अमली पदार्थांचे आव्हान | पुढारी

अमली पदार्थांचे आव्हान

अ‍ॅड. प्रदीप उमाप

पाकिस्तानी बोटीतून 600 कोटी रुपये किमतीचे 86 किलो हेरॉईन नुकतेच जप्त केल्याने भारतातील वाढत्या अमली पदार्थांच्या व्यापारामागे परकीय षड्यंत्र असल्याचे उघड झाले आहे. याचे कारण अलीकडच्या काळात कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अनेक देशांच्या सत्ताधारी संस्थांच्या संगनमताने अमली पदार्थ-दहशतवादाचा मोठा प्रकार चालवला जात आहे. हे षड्यंत्र राष्ट्रीय सुरक्षेला एक गंभीर आव्हान आहे, हे नक्की.

जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या व्यापारातून कमावलेला पैसा दहशतवादाच्या पाठिंब्यासाठी वापरला जात असल्याचे मागील अनुभव सांगतात. याच पैशातून दहशतवाद्यांना शस्त्रे आणि पैसा पुरवल्याचेही दिसून आले आहे. मे 2023 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि नौदलाच्या संयुक्त मोहिमेद्वारे केरळ किनारपट्टीवर 2500 किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले होते, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 15 हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. देशातील आतापर्यंत जप्त केलेला हा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा आहे.

गेल्या महिन्यात गुजरातच्या किनार्‍यावर ड्रग्जची 60 पाकिटे घेऊन जाणारी बोट जप्त करताना 6 पाकिस्तानी क्रू सदस्यांना अटक केली होती. तसेच फेब—ुवारीमध्ये पोरबंदर किनारपट्टीवर 5 परदेशी नागरिकांना चरस आणि 3300 किलो अमली पदार्थांसह पकडले. खरे तर हा अमली पदार्थांचा व्यापार अनेकदा अफगाणिस्तानमधून सुरू होतो, जिथे अफू आणि हेरॉईनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. अमली पदार्थ हे अफगाण सरकारच्या उत्पन्नाचाही एक प्रमुख स्रोत आहेत. तथापि, समुद्रातून होणार्‍या अमली पदार्थांच्या तस्करीचा सामना करण्यासाठी गंभीर उपायांची आवश्यकता आहे. त्यासाठी भक्कम कायदे, अंमलबजावणी करणार्‍या संस्थांचा सहभाग, कार्यक्षम गुप्तचर यंत्रणा, नौदल आणि तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पथकातील समन्वयाद्वारे पाळत ठेवणारी यंत्रणा मजबूत करण्याची गरज आहे.

हे अमली पदार्थ भारतात कसे आणि कुठे विकले जातात, हासुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ड्रग्जच्या मागणीच्या बाजूकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. त्याद़ृष्टीने प्रतिबंध तसेच पुनर्वसन कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. अमली पदार्थांच्या व्यसनाच्या विरोधात तरुणांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्याची गरज आहे. जेव्हा-जेव्हा अमली पदार्थांची मोठी खेप जप्त होते, तेव्हा सामाजिक हितासाठी काम करणार्‍यांची, सुजाण नागरिकांची, पालकांची चिंता वाढते. पंजाबमध्ये केलेल्या कारवाईत अमली पदार्थांबरोबर पैसा आणि इतर बेकायदेशीर वस्तूही जप्त केल्या. या प्रकरणातील केवळ आरोपीच नाही, तर त्याची मुलगी आणि जावईही या काळ्या धंद्यात सामील होते. हे ड्रग्ज पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केले नसते, तर अमली पदार्थांचे सेवन करून किती तरुणांचे आयुष्य बरबाद झाले असते, याची कल्पनाच केलेली बरी !

दुसरा एक मुद्दा म्हणजे, या अमली पदार्थांच्या खरेदीच्या निमित्ताने देशाची किती संपत्ती परदेशात गेली असेल? अमली पदार्थांतून मिळणार्‍या पैशातून दहशतवाद आणि गुन्हेगारीच्या जगाला किती बळ मिळाले असेल? अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केल्याचे स्वागत करतानाच देशात अमली पदार्थांचा खप सातत्याने वाढत असल्याचे निदर्शक म्हणूनही याकडे पाहावे लागेल. याचाच अर्थ आपले हितशत्रू देशाच्या युवाशक्तीला अधोगतीच्या मार्गावर नेत आहेत. अमली पदार्थांचे सेवन करणारे तरुण अखेरीस महागडे ड्रग्ज मिळवण्यासाठी गुन्हेगारी जगात प्रवेश करतात, असे निदर्शनास आले आहे. पंजाब आणि देशाच्या अन्य भागात दरवर्षी हजारो तरुणांचा अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू होत असल्याचेही समोर आले आहे. अशा परिस्थितीत देशाचे भवितव्य वाचवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अतिरिक्त उपाय योजावे लागतील.

Back to top button