लवंगी मिरची : बंदी की संधी? | पुढारी

लवंगी मिरची : बंदी की संधी?

बाबुराव, ह्या मोबाईलने अगदी डोकं उठतंय बुवा दिवसेंदिवस.
का? रेंजचा प्रॉब्लेम का आबुराव?
नाय हो. घरातली पोरंबाळं सारखी त्यात डोकं घालून बसलेली असतात म्हणून उठतं माझं डोकं.
तो प्रश्न आता घराघरांत आहे, एकदा मुलामुलीने मोबाईलमध्ये डोकं खुपसलं की, त्याला दुसरं काही दिसत नाही, भासत नाही, ऐकू येत नाही, कशातही लक्ष घालावंसं वाटत नाही.
काय सांगायचं? नातवाला तीनचारदा हुसकलं, म्हटलं, नळाला पाणी आलंय का ते जाऊन बघ. तर एवढंही आजोबासाठी करायची ह्याची तयारी नाही.
वृद्ध दिन, कुटुंब दिन वगैरेंना तुमचे फोटो टाकत असेल ना पठ्ठ्या त्याच्या शेकडो ग्रुप्सवर?
टाकतो तर. वर काहीतरी, आमचे श्रद्धास्थान, आमचे स्फूर्तिस्थान वगैरे गौरवपर लिहायलाही विसरत नाही तो. व्यवहारात मात्र माझ्याकडे एखादी नजर टाकायलाही वेळ नसतो त्याला! हा मोबाईल म्हणजे शत्रू झालाय आमच्यासारख्यांचा.
मग सोपा उपाय आहे. बांसीला जा.
वाशीला? नव्या मुंबईत?
वाशी नाही हो, बांसी. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातलं गाव आहे ते!
तिथे जाऊन काय करू आणखी?
बाकी काहीही करा, करू नका. मोबाईलची तक्रार तरी करू शकणार नाही तिथून.
का? तिथला मोबाईल टॉवर पडला?
नाही नाही. एवढं रम्य काही झालं नाहीये. मात्र, त्या बांसी ग्रामपंचायतीने भयंकर क्रांतिकारी नियम काढलाय. 18 वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी!
अशी बंदी कोणी घालू शकतं? आजच्या काळात?
असं दिसतंय. 11 नोव्हेंबरला तिथल्या ग्रामसभेत चर्चा होऊन हा नियम निघालाय.
पोरं धाब्यावर बसवतील असले नियम, पुस्तकात लपवलेला मोबाईल कसा वाचावा .
नियम मोडणार्‍यांना दंडही आहेच. जी अल्पवयीन मुलं मोबाईल वापरताना दिसतील, त्यांना दंड! तेवढ्यानेही सुधारलं नाही तर त्यांच्या पालकांची घरपट्टी वाढविण्यात येईल.
हे बेश्ट काम केलं त्यांनी; पण एकदम एवढं टोक गाठायची वेळ का आली?
झालं असं की, कोरोना काळात पोरांची शिक्षणं उगाच मागे राहू नयेत म्हणून पालकांनी कर्जं काढूनसुद्धा मोबाईल फोन घेऊन दिले मुलांना. ऑनलाईन शाळा असायच्या ना तेव्हा! पुढे कोरोना गेला, शाळा लायनीवर आल्या; पण पोरं काही लायनीवर येईनात.
ती कसली येताहेत? तोवर व्यसनच लागलं असणार त्यांना मोबाईलचं. मोबाईल हेच त्यांचं क्रीडांगण, हाच त्यांचा सिनेमाचा पडदा.
नुसतं तेवढंच नाही. हातात मोबाईल आल्यावर चावट साईट्स, प्रौढांचे सिनेमे, पिवळे सिनेमे हे पण पाहिलं जाणारच की!
तसंच झालं. पालक हैराण झाले.असल्या भलत्या नादाने पोरांचं पुढे काय होणार म्हणून आपापसात चिंता करायला लागले. गावातले शिक्षक, पालक, सरपंच वगैरेंनी खूप चर्चा करून हा निर्णय घेतला.
चांगला प्रयोग. परिणाम काय होतोय बघायचं.
बघायचंय काय वेगळं? बंदी आली.
त्याचीच खात्री नाही वाटत मला. बंदी घातलेली गोष्ट तर ह्या वयातली मुलं काहीही करून बघणारच. आपण विडी, सिगारेट लहान वयातच ओढून पाहिली की नाही?
शूऽऽऽ हळू बोला. बोलतो हळू, पण पॉईंट लक्षात घ्या. मोबाईलमुळे मुलांना चांगले फायदेही मिळालेतच ना? असल्या नियमांमुळे ते गमवायचे का? हा विचारही करायला हवा.
– झटका

Back to top button