शेळी-मेंढीच्या दुधाचे चीज ठरते गुणकारी | पुढारी

शेळी-मेंढीच्या दुधाचे चीज ठरते गुणकारी

नवी दिल्ली : सध्या अनेक पदार्थांमध्ये चीज भुरभुरले जात असते. त्यामुळे त्या पदार्थांची चवही वाढते. काहींना नुसतीच चीज क्यूबही खाणे आवडते. अर्थात सतत चीज खाणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याचे कारण म्हणजे त्यामध्ये फॅट्स, सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे साधारणपणे आठवड्यातून फक्त एकदाच चीज खाणे सुरक्षित मानले जाते. विशेषतः शेळी-मेंढीच्या दुधापासून बनवलेले चीज अधिक आरोग्यदायी व गुणकारी असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मेंढी आणि शेळीच्या चीजमध्ये ‘ए-2’ केसीन असते. या प्रथिनांमुळे तुमच्या पचनसंस्थेत कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जगातील काही वृद्ध लोक मेंढ्या आणि शेळीच्या दुधाचे चीज खातात. सर्वसाधारणपणे गाईच्या दुधात सुमारे 3.8 ते 4 टक्के लॅक्टोज असतात; तर मॉझरेला चीज किंवा कॉटेज चीजमध्ये 4 टक्के लॅक्टोज असतात. पण, शेळी किंवा मेंढीच्या चीजमध्ये 0.5 टक्का लॅक्टोज असतात. शेळी आणि मेंढीच्या दुधाचे चीज हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत. हे चीज सामान्यत: संपूर्ण प्रोटिन प्रोफाईल म्हणून ओळखले जाते; ज्यामध्ये शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व अमिनो अ‍ॅसिडचा समावेश असतो. त्याव्यतिरिक्त हे चीज शरीराद्वारे सहजपणे शोषले जाते; ज्यामुळे तो स्नायूंच्या दुरुस्ती आणि मजबुतीसाठी दैनंदिन आहाराचा एक फायदेशीर घटक ठरतो. पण, त्यांनी हेदेखील सांगितले की, शेळी आणि मेंढीच्या चीजचा संतुलित आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. पण, त्यांच्यातील चरबी आणि सोडियमचे प्रमाण लक्षात घेऊन, ते कमी प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे.

अनेक चीज प्रकारांमध्ये विशेषत: आंबलेल्या पदार्थांमध्ये जिवंत प्रो-बायोटिक्स असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारू शकतात. प्रो-बायोटिक सूक्ष्म जीवाणू हे नैसर्गिक आणि मित्रवर्गीय सूक्ष्म जीवाणू आहेत, जे आपल्या शरीरातील सूक्ष्म जीवाणूंचा समतोल राखण्यासाठी मदत करतात. शेळी आणि मेंढीच्या चीजमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे ए व बी-2 (रिबोफ्लेविन) भरपूर असतात. ते हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. या चीजमध्ये गाईच्या चीजपेक्षा फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास योगदान देऊ शकते.

Back to top button