तमिळनाडूतील संघर्ष | पुढारी

तमिळनाडूतील संघर्ष

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर महानाट्य रंगले असताना आणि ते लांबत चालले असताना तशाच प्रकारचे नाट्य तमिळनाडूमध्येही रंगले आहे. देशाच्या राजकारणात अस्सल प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणारे दोन पक्ष संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत, हे यातले साम्य म्हणून सांगता येईल. महाराष्ट्रात जे नाट्य रंगले आहे, त्यामध्ये पक्षावरील वर्चस्वाबरोबरच सत्तेची लढाईही आहे. तमिळनाडूमध्ये फक्‍त पक्षावरील वर्चस्वाचा संघर्ष आहे. त्याव्यतिरिक्‍त दोन्हींमधील आणखी एक साम्य म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये देशाच्या राजकारणाची सूत्रे ज्याच्या हातात आहेत, असा भारतीय जनता पक्ष थेट चित्रात कुठेही नसला, तरी पडद्यामागून भाजपकडूनच सूत्रे हलवली जात असल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. संबंधित राज्यांपुरत्या म्हणून या घटना पाहता येणार नाहीत, तर देशाच्या राजकारणाची नवी मांडणी म्हणून, तसेच भविष्यातील अशा प्रकारच्या अनेक घटनांचे सूचन म्हणूनही या घटनांकडे पाहावे लागेल. ज्या दोन पक्षांमध्ये संघर्ष उफाळला आहे, ते म्हणजे तमिळनाडूतील अखिल भारतीय अण्णा द्रमुक (एआयएडीएमके) आणि महाराष्ट्रातील शिवसेना. हे दोन्ही पक्ष प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष म्हणून ओळखले जातात. यातील शिवसेनेतील संघर्षाबाबत खूप लिहून झाले आहे; परंतु तमिळनाडूमधील संघर्षही देशाच्या राजकारणाच्या द‍ृष्टीने तेवढाच महत्त्वाचा असला, तरी त्याची त्या प्रमाणात चर्चा झालेली नाही. महाराष्ट्रातील संघर्ष हा थेट सत्तापरिवर्तनाशी असल्यामुळे ते स्वाभाविकही आहे. एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता यांच्या नेतृत्वामुळे देशाच्या राजकारणात ठळक ओळख असलेला एआयएडीएमके हा तमिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष आहे. ओ. पनीरसेल्वम आणि के. पलानीस्वामी यांच्याकडे संयुक्‍तपणे पक्षाचे नेतृत्व आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये एकाच नेतृत्वाची मागणी पक्षातून होऊ लागली आहे आणि त्यावरून या दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ‘सिंगल लीडरशीप’चा मुद्दा चर्चेत आला आणि पार्टीतील मतभेद चव्हाट्यावर आले. के. पलानीस्वामी यांच्या निष्ठावंतांनी यासंदर्भातील मागणी आधी केली. त्यानंतर पनीरसेल्वम यांच्या समर्थकांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी करणारी पोस्टर्स झळकावली. पनीरसेल्वम यांची निवड पक्षाच्या नेत्या जे. जयललिता यांनी केली होती, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. जयललिता यांनी त्यांची निवड केल्याची गोष्ट खरी असली, तरी आजची स्थिती पाहता पक्षातील बहुमत त्यांच्या विरोधात आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्याशी मिळते-जुळते हे प्रकरण असल्याचे इथे दिसून येते. अर्थात, पनीरसेल्वम यांच्यासाठी हा संघर्ष नवा नाही. पाच वर्षांपूर्वी जयललिता यांच्यानंतर पक्षावर वर्चस्व निर्माण करणार्‍या व्ही. के. शशिकला यांच्या कुटुंबीयांनी पक्षाची सूत्रे घेतल्याच्या विरोधातही त्यांनी संघर्ष केला होता. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. आजघडीला पनीरसेल्वम् यांची बाजू दुबळी आहे.

पनीरसेल्वम यांचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणार्‍या अनेकांनी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्यांबरोबरच पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा पाठिंबा घटल्यानंतर त्यांनी पक्षाची बैठक रोखण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. पनीरसेल्वम यांच्यासाठी समाधानाची गोष्ट एवढीच की, न्यायालयाने बैठकीत एकाच नेतृत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास परवानगी दिली आहे; परंतु त्यासंदर्भात निर्णय न घेण्याचे निर्देश दिले आहेत. पनीरसेल्वम यांची ताकद कमी होत असताना त्यांना निर्णय प्रक्रियेतून सहजपणे बेदखल करता येऊ शकते, तरीसुद्धा एकाच नेतृत्वाचा मुद्दा का चर्चेत आला आहे, यासंदर्भातही राजकीय वर्तुळात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्याचा एआयएडीएमकेच्या अंतर्गत राजकारणाबरोबरच तमिळनाडूच्या राजकारणाशीही संबंध आहे. यासंदर्भात दोन कारणे सांगितली जातात. त्यातले पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे, तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्ष हातपाय पसरू लागला आहे. अशा स्थितीत विरोधातील पक्षामध्ये दोन शक्‍तिकेंद्रे असणे पक्षासाठी धोकादायक ठरू शकते, अशी अनेकांची धारणा आहे. पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन्ही नेत्यांमध्ये अलीकडच्या काही दिवसांमध्ये सुप्‍त संघर्ष सुरू होता. त्यातच जयललिता यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या शशिकला यांनीही आपणच एआयएडीएमकेच्या उत्तराधिकारी असल्याचा दावा वारंवार केला आहे आणि त्याही एकूण परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. भारतीय जनता पक्षाला दक्षिणेच्या राज्यांतून विशेषतः तमिळनाडूमध्ये कधीच प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, एआयएडीएमकेमधील नेतृत्वाच्या कमकुवतपणाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला गेला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्याशी आघाडी केली आणि चार जागा जिंकल्या. तब्बल दोन दशकांनंतर भाजपला तमिळनाडू विधानसभेत प्रवेश करता आला. भारतीय जनता पक्षाचा आजवरचा प्रवास पाहिला, तर प्रादेशिक पक्षाची मदत घेऊन आपला विस्तार करायचा आणि हळूहळू त्या पक्षालाच संपवण्याचा प्रयत्न करायचा, हे सूत्र दिसून येते. महाराष्ट्रातही ते दिसून आले आणि बिहारमध्येही तेच दिसते. आता तमिळनाडूची वेळ आल्याचे मानले जाते. तमिळनाडूतील जनता हिंदी पट्ट्यातील पक्षाला स्वीकारीत नाही, हे वास्तव माहीत असतानाही केंद्रीय सत्तेच्या दबावाखाली एआयएडीएमकेने भाजपसोबत युती केली. त्याचा मोठा फटका पक्षाला बसल्याचे मानले जाते. त्या प्रभावातून बाहेर येऊन एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्षाची पुढची वाटचाल व्हावी, असा बहुतेकांचा आग्रह आहे. त्यातून हा संघर्ष उफाळून आला आहे. त्यातूनच पक्षाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत पनीरसेल्वम यांच्यावर बाटल्या फेकण्यापर्यंत पलानीस्वामी समर्थकांची मजल गेली. पलानीस्वामी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व यावे, यासाठी समर्थकांनी कंबर कसली आहे. त्यातूनच या संघर्षाला धार आली आहे. या संघर्षाकडे ज्याप्रमाणे शशिकला लक्ष ठेवून आहेत, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षही लक्ष ठेवून आहे. त्यातून नजीकच्या काळात तमिळनाडूच्या राजकारणाची नव्याने मांडणी झाली, तरी आश्‍चर्य वाटायला नको!

Back to top button