प्रदूषणाचा विळखा | पुढारी

प्रदूषणाचा विळखा

आपण ज्या हवेत श्‍वास घेतो, ती हवा विषारी बनवली आहे, पाणी म्हणजे जीवन म्हणून जे पाणी पितो त्या पाण्याचे सगळे प्रवाह आपण दूषित करून टाकले आहेत. त्याअर्थाने बघायचे, तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हवा आणि पाणी या दोन घटकांच्या प्रदूषणामुळे माणसाचे जगणे कठीण बनलेले आहे. याला सर्वस्वी माणूस, त्याची बदललेली बेजबाबदार जीवनशैली कारणीभूत आहे. त्याचमुळे कोणत्याही आजारांशिवाय, घातपात-अपघातांशिवाय केवळ प्रदूषणामुळे लाखो लोकांना प्राण गमवावे लागत आहेत.

लॅन्सेट कमिशन ऑन पोल्युशन अँड हेल्थने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालात प्रदूषणाच्या या दुष्परिणामावर टाकलेला प्रकाशझोत डोळे उघडणारा आहे. परंतु, सवयीप्रमाणे आपण डोळे उघडणार नाही. कारण, आपल्याला वेगाने पुढे जायचे आहे आणि स्वाभाविकपणे जिथे वेग असतो तिथे अपघाताचा संभव असतो आणि अपघातामध्ये काहीही घडू शकते. अपंगत्व येऊ शकते किंवा थेट मृत्यू. प्रदूषणाच्या समस्येकडे दुर्लक्ष करून आपण जो वेग पकडला आहे, तो या दोन्ही शक्यतांना बळकटी देणारा आहे. लॅन्सेटच्या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये भारत जगात सोळाव्या क्रमांकावर आहे.

2019 या वर्षातील म्हणजे तीन वर्षांपूर्वीच्या परिस्थितीसंदर्भातील हा अहवाल असून या अहवालानुसार 2019 मध्ये भारतात केवळ प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 23 लाखांपर्यंत असून त्यापैकी 16 लाख लोक वायू प्रदूषणाचे, तर पाच लाख लोक जल प्रदूषणाचे बळी ठरले आहेत. यापूर्वी आलेल्या 2015 मधील अहवालात ही संख्या 25 लाखांपर्यंत होती. चार वर्षांमध्ये भारतातील प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या दोन लाखांनी कमी झाली असली, तरी याचा अर्थ प्रदूषण कमी झाले, असा काढता येणार नाही. कदाचित लोक प्रदूषणाला सरावले असतील आणि त्यासाठीची आवश्यक प्रतिकारशक्‍ती अनेक लोकांमध्ये तयार झाली असेल. त्यामुळे हे मृत्यू कमी झाले असतील. भारतात एक लाख लोकांचे मृत्यू होतात. त्यातील 169 लोकांचे मृत्यू प्रदूषणामुळे होत असल्याचे हा अहवाल सांगतो.

त्यातसुद्धा आपल्याकडील वायू प्रदूषणाची तीव्रता अधिक असून प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूंपैकी 74 टक्के मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत असल्याचे हा अहवाल सांगतो. दरवर्षी दिवाळीच्या पुढे-मागे राजधानी दिल्लीतल्या धुक्याची आणि धुराची चर्चा होत असते. गेल्या दशकभरात सातत्याने ही समस्या समोर येते. दिल्लीलगतच्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांत याच काळात खरीप पिकांची कापणी केली जाते. पीक कापणीनंतर शेतातील पराळी शेतकरी पेटवून देतात. एकाच वेळी सगळीकडे शेतातला कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठतात. वाहनांच्या प्रचंड संख्येने आधीच प्रदूषित असलेल्या दिल्लीच्या प्रदूषणात त्याची आणखी भर पडत असते. राजधानीचा श्‍वास अक्षरशः कोंडला जातो आणि या धुराचे प्रचंड दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत असतात.

प्रदूषण ही काही एकट्या भारतापुरती समस्या नाही. जगातल्या सगळ्या राष्ट्रांना या समस्येचा सामना करावा लागतो. जगभरात प्रदूषणामुळे 90 लाख मृत्यू होत असल्याचे अहवाल सांगतो. परंतु, जगाकडे बोट दाखवून किंवा प्रदूषणाच्या तक्त्यामध्ये भारतापेक्षा वाईट स्थिती असलेल्या देशांकडे बोट दाखवून आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही किंवा समाधानही मानता येणार नाही. 2015 ते 2019 या चार वर्षांत भारतातील मृत्यूंची संख्या कमी झाली असताना चीनसारख्या देशात ती वाढली असून 18 लाखांवरून एकवीस लाखांवर गेली आहे. भारतात एका वर्षात झालेल्या 23 लाख मृत्यूंच्या आधारे, जर रोजच्या मृत्यूंचा आकडा काढला, तर असे लक्षात येईल की, प्रदूषणामुळे होणार्‍या आजारांनी देशात दररोज 6,400 लोकांचे मृत्यू होतात.

कोरोना महामारीच्या अडीच वर्षांत भारताने मृत्यूचे तांडव अनुभवले. त्याच्या बातम्यांचे रकानेच्या रकाने भरून वाहू लागले. या सुमारे अडीच वर्षांच्या काळात देशात पाच लाखांहून अधिक मृत्यू झाले. परंतु, प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूंची 23 लाख ही संख्या त्याहून कितीतरी पटींनी अधिक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, एवढी गंभीर समस्या असूनसुद्धा आपण त्यासंदर्भात काहीच करण्याची इच्छाशक्‍ती दाखवत नाही. ना देश म्हणून, ना व्यक्‍ती म्हणून! भारतासारखा घनदाट लोकसंख्येचा देश जसा प्रदूषणाच्या समस्येचा सामना करतोय, त्याचप्रमाणे अनेक गरीब देशांनासुद्धा या समस्येचा फटका बसत आहे. लॅन्सेटच्या अहवालानुसार प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये आघाडीवर असलेल्या पहिल्या दहा देशांमध्ये अमेरिका हा एकमेव औद्योगिक देश असून अमेरिका सातव्या क्रमांकावर आहे. अहवालातील माहितीनुसार प्रदूषणामुळे जे मृत्यू होतात, त्यापैकी 90 टक्क्यांहून अधिक मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्‍न असलेल्या देशांमध्ये होतात.

म्हणजे पुन्हा इथल्या मृत्यूंचीही दारिद्य्राशी सांगड आहेच. वाढत्या औद्योगीकरणामुळे रासायनिक कारखान्यांची संख्या वाढत चालली आहे. असे कारखाने अविकसित भागात काढून आपल्यापासून लांबच्या अंतरावरील हवेत विष सोडण्याचे उद्योग भांडवलदार देशांकडून केले जातात. आपल्याकडे जे रासायनिक प्रकल्प येतात त्याची कारणे तीच असतात. विकासाचे गाजर दाखवून, रोजगाराचे आमिष दाखवून प्रत्यक्षात लोकांच्या जीवाशी खेळ मांडला जातो. पिकांसाठी वापरली जाणारी रासायनिक खते, त्यामुळे होणारे पाण्याचे आणि अन्‍नधान्याचे प्रदूषण ही नवीच समस्या अलीकडच्या काळात वेगाने वाढत आहे. कीटकनाशके, रासायनिक खते यांच्या मार्‍यामुळे अन्‍नही विषारी बनत चालले आहे. त्याचे माणसाच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचे अनेक ठिकाणांचे अहवाल समोर आले आहेत. आजार वाढत आहेत. त्यांचे निदान होत आहे. त्यांची कारणे ठाऊक आहेत. परंतु, त्यावर नियंत्रण मिळवायचे, तर लालसा आड येते, अशी स्थिती झाली आहे. प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंसंदर्भातील लॅन्सेटचा अहवाल त्याद‍ृष्टीने डोळे उघडणारा ठरावा, एवढीच अपेक्षा!

हेही वाचलतं का?

Back to top button