पुणे : पुढारी वृत्तसेवा
हडपसर परिसरातील मगरपट्टा येथे एका बांधकाम व्यावसायीकाच्या घरात घरकाम करणार्या महिलेने 23 लाख 50 हजार रुपयांचे हिर्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयीत मोलकणीला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
राधा अशोक झा (37, रा. वैदवाडी, हडपसर) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मगरपट्टा या उच्चभ्रु सोसायटी परिसरात मलबेरी गार्डन याठिकाणी एका व्यवसायिकाचा फ्लॅट आहे. त्यांच्या घरी कामासाठी येणार्या 37 वर्षीय महिलेने घरातल्यांची नजर चुकवून 23 लाख 50 हजार रुपयांचे हिर्याचे दागिने चोरी करुन नेले. दागिने घरात कुठेही दिसून न आल्याने घरच्यांना याबाबत घरकाम करणार्या महिलेवर संशय आला. तिचा शोध घेतला असता ती पसार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, पोलीसांनी या महिलेला शोधून काढले.
घरकाम करणार्या महिलेनेच घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आल्याने घरकाम करणार्या महिलांच्या चारित्र्य पडताळणीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.
फिर्यादी हे बांधकाम व्यावसायीक असून चोरी करण्यात आलेली रक्कम मोठी असून याप्रकरणातील संशयीत मोलकरणीला अटक करण्यात आली आहे. तिच्याकडे चोरीच्या ऐवजाबाबत चौकशी करण्यासाठी न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
– विजयकुमार शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे.