गुजरातमध्ये नात्यातील लक्षवेधी लढती… | पुढारी

गुजरातमध्ये नात्यातील लक्षवेधी लढती...

गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर असे दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे. यातील काही लढती उत्कंठावर्धक ठरण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. हे मतदारसंघ असे आहेत की, तिथे एकाच कुटुंबातील लोक उमेदवार म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या मतदारसंघांत कोणताही उमेदवार विजयी झाला, तरी तो सगळा घरचाच मामला ठरणार आहे.

झागाडिया : झागाडिया हा मतदारसंघ त्यापैकीच एक आहे. या मतदारसंघात भारतीय ट्रायबल पार्टी अर्थात बीटीपीचे संस्थापक छोटूभाई वसावा यांच्या विरोधात त्यांचे पुत्र महेश वसावा यांनी शड्डू ठोकलेला आहे. झागाडिया हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. आदिवासी समाजात छोटूभाई आणि महेश या दोघांचीही चांगली पकड आहे. त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने कौल टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलासोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून पिता-पुत्रादरम्यान मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर मतभेदाची दरी वाढतच गेली होती. छोटूभाई वसावा यांनी झागाडियामध्ये आतापर्यंत सातवेळा विजय मिळवलेला आहे, हे विशेष!

अंकलेश्वर : औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या अंकलेश्वर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री ईश्वरसिंग पटेल यांची लढत त्यांचे बंधू विजयसिंग पटेल यांच्याशी होत आहे. अंकलेश्वर मतदारसंघातून चारवेळा निवडून आलेले ईश्वरभाई हे भाजप सरकारमध्ये सहकार आणि क्रीडामंत्री होते. बंधू विजयसिंग हे त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. कोली-पटेल समाजात प्रस्थ असलेल्या विजयसिंग यांच्यामुळे ईश्वरसिंगांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. विजयसिंग यांनी गेल्यावर्षी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मोरबी : दिवाळीच्या काळात पूल कोसळून असंख्य लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मोरबी शहर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पूल कोसळल्यानंतर मदतकार्यात अग्रेसर असलेल्या कांतिभाई अमृतिया यांना भाजपने यावेळी तिकीट दिले आहे. कांतिभाई यांची लढत काँग्रेससोबत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराशी होत आहे. ‘आप’ने ज्यांना तिकीट दिले आहे, ते पंकज रणसरिया हे कांतिभाईंचे पुतणे आहेत. मोरबीमध्ये गतविधानसभा निवडणुकीवेळी बृजेश मेरजा यांनी कांतिभाईंचा पराभव केला होता. मोरबी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेच्या परिणामी मेरजा यांचे तिकीट कापण्यात आल्याची मतदारसंघात जोरदार चर्चा आहे. त्या दुर्घटनेत तब्बल 135 लोकांचा मृत्यू झाला होता.

भुज : सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवाराने भुज मतदारसंघात विजय मिळवला होता. 2007 मध्ये येथून वासनभाई अहिर यांनी, तर 2012 आणि 2017 मध्ये डॉ. नीमाबेन भावेशभाई यांनी विजय मिळवला होता. गतवेळी भावेशभाई यांनी काँग्रेसच्या चाकी आदमभाई बुढाभाई यांचा 14 हजार मतांनी पराभव केला होता. भुजची बरीचशी सीमा पाकिस्तानला लागून असल्याने हा मतदारसंघ संवेदनशील मानला जातो. आम आदमी पक्षाने या मतदारसंघातून राजेश पंडोरिया यांना तिकीट दिले आहे. आम आदमी पार्टीच्या प्रवेशामुळे या मतदारसंघाची निवडणूक उत्कंठावर्धक बनली आहे.

थराड : बनासंकाठा जिल्ह्यातील थराड मतदारसंघात भाजपने शंकर चौधरी यांना संधी दिली आहे. गतवेळी वाव विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. चौधरी यांनी वयाच्या 27 व्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांच्या विरोधात पहिली निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते पराभूत झाले होते. मात्र, 1998 मध्ये राधनपूर मतदारसंघात विजय मिळवत त्यांनी आपले खाते उघडले होते. बनास डेअरीचे अध्यक्ष म्हणून असलेल्या चौधरी यांची लढत काँग्रेसच्या गुलाबसिंग राजपूत आणि आम आदमी पक्षाचे वीरचंदभाई छावडा यांच्याशी होत आहे.

दंता : अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या दंता मतदारसंघावर मागील काही दशकांपासून काँग्रेसचा दबदबा आहे. 1998 पासून सलग पाचवेळा काँग्रेसच्या उमेदवाराने येथून विजय मिळवलेला आहे. गतवेळी काँग्रेसच्या कांतिभाई खराडी यांनी भाजपच्या कोदरवी नारायणभाई यांचा दणदणीत पराभव केला होता. यावेळी मात्र आम आदमी पक्षाच्या उमेदवारामुळे काँग्रेससमोर आव्हान निर्माण झाले आहे. ‘आप’ने एम. के. बोम्बाडिया यांना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसने यावेळी खराडी यांनाच संधी दिली असून भाजपकडून लालुभाई पारघी हे निवडणूक लढवित आहेत.

– पार्थ ठक्कर

Back to top button