उपासमारीची वाढती व्याप्ती | पुढारी

उपासमारीची वाढती व्याप्ती

उपासमारीचे बळी अत्यंत गरीब आणि असुरक्षित समुदायातील आहेत. एकीकडे अवकाशात आणि अन्य ग्रहांवर जीवसृष्टी निर्माण करण्याची चर्चा केली जाते आणि दुसरीकडे पृथ्वीवरच असलेल्या लोकसंख्येच्या पोटापाण्याची व्यवस्था का केली जात नाही?

ज्या युगात जग विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकासाच्या आणि प्रयोगांच्या नवनवीन शिखरांना स्पर्श करीत आहे, त्याच काळात जगभरात उपासमारीच्या परिस्थितीचा सामना करणार्‍या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यापेक्षा दैवदुर्विलास आणखी कोणता असेल! उपासमारीच्या समस्येची व्याप्ती आणि गुंतागुंत दरवर्षी समोर येणार्‍या अभ्यास अहवालांमधून स्पष्ट केली जात असली तरी सर्वाधिक प्रभावित देशांची सरकारे उपासमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस आणि धोरणात्मक पावले का उचलत नाहीत, हे समजणे कठीण आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या ग्लोबल फूड सिक्युरिटी रिपोर्टमध्ये आता पुन्हा एकदा असे सांगण्यात आले आहे की, जगात उपासमारीची परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक भीषण झाली आहे. जगातील सुमारे दोन अब्ज तीस कोटी लोकांना अन्नसामग्री गोळा करण्यात अडचणी येतात. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, कोरोना महामारी आणि त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धाने परिस्थिती अधिक भीषण बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक संस्थांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या या अहवालात म्हटले आहे की, 2030 पर्यंत भूक, अन्न असुरक्षितता आणि कुपोषण या सर्व प्रकारांचे उच्चाटन करण्याच्या ध्येयापासून जग आणखी दूर जात आहे.

सर्वांत ताजे उपलब्ध पुरावे असे सूचित करतात की, जगभरात पोषक आहार मिळू शकत नसलेल्या लोकांची संख्या तीन अब्जांपेक्षा अधिक आहे. कोव्हिड-19 महामारीच्या काळात खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीचा परिणाम हे प्रमुख कारण असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. साथरोगाचा सामना करण्यासाठी अवलंबिलेल्या उपाययोजनांमुळे विषाणूंचा प्रसार रोखण्यात कितपत मदत झाली, याचे मूल्यमापन करणे अद्याप बाकी आहे; परंतु त्याचा व्यावहारिक परिणाम लक्षात घेता, लोकांना अन्नधान्याच्या संकटाचा सामना करावा लागला तर त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. जिथे वेगवेगळ्या देशांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर या समस्येवर बारकाईने लक्ष ठेवणार्‍या संस्थांसह तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, तिथे त्याच्या दूरगामी निराकरणासाठी ठोस धोरणे का नाहीत, हाही एक स्वाभाविक प्रश्न आहे. उलट ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे आणि या मुद्द्यावर कोणताही नवा अहवाल येणे आश्चर्यकारक नसले तरी जगभरात धोरण ठरविणे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात संतुलित दृष्टिकोन नाही, हे मात्र नक्की.

संबंधित बातम्या

वास्तविक, या सूचनेला समांतर, पृथ्वीवरील संसाधनांचा अधिक चांगला वापर करण्यासाठी गंभीर प्रयत्न केले तर अन्न असुरक्षितता आणि उपासमारीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्ग शोधले जाऊ शकतात; परंतु युद्ध आणि अन्य निरर्थक बाबींवर बेलगाम पैसा खर्च करणे आणि अस्तित्वात असलेली संसाधने नष्ट करणे सोडून भूकबळींबाबत जागतिक समुदाय तेवढे गांभीर्य दाखवत नाही. मग यामागे हित कोणाचे आहे? वंचित लोकसंख्येला पौष्टिक, संतुलित आहार देण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे; परंतु वास्तव असे आहे की, जगण्यासाठी आवश्यक असलेले किमान अन्नदेखील अनेक लोकांना मिळत नाही. ही समस्या दीर्घकाळ जशीच्या तशी आहे. कारण, उपासमारीचे बळी अत्यंत गरीब आणि असुरक्षित समुदायातील आहेत आणि त्यांची काळजी घेणे सरकार आवश्यक मानत नाही. विज्ञानाचे आविष्कार आणि त्याच्या प्रगतीचे नवे परिमाण म्हणून एकीकडे अवकाशात आणि अन्य ग्रहांवर जीवसृष्टी निर्माण करण्याची चर्चा केली जाते आणि दुसरीकडे पृथ्वीवरच असलेल्या लोकसंख्येच्या पोटापाण्याची व्यवस्था का केली जात नाही?

– श्रीकांत देवळे

Back to top button