लवंगी मिरची : पार्किंगचा झोल, वाहनाचं मोल | पुढारी

लवंगी मिरची : पार्किंगचा झोल, वाहनाचं मोल

अहो काका, मी जरा तुमच्या अंगणात गाडी लावून कामाला बाहेर जाऊ का?
किस खुशीमें? कुठे जायचंय?

खुशीमें कुठलं? असं सगळं नाखुशी में करतोय हो. हल्ली कुठेही जायचं म्हटलं की, आपलं वाहन कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्न पडतो. आता खरं म्हणजे मला तिकडे गांधी मार्केटमध्ये जायचंय, पोराला स्वेटर आणायला!
गांधी मार्केट? पहिल्यांदा जाताय का तिथे? अहो, ते इथून खूप लांब आहे. गाडीने आलायत तर त्या मार्केटच्या शक्य तेवढे जवळ तरी जा!
कसा जाऊ? त्याच्या जवळचे बहुतेक रस्ते नो पार्किंगच्या पाट्या मिरवत असतात.

त्या मार्केटचं अधिकृत पार्किंग असेल की.
असेल, पण त्याबाहेर ‘पार्किंग फुल्ल’ची पाटी झळकत असेल. ती कायमची रंगवूनच ठेवलीये तिथे. रोज खडूने लिहायचा त्रास नको म्हणून.
मग जवळपासच्या गल्ल्यांमध्ये गाडी ठेवण्यापुरती जागा बघा की राव.
कुठून आणि कशी बघू? त्या गल्ल्यांमध्ये अनेक मोडकी, मोडीत काढण्याजोगी वाहनं परमनंट ठेवलेली असतात, उरलेल्या जागा मोकाट

संबंधित बातम्या

गायीगुरं वापरतात. आपल्यासारख्याला कुठली जागा मिळायला?
राहिलं, पण म्युनिसिपालटीचे बांधीव कारपार्क तर असतील त्या भागात.
असतील, पण त्यांना कसं हिशेबात धरायचं हो? कोणाची जागा? कोण सांभाळतं? कोण पावत्या फाडतं? जमा झालेली पार्किंग फी कोणाच्या खिशात जाते? काही, काही समजत नाही त्यातलं. सगळा रामभरोसे कारभार असतो तिथे गाडी ठेवणं म्हणजे!

गाडी ठेवल्यावर पावती वगैरे मिळत असेल ना?
मिळते एखाद्या चिटोर्‍याच्या रूपात.तिथे फिरणारी पोरंटोरं, पेनानं काहीतरी खरडून, एकेक चिटोरं आपल्या हाती कोंबतात फक्त! त्यावर गाडीचा नंबर, वेळ वगैरे लिहायचे कष्ट कोण घ्यायला बसलंय?
बरोबर आहे.
बरोबर आहे? हे असं कसं म्हणता तुम्ही?
नाहीतरी ‘स्वतःच्या जबाबदारीवर वाहन लावून जा’ अशा अर्थाच्या पाट्या लावलेल्या असतातच ना बाहेर? मग काहीही खरडून कसलीही

पावती दिली काय, न दिली काय, सारखंच की सगळंं.
ही असली जबाबदारी? ह्याला काय अर्थ आहे काका? शेवटी नशिबावर हवाला ठेवून, उद्या ‘नो पार्किंग’मध्ये दणकावून गाडी लावून गेलं की, मेलेल्या ढोरासारखी आपली गाडी फरफटत ओढून न्यायला म्युनिसिपालटीवाले तयारच असणार. त्यांनी तिची वाट लावलेलं आपण गहिवरून बघायचं आणि तिच्या दुरुस्तीवर अजून पैसे ओतायचे.
खरंय. स्वतःची चांगली वाहनं बाळगणं हा गुन्हाच म्हणायचा आताच्या काळात.
मग काय बैलगाड्या बाळगायच्या? की माणसांनी पूर्वीच्या त्या यक्ष, किन्नरांसारखं पंख लावून फिरायचं?

त्यापेक्षा घरी बसणंच बरं.
अहो काका, दिवसेंदिवस गावं प्रचंड मोठी होताहेत, माणसांना कुठूनही कुठेही कामाला जावं लागतंय. वेळ गाठणं, वेळ वाचवणं प्रत्येकाला भाग आहे. अशात वाहनांचं मोल न ओळखता पार्किंगचा झोल होणं, हे तद्दन चुकीचं आहे हो.

मग ह्यावर उपाय काय?
एकतर शहराचे, रस्त्यांचे कर घेणार्‍यांनी वाहनतळांची नीट सोय करावी. नाहीतर वाहनं बनवणार्‍यांनी घडी घालून पिशवीतून नेण्याजोगी वाहनं बनवावीत.
वाहनं कशी हो खिशातून, थैलीतून नेता येतील?
नाही येणार ना? मग पार्किंगचे प्रश्न ऐरणीवर घ्या म्हणावं. अगदी आगामी निवडणुकांवरही त्याची छाया पडू शकते म्हणावं!

 

Back to top button