बारामती : पुढारी वृत्तसेवा : मतदानाच्या अगोदरच्या दिवशी सर्व ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला. भोरमध्ये जी गाडी फोडली त्यात पैसे सापडले. बारामतीत कधीही पैसे वाटले गेले नाहीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशांचा वाटप करण्यात आले, खर तर ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनाधक्ती अशीच म्हणावी लागेल. अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. बारामती येथे रोहित पवार हे मतदान करण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
यावेळी रोहित पवार म्हणाले की, पैशांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांनी पैसे नाकारले. सर्व सामान्य नागरिकांसाठी पीडीसीसी बँक ही ५ वाजता बंद होते. मात्र यांच्यासाठी रात्री एक एक वाजेपर्यंत बँक सुरू राहते. तसेच कर्मचारी देखील यात सहभाग घेतात. हे खूप वाईट आहे. त्यामुळे यंदाची बारामतीची लढाई ही जनशक्ती विरूद्ध धनशक्ती अशीच होणार आहे.
गिरीश महाजन यांच्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, गिरीश महाजन यांना प्रचंड अहंकार आहे. तोच अहंकार अजित दादांमध्ये देखील शिरला आहे. त्यामुळे वडीलधारे त्यांना कळत नाहीत. नाते कळत नाहीत. अजित दादांचा प्रचार माझ्या आजोबांनी देखील केलेला आहे. आणि नात्यांबद्दल माझ्या छोट्या मुलांना समजते आणि ६५ वर्षांच्या माणसाला हे कळत नाही. फक्त स्वतःच साम्राज्य वाचवण्यासाठी इतरांसोबत जायचं. आपल्या वडीलधाऱ्याना दुखवायचं हे योग्य नाही. जनता यातून नक्की धडा शिकवेल अशी टीका देखील रोहित पवार यांनी केली आहे.
राज्य सरकारने ज्यांना कुणाला वाय प्लस सुरक्षा दिली आहे. ती यासाठीच दिली आहे. भोरमध्ये हे पैशांचे वाटप झाले ते मावळचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते होते. तसेच जे साखर कारखाने अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात, त्या कारखान्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी पाहायला मिळाले. त्यामुळे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच ही निवडणूक असल्याचे रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा