अर्जेंटिनाच! | पुढारी

अर्जेंटिनाच!

अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप जिंकला अन् महान फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. महिनाभर रंगलेला फिफा वर्ल्डकप म्हणजे जागतिक क्रीडा विश्वाचा कुंभमेळाच. कुठे रात्र होती, कुठे दिवस; परंतु सगळ्या जगाचे कॅलेंडर आणि घड्याळ एक बनले होते. अवघे जग फुटबॉल सामन्यांच्या वेळापत्रकावर चालले होते. दिवस सरतील आणि रात्र चढत जाईल तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचत होती. अनेकांच्या स्वप्नांना नवा आकार मिळत असताना काहींच्या स्वप्नांचा चक्काचूरही होत होता. आपले आवडते हिरो आणि त्यांचे संघ धारातीर्थी पडत असतानाही चाहत्यांची उत्सुकता तसूभर कमी होत नव्हती, हेच या खेळाचे सौंदर्य. मेस्सीच्या अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकून या उत्सवाचा आनंद परमोच्च बिंदूवर नेला.

सलग दुसर्‍यांदा फिफा वर्ल्डकप जिंकण्याचे फ्रान्सचे स्वप्न उद्ध्वस्त करून अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षांनी विश्वचषकावर नाव कोरले. केवळ अर्जेंटिनाच नव्हे, तर जगभरातील फुटबॉल शौकिनांच्या आशा केंद्रित झाल्या होत्या त्या लियोनल मेस्सीभोवती. फुटबॉल जगतातील या महान खेळाडूचा हा अखेरचा वर्ल्डकप होता आणि त्याच्या कारकिर्दीत अर्जेंटिनाने फिफा वर्ल्डकप जिंकावा, अशा सदिच्छा जगभरातील शौकिनांकडून व्यक्त होत होत्या. त्या अपेक्षांची पूर्ती करीत मेस्सीने विजयात मोलाचा वाटा उचललाच; परंतु आपल्या कारकिर्दीत देशाला विश्वचषक मिळवून देण्याचा महापराक्रमही घडवला.

जगभरात फुटबॉलची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की, त्याच्या जवळपासही अन्य कोणता खेळ पोहोचू शकत नाही. भारतासारख्या देशात क्रिकेट हा धर्म मानला जातो; परंतु इथेही गेले महिनाभर कोट्यवधी शौकिनांनी रात्री जागवल्या, त्यावरून त्याच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते. जगभरातील सुमारे दोनशे देश फुटबॉल खेळतात आणि या देशांच्या क्रमवारीत भारत 106 व्या क्रमांकावर येतो. असे असतानाही भारतातील कोल्हापूरसारख्या छोट्या शहरापासून कोलकातासारख्या महानगरापर्यंत जो फुटबॉल ज्वर पाहायला मिळतो तो फ्रान्स, इटलीपेक्षा जराही कमी नसतो. अर्जेंटिना, पोर्तुगाल किंवा फ्रान्समध्ये सापडणार नाहीत तेवढे मेस्सी, रोनाल्डो किंवा एम्बाप्पे यांचे कट्टर चाहते भारतातील छोट्या-छोट्या खेड्यांतूनही पाहायला मिळतील.

अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकण्याबरोबरच मोरोक्कोसारख्या आफ्रिकन देशाने अनेकांना धक्के देत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारावी हीसुद्धा या विश्वचषकातील एक उल्लेखनीय बाब म्हणून नोंद करावी लागेल. मेस्सी आणि रोनाल्डो हे दोघेही महान खेळाडू आणि त्यांचे चाहतेही कोट्यवधींच्या संख्येने आहेत. सामूहिक खेळांमध्ये अशा वलयांकित खेळाडूंच्या कर्तृत्वाचेही मोजमाप होत असते. त्याअर्थाने पाहिले तर मेस्सीने अर्जेंटिनाला दोनवेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले आणि यावेळी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. रोनाल्डोने आपल्या पोर्तुगाल संघाला युरो चॅम्पियन बनवले असले तरी एकदाही विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत नेण्यात यश आलेले नाही.

खेळ वेगवेगळा असला तरी जगातील महान खेळाडूंच्या आयुष्यात अनेक साम्यस्थळे असतात. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने क्रिकेटचा विश्वचषक जिंकला त्यावेळच्या भावना आणि अर्जेंटिनाने यंदाचा फिफा वर्ल्डकप जिंकला त्यावेळच्या भावना साधारणपणे सारख्याच होत्या. कारण, यावेळी सगळ्यांच्या प्रार्थना मेस्सीसाठी एकवटल्या होत्या आणि क्रिकेट विश्वचषकावेळी त्या सचिन तेंडुलकरसाठी एकवटल्या होत्या. जगातील सार्वकालिक महान खेळाडू, अशी ओळख निर्माण केलेल्या सचिनला आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकून देता आला नसल्याची खंत होती. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बल बावीस वर्षांनी भारताला विश्वचषक जिंकण्यामध्ये यश आले होते. त्यावेळीही युवराज सिंगसह अनेक खेळाडूंनी आपण सचिनला विश्वचषकाची भेट देण्यासाठी खेळल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. फिफा वर्ल्डकपच्या निमित्ताने त्याच अनुभवाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. त्यावेळी होता सचिन तेंडुलकर आणि यावेळी त्याच्याजागी होता लियोनल मेस्सी.

भारताच्या सुनील छेत्रीपासून सर्वसामान्य फुटबॉल शौकिनांसह अनेकांनी मेस्सीला विश्वचषक उंचावताना बघण्याचे स्वप्न पाहिले होते. 2014 साली भंगलेल्या स्वप्नाची पूर्तता करताना या विश्वविजेतेपदामध्ये दस्तुरखुद्द मेस्सीने दिलेले योगदानही सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगे ठरले. मेस्सीला गोल्डन बूटचा सन्मान मिळाला नाही, तरी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठीच्या गोल्डन बॉलचा तो मानकरी ठरला. मेस्सीने या संपूर्ण स्पर्धेत सात गोल केले आणि अनेक अटीतटीच्या प्रसंगांमध्ये सहकारी खेळाडूंचे गोल करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात दोनवेळा गोल्डन बॉल जिंकणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला.

2014 ला अर्जेंटिनाने अंतिम फेरीत धडक मारली होती, त्यावेळीही मेस्सी गोल्डन बॉलचा मानकरी ठरला होता. लियोनल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो या दोघांनीही दोन दशकांहून अधिक काळ फुटबॉल जगतावर आपली मोहिनी घातली आहे. दोघांचेही चाहते आपल्या लाडक्या खेळाडूंना ‘ग्रेट ऑफ ऑल टाइम’ (गोट) संबोधतात; परंतु यंदाच्या विश्वचषकाने त्याचाही फैसला केला असून, रोनाल्डोला बरेच मागे टाकून लियोनल मेस्सी ‘ग्रेट ऑफ ऑल टाइम’ ठरला आहे. गतविजेत्या फ्रान्सची यंदाच्या विश्वचषकातील कामगिरीही लौकिकाला साजेसी होती.

गोल्डन बूटचा मानकरी ठरलेल्या किलियन एम्बाप्पेच्या चमत्काराने अंतिम सामन्यात फ्रान्सच्या चाहत्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. ऐंशीव्या मिनिटापर्यंत एकतर्फी वाटणार्‍या अंतिम सामन्यात केवळ 97 सेकंदांच्या फरकाने एम्बाप्पेने डागलेले दोन गोल सामन्याचे चित्र पालटणारे ठरले; परंतु अंतिम निर्णायक क्षणांमध्ये फ्रान्सच्या युवा खेळाडूंनी घेतलेले दडपण आणि अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझची एकाग्रता यामुळे सामन्याचे चित्र पालटले. पहिल्या सामन्यात सनसनाटी पराभवाचा सामना करावा लागलेल्या अर्जेंटिनाने त्याच सनसनाटीपणाचा अनुभव देत अंतिम सामना जिंकला. सामूहिक खेळातही जगाला एक हिरो लागतो आणि यंदाच्या वर्ल्डकपचा हिरो निर्विवादपणे मेस्सी ठरला आहे.

Back to top button