला धारेवर धरले जाणार का की, टास्क फोर्स ज्यालाही पकडणार त्याच्यावर कारवाई केली जाणार? या कारवाईमुळे काही लहान मासे नक्कीच जाळ्यात सापडतील; पण मोठे मासे पकडण्यात यश येणार आहे का? या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.

संबंधित बातम्या

मध्यंतरी, राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित सीनिअर टीचर (माध्यमिक शिक्षण विभाग) परीक्षा-2022 च्या सामान्यज्ञानाची प्रश्नपत्रिका फुटली होती. यासंदर्भातील कारवाईदरम्यान पोलिसांनी एका बसमध्ये 40-45 युवकांना पकडले तेव्हा त्यांच्याकडे या प्रश्नपत्रिका मिळाल्या. या प्रश्नपत्रिका परीक्षेच्याच प्रश्नपत्रिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिमाचल प्रदेशात कर्मचारी निवड आयोगाच्या 25 डिसेंबर रोजी होणार्‍या पोस्ट कोड 965 जेओए आयटी भरतीच्या लेखी परीक्षेच्या दोन दिवस अगोदरच प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या. पोलिसांकडे हे प्रकरण गेले असून, आयोगाने ही परीक्षाच रद्द केली. बिहारमध्ये बीएसएससी तृतीय वर्षाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षार्थी परीक्षा केंद्रात गेल्यानंतर त्वरित बाहेर आली. ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. हीच परीक्षा दोन दिवसांपर्यंत दोन-दोन शिफ्टमध्ये होणार होती. या परीक्षेसाठी 9 लाखांपेक्षाही अधिक परीक्षार्थी बसले होते. या रिक्त जागांची जाहिरात तब्बल आठ वर्षांनंतर आली होती.

पेपरफुटीची वाढती प्रकरणे हा शैक्षणिक क्षेत्रातील सर्वाधिक चिंतेचा विषय बनला आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये उत्तर प्रदेश शिक्षक पात्रता परीक्षेचे (यूपीटीईटी) पेपर लीक झाल्यानंतर बराच गोंधळ उडाला होता. त्यामुळे ही परीक्षाच रद्द करण्यात आली होती. 2021 मध्ये राजस्थानमध्ये रिट-2021 चा पेपर लीक झाल्याने खूप गोंधळ उडाला होता. राजस्थानमध्ये 40 पेक्षा अधिक परीक्षामाफिया सक्रिय असल्याचे बोलले जाते. त्यांच्याकडील लोक डमी विद्यार्थी शोधतात. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका सॉल्वर शोधणे, हायटेक उपकरणांची खरेदी करणे, सेंटरमधून प्रश्नपत्रिका लीक करण्यासाठी त्यांना तयार करणे अशी कामे हे लोक करतात. राजस्थानमध्ये गेल्या 11 वर्षांपासून 38 पेक्षा अधिक मोठ्या परीक्षांचे पेपर लीक झाले आहेत. नुकतेच नीट व एसआय भरतीचे पेपरसुद्धा लीक झाल्याची बाब समोर आली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये हरियाणा पोलिस शिपाई भरतीचा पेपर लीक झाला होता. याप्रकरणी इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते आणि विधिमंडळातील माजी विरोधी पक्षनेते अभय चौटाला यांनी मीडियासमोर म्हटले होते की, सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात भरती परीक्षेचे पेपर लीक होण्याच्या घटना 28 वेळा घडल्या आहेत.

वर्ष 2017 मध्ये यूपीमध्ये पोलिस उपनिरीक्षकपदाच्या ऑनलाईन परीक्षेसाठी राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र निर्माण केले गेले होते. 25 आणि 26 जुलैला जवळपास 1 लाख 20 हजार परीक्षार्थी या परीक्षेला बसणार होते. मात्र, प्रश्नपत्रिकाच फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. 2 फेब्रुवारी2018 रोजी यूपीपीसीएल पेपर लीकचे प्रकरण समोर आल्याने ज्युनिअर इंजिनिअर (जेई) परीक्षा रद्द करण्यात आली होती. जुलै 2018 मध्ये अधिनस्थ सेवा चयन बोर्ड परीक्षेचा पेपर लीक झाला होता. 2 सप्टेंबर 2018 रोजी निवड आयोगाच्या ऑपरेटर भरतीसाठी होणारा पेपर लीक झाला होता.

पेपरफुटीबरोबरच देशात कॉपीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरला आहे. मोठमोठे कोचिंग सेंटर आणि प्रभावशाली लोकांमध्ये साटेलोटे असते. मात्र, अशांना पकडल्यानंतरही कडक कारवाई केली जात नाही. राजस्थानमध्ये गेल्या 11 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी पेपर लीक होण्याच्या सरासरी 150 केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षा एकालाही झालेली नाही.

त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, परीक्षांशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या साटेलोटे असल्यामुळे अशा प्रकारे प्रश्नपत्रिका लीक होऊ शकतात का? अनेक प्रकरणे समोर येऊनही त्या त्या राज्यातील पोलिस यंत्रणा या समस्येच्या मुळापर्यंत अजूनही पोहोचलेली नाही. प्रत्येक वेळेला असे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, काही दिवसांतच हे आश्वासन हवेत विरून जाते आणि नवीन प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण समोर आल्यावर हे लोक पुन्हा जागे होतात. पेपर लीक होणे ही दुर्दैवी बाब आहे; शिवाय परीक्षार्थींचीही एकप्रकारे विडंबनाच आहे. त्यांच्या इच्छाआकांक्षा पायदळी तुडवल्या जातात. तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करून पेपर लीक होणार्‍या घटनांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. त्यामुळे पेपर सेट करणे आणि पेपर परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवणे या दरम्यान कमीत कमी लोकांचा सहभाग राहू शकतो. परिणामी, पेपर लीक होण्याची शक्यता कमी होऊ शकते. मात्र यासाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर विकसित होणे गरजेचे आहे. कारण प्रश्न लाखो युवकांच्या भविष्याचा आणि त्यांच्या स्वप्नांचा आहे.

– कमलेश गिरी

Back to top button