रस्तेबांधणीतील भरारी | पुढारी

रस्तेबांधणीतील भरारी

नव्या भारताच्या उभारणीसाठी चांगले रस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे आणि या दिशेने देश पुढे जात आहे. रस्तेबांधणीच्या वेगाच्या बाबतीत नवनवीन उच्चांक नोंदविण्यात येत आहेत.

सुवर्ण चतुर्भुज महामार्ग हा प्रकल्प माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आला होता. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली या महानगरांना जोडणारा सहा लेनचा हा प्रमुख महामार्ग प्रकल्प आहे. उत्तर-दक्षिण कॉरिडोर श्रीनगर आणि कन्याकुमारीला जोडतो. पूर्व-पश्चिम कॉरिडोर सिलचर आणि पोरबंदरला जोडतो. भारतातल प्रमुख शहरांमधील अंतर कमी करणे हा या सुपर हायवे प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

आज भारतातील रस्त्यांचे जाळे जगात सर्वांत जास्त लांबीचे आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की 2024 पर्यंत भारतात अमेरिकेसारखी पायाभूत संरचना असेल. देशात सर्वसमावेशक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध भागांना जोडणारे 26 हरित महामार्ग बांधले जात आहेत. हे महामार्ग दिल्ली, जयपूर, चंदीगड, अमृतसर, मुंबई, कटरा, श्रीनगर आणि वाराणसी तसेच इतर शहरांना कोलकात्याशी जोडतील. या महामार्गांच्या निर्मितीमुळे प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होईल.

संबंधित बातम्या

देशात रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपले जीवन अतिशय सुरळीत आणि सोपे केले आहे. लॉकडाऊन काळात राष्ट्रीय महामार्ग बांधकामाच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली. 2020-21 मध्ये महामार्ग बांधणीचा प्रतिदिन वेग 36.5 किलोमीटर एवढा होता. राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या कामाचा आतापर्यंतचा हा सर्वांत अधिक वेग आहे. भारताने अवघ्या 24 तासांंत 2.5 किलोमीटर चारपदरी काँक्रिटचा रस्ता आणि 26 किलोमीटर एकपदरी रस्ता अवघ्या 21 तासांत बांधून जागतिक विक्रमही केला आहे.

यापूर्वी रस्तेबांधणी क्षेत्रात आणखी एक गिनिज वर्ल्ड रेकॉर्डही नोंदविले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका कंत्राटदाराने 25.54 किलोमीटर लांबीचा एकपदरी रस्ता 18 तासांत बांधला होता. हा रस्ता सोलापूर-विजापूरदरम्यानच्या चारपदरी रस्त्याचा भाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी 2022-23 मध्ये 18 हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम 50 किलोमीटर प्रतिदिन या विक्रमी वेगाने सुरू आहे. 2025 पर्यंत दोन लाख किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

आता जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा कालबद्ध आणि ध्येयाभिमुख बनविण्यावर भर दिला जात आहे. कारण रस्ते आणि पायाभूत सुविधा ही स्वावलंबी भारताची आशा आहे. आता रस्ते आणि महामार्ग बांधणीसाठी जागतिक दर्जाचे स्वदेशी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात परवडणारे, टिकाऊ आणि पुनर्वापर करण्यायोग्य तंत्रज्ञान वापरले जात आहे. ईशान्येकडील प्रदेश, डोंगराळ राज्ये आणि इतर मागासलेल्या प्रदेशांमध्ये त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महामार्ग बांधण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

महामार्गांव्यतिरिक्त विस्तीर्ण रेल्वेमार्ग नेटवर्कने ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या आठ वर्षांत सकारात्मक सामाजिक-आर्थिक बदल घडवून आणले आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये 3 नवीन राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेस रोड कॉरिडोरच्या बांधकामाच्या दिशेने वेगाने प्रगती केली आहे. देशाच्या सीमावर्ती भागात व्युहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे रस्ते बांधले जात आहेत. लष्कराची उपकरणे तातडीने सीमेवर तैनात लष्कराकडे पोहोचविता येतील. लढाऊ विमानेही उतरू शकतील आणि उड्डाण करू शकतील अशा पद्धतीने महामार्ग बांधले आहेत.

शहरे आणि महानगरांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. महानगरांच्या वाढत्या लोकसंख्येनुसार रस्त्यांचा वापर वाढल्यामुळे रस्ते खराब होतात. थोड्याशा पावसामुळे रस्ते वाहून जातात. याकडे राज्य सरकारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला लक्ष द्यावे लागेल. रस्त्यांवरील खड्डे आपल्या शहरांच्या दुर्दशेची कहाणी सांगताना दिसतात. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी म्हणाले होते की, अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत असे नाही तर अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. या धर्तीवरच नव्या भारताच्या उभारणीसाठी चांगले रस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे आणि या दिशेने देश पुढे जात आहे.

– कमलेश गिरी

Back to top button