लवंगी मिरची : सार्वजनिक व्यवस्थेचा आधार | पुढारी

लवंगी मिरची : सार्वजनिक व्यवस्थेचा आधार

उद्या पाचला नक्की जमायचं हं.
बघतो बुवा. वेळ पाळायला हवी हे खरं; पण अगदी अचूक पाचचा ठोकाबिका गाठण्याचा प्रॉब्लेम आहे.
एकदा ठरवलं की, प्रॉब्लेम कसला?
एखादी गाडी पावली पाहिजे ना राव.
आताच गाडीची अडचण कशी काय राव, वाहतूक व्यवस्था वाढली आहे, गाडी नक्कीच मिळणार की!
बाबो, तुमचा वाहतूक व्यवस्थेबाबत खूपच चांगला अनुभव दिसतोय बुवा!
त्यात काय चांगलं अन् वाईट असायचंय?
नाही हो. एखादी गाडी थांबणे आणि त्याच्या चालकाने आपल्याकडे लक्ष देणे, कुठेही जायची तयारी दाखवणे, वाटेत गाडी बंद न पडणं, गाडीत पुरेसं इंधन असणं, दीडक्या मोजताना जरूर तेवढे सुटे पैसे रिक्षावाल्याकडे असणं या गोष्टी नशिबात असाव्या लागतात.
मी नशीबबिशीब म्हणणारा दैववादी नाही.
वारंवार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आम्हाला आधार घ्यावा लागतो.
तुमचा फारच विश्वास आहे बुवा.
वाहतूकवाले मला अनेकदा अगतिक करत गेलेत ना म्हणून. कोणीकोणी तर आपण प्रवास करत नसून आपणच आपल्यावर उपकार करतोय असे वाटते.
तुम्ही जरा जास्तच ताण घेताय? अहो, आपल्याला नेहमीच सर्वात अधिकवेळा सार्वजनिक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागतो.
बघा बुवा. मला तर ते त्यातल्या त्यात स्वस्त आणि कुठेही उपलब्ध असणारे साधन वाटतं!
इंधन दरवाढीमुळे एकतर ही व्यवस्था फार स्वस्त काही राहिलेली नाही
ही व्यवस्था कोणालाही, कुठेही सहज मिळेल अशी धारणा होत चाललीये दिवसेंदिवस.
त्यांना त्यांच्या समस्या आहेत. म्हणून तर संप केला ना त्यांनी.
नुसता संप नाही, हाल होतात लोकांचे. म्हातारे लोक, लांबचा प्रवास करून स्टेशनवर आलेले लोक, गरोदर किंवा लेकुरवाळ्या बाया यांनी अशा एखाद्या सोयीशिवाय कशी आवजाव करावी हो?
ही जबाबदारी सरकारची आहे, नगरपालिका, नगरपरिषदा यांची आहे.
आहे ना, वादच नाही; पण म्हणून रिक्षावाल्यांची काहीच जबाबदारी नाही का? अत्यावश्यक सेवावाले संप कसे करू शकतात? चंद्र-सूर्य, ग्रह-तारे, उजेड-अंधार कधी संपावर जातात का?
ग्रहणं वगैरे लागतात तेव्हा काय होतं?
ती अगोदर ठरवून, ठरलेल्या वेळी, म्हणजे नियमानुसार लागतात. उगाचच अवचित संप जाहीर करून लोकांची कोंडी करणं नसतं ते!
आता नवनव्या, उडत्या वाहनसेवा येऊन त्यांच्या पोटावर पाय आणतात, धंद्यावर संकट आणतात, म्हणून मधूनच एखादवेळी असा उद्रेक होत असावा मला वाटतं.
बघा बुवा. ‘करावे तसे भरावे’ ही म्हण जुनीच आहे. सार्वजनिक वाहतूकवाल्यांनी खूपदा जनतेला वेठीला धरलंय. याची किंमत मोजावी आणि यापुढेतरी ही वाहतूक सेवा सुरळीत चालावी ही अपेक्षा
खरं आहे, सामान्य जनतेला या व्यवस्थेचा आधार आहे.
खरंतर देशात वाहनांची संख्या खूपच वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण झाली आहे. विकसित देशांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला जातो. मात्र, आपल्याकडे नाही!
खरे आहे. रस्त्यांवर गर्दी रोखण्यासाठी या व्यवस्थेचा सर्वांनी स्वीकार करावा. अर्थात, ते सर्वांचे कर्तव्य आहे ना!
नक्कीच, वाहतूक कोंडीतून मार्ग हा एक उत्तम पर्यायच म्हणावा लागेल.

Back to top button