विश्वविजेता इंग्लंड | पुढारी

विश्वविजेता इंग्लंड

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद दुसर्‍यांदा जिंकून इंग्लंडने क्रिकेट जगतातले आपण किंग असल्याचे सिद्ध केले आहे. क्रिकेटचा जनक म्हणून इंग्लंडला ओळखले जाते; परंतु ज्या देशांवर इंग्लंडने राज्य केले, त्याच देशांनी त्याला अनेकदा मात दिल्याचे अलीकडच्या काळात दिसून येते. मधल्या काळात या देशाचा क्रिकेट जगतातला दबदबा काहीसा कमी झाल्यासारखे वाटत होते; परंतु एकदिवसीय विश्वचषकापाठोपाठ टी-20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकून तो पुन्हा निर्माण केला आहे.

त्यातही पुन्हा उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला ज्या नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जायला लावले आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले, त्यावरून संघाचे गुणवत्तेतले सातत्यही सिद्ध होते. सर्वोत्तम खेळ करत क्रिकेट जगतात आपण सर्वोत्तम असल्याचे इंग्लंडने सिद्ध केले. भारत हा विश्वचषकाचा संभाव्य विजेता मानला जात होता आणि पाकिस्तानला नशिबाने साथ दिली तर अंतिम सामना या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होईल, असेही अंदाज वर्तविले जात होते.

याचे कारण क्रिकेटसंदर्भात गेल्या काही वर्षांत निर्माण झालेले संशयाचे वातावरण. मॅच फिक्सिंग रोखण्यासाठी आयसीसीने कठोर लक्ष ठेवले असले तरीसुद्धा या खेळात विशेषतः टी-20 सामन्यांमध्ये अनेकदा निकाल ठरवलेले असतात, अशी सर्वसामान्य क्रिकेट रसिकांची धारणा आहे. अर्थात, एखादा खेळाडू संथ खेळला, लवकर बाद झाला किंवा एखाद्या गोलंदाजाने खराब गोलंदाजी केली म्हणून तेवढ्यावर सामन्याचा निकाल बदलत नसतो. कधीकधी चार-दोन चेंडूही निर्णायक ठरू शकतात; परंतु खूपदा ठरवूनही अनेक गोष्टी होत नसतात. दोन बलाढ्य संघ समोरासमोर असतील तरच प्रत्यक्ष मैदानात क्रिकेट रसिकांचा प्रतिसाद मिळू शकतो आणि दूरचित्रवाणीवरही कोट्यवधींच्या संख्येने रसिक सामना पाहू शकतात.

स्वाभाविकपणे जेवढे अधिक प्रेक्षक तेवढा अधिक प्रतिसाद आणि तेवढ्या अधिक जाहिराती आणि तेवढे अधिक उत्पन्न, अशी साखळी असते. ही साखळी मजबूत राखण्यासाठी आणि जगभरातील जास्तीत जास्त लोकांनी सामना पाहावा यासाठी अंतिम फेरीतील संघ निश्चित केले जात असतात, असा अनेकांचा गैरसमज असतो. मॅच फिक्सिंगविरोधात आयसीसीने कठोर भूमिका घेतलेली असतानाही लोकांच्या मनातील हा भ्रम दूर होत नाही. उपांत्य फेरीतही पोहोचण्याची शक्यता नसणार्‍या पाकिस्तानने तिथपर्यंत मजल मारली आणि शेवटी अंतिम फेरीतही धडक मारली तेव्हा तर अनेकजण स्वतःच व्यक्त केलेल्या अंदाजावर खूश झाले. उपांत्य सामन्यात इंग्लंडला हरवून भारत सहज अंतिम फेरीत पोहोचणार आणि शेवटी भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत होणार, असे चित्र रंगवले जाऊ लागले. मात्र, इंग्लंडने भारताला हरवत कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला!

खेळामध्ये जय-पराजय असतात आणि जसे सामने चुरशीचे होतात, तसेच एकतर्फीही होऊ शकतात. टी-20 क्रिकेटमध्ये खेळाडूंचा आणि संघाचाही कस लागत नाही. इतके वेगवान क्रिकेट या प्रकारामध्ये खेळले जाते की, कसोटीत शतकांच्या राशी रचणार्‍या खेळाडूला टी-20साठी अपात्र ठरवले जाते. एक प्रकारचा बाजारूपणा या प्रकाराने क्रिकेटमध्ये आणला. तरुणांनी टी-20 खेळावे, मध्यमवयीनांनी 50 षटकांचे सामने खेळावेत आणि ज्येष्ठ खेळाडूंनी कसोटी सामने खेळावेत, अशीच धारणा बनली आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासारखे मोजकेच खेळाडू असतात की, जे तिन्ही प्रकारच्या संघात असू शकतात; परंतु त्यांनाही शेवटी शेवटी ठराविक प्रकारांमधून बाजूला होण्याच्या सूचना दिल्या जातात.

विशिष्ट टप्प्यानंतर रंगीबेरंगी कपड्यांचे क्रिकेट त्यांच्यासाठी दुष्प्राप्य बनते आणि सफेद कपड्यातील कसोटी क्रिकेटपुरतीच कारकीर्द मर्यादित बनते, जे खरेखुरे क्रिकेट असते. दुसरीकडे टी-20 खेळणारे 50 षटकांच्या सामन्यात खेळण्याची स्वप्ने पाहात असतात आणि 50 षटकांच्या सामन्यांत खेळणारे कसोटी क्रिकेटचे स्वप्न पाहात असतात. 50 षटकांच्या सामन्यात आणि कसोटीतही खेळाडूंचा खरा कस लागत असतो, जो टी-20मध्ये लागत नाही. टी-20 मध्ये एखादे निर्धाव षटक किंवा मोक्याच्या वेळी घेतलेला एखादा बळीही सामन्याचा निकाल पालटू शकतो.

एखाद्या खेळाडूने एखादेच षटक खेळून तीसेक धावा फटकावल्या तर तेही निर्णायक ठरू शकते आणि असा चमत्कार सलामीचा फलंदाजही करू शकतो आणि दहाव्या-अकराव्या क्रमांकावरचा फलंदाजही करू शकतो. त्यामुळे यातील जय-पराजयावरून खेळाडूंचे मूल्यमापन करणे रास्त नसते. विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांनी जे सातत्य फलंदाजीत दाखवले, ते कौतुकास्पद ठरते; त्याचवेळी सातत्याने अपयशी ठरणार्‍या के. एल. राहुलला दिलेली संधी टीकेचा विषय ठरणेही स्वाभाविक. सुरुवातीच्या षटकांमध्ये झटपट दोन बळी मिळवून वर्चस्व मिळवून देणार्‍या गोलंदाजाला अखेरच्या हाणामारीच्या षटकात धुतले गेल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे टी-20 मधील एखाद्या दुसर्‍या खेळीवरून मूल्यमापन करणे योग्य ठरत नाही. भारताने एकूण मालिकेत चांगला खेळ केला, त्याचमुळे उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली गेली, हे विसरून चालणार नाही.

के. एल. राहुलबरोबरच कर्णधार रोहित शर्माचे फलंदाजीतील अपयशही नजरेत भरणारे होते, आणि पराभवानंतर तर ते अधिकच डोळ्यावर आले. आयपीएलमध्ये खोर्‍याने धावा ओढणारे, सूर मारून झेल घेणारे, जीव तोडून गोलंदाजी करणारे खेळाडू भारतीय संघातून खेळताना तेवढे समर्पण दिसत नसल्याची टीका केली जाते. अशा टीकेला काही अर्थ नसतो; परंतु सातत्याने दिसलेल्या गोष्टींमधून चाहते निष्कर्ष काढत असतात. टी-20च्या उपांत्य सामन्यात भारताला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला, त्यामुळे सध्या फक्त दोषांच्या उजळणीचाच काळ आहे. पुढच्या सामन्यात, मालिकेत विजय मिळेपर्यंत हा पराभव भारतीय संघाचा पाठलाग करीत राहील.

Back to top button