पंजाबमधील हिंसाचार | पुढारी

पंजाबमधील हिंसाचार

देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यातील छोटीशी घटनाही देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवून टाकत असते. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अशा घटना काही क्षणात देशभर पसरतात, देशवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. स्थानिक प्रशासनापासून राजधानीपर्यंत सगळ्या यंत्रणांवरील ताण अनावश्यकरीत्या वाढत राहतो. त्यातून प्रशासनाला ज्या विकासाच्या मूलभूत गोष्टींसाठी काम करावयाचे असते, त्या गोष्टी अशांतून मागे पडतात.

अशी घटना जर पुन्हा पंजाबसारख्या महत्त्वाच्या राज्यातील असेल तर सर्व संबंधित घटकांची चिंता शतपटीने वाढत असते. त्याला पंजाबचा भूतकाळ जसा कारणीभूत आहे, त्याचप्रमाणे पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे, हेही त्याचे एक कारण आहे. त्याचमुळे पंजाबमध्ये दोन गटांमधील हिंसाचाराची ताजी घटना चिंता वाढवणारी ठरते. गेल्या काही आठवड्यांमध्ये देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये सामाजिक तणावाच्या घटना घडल्या, त्यामध्ये पंजाबमधील ताज्या घटनेची भर पडली आहे. राजकारणग्रस्तता वाढल्यामुळे राजकीय फायद्यासाठी विविध घटक देशभरात ठिकठिकाणी अनेक उपद्व्याप करीत असतात.

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांपासून अन्यधर्मीयांच्या धार्मिक चालीरीतींपर्यंत कोणत्याही गोष्टी त्यांना त्यासाठी चालत असतात. एरव्ही स्थानिक पातळीवरील कायदा-सुव्यवस्थेचा आणि तत्कालीन राजकारणाचा मुद्दा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येते, परंतु पंजाबमध्ये असे काही घडते तेव्हा काळजाचा ठोका चुकतो. पंजाबने नव्वदच्या दशकात जे भोगले आणि सोसले आहे, पंजाबच्या निमित्ताने देशानेही जे तांडव अनुभवले आहे, ते कुणाचीही काळजी वाढवणारेच असू शकते. त्याचमुळे काही बिनसले की जुनी खपली निघाल्यासारखे होते आणि परिस्थिती पुन्हा वळसा घेऊन मागे तर फिरणार नाही ना, अशी शंका मनात निर्माण होते.

पंजाबचा हा भूतकाळ जसा काळजी वाढवणारा आहे, तसाच पंजाबला लागून असलेला सीमाभाग हाही भारताच्या द़ृष्टीने नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. सीमावर्ती भागातील कायदा-सुव्यवस्था बिघडली, तेथील जनतेमध्ये कोणत्याही कारणामुळे असंतोष निर्माण झाला, तर त्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सीमेकडील शक्ती टपलेल्या आहेत. त्या अशा संधीची वाट पाहात असतात आणि असे काही निमित्त मिळाले तर त्यानिमित्ताने हैदोस घालण्याची संधीच त्या शोधत असतात. दोन्ही अर्थांनी पंजाब देशाची काळजी वाढवत असतो. त्यामुळे तेथील परिस्थिती अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याची आवश्यकता असते.

पंजाब हा कष्टकरी शेतकर्‍यांचा प्रदेश आहे, तसाच तो देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या योद्ध्यांचा प्रदेश आहे. देशवासीयांनी अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करावी, अशी पंजाबची ही वैशिष्ट्ये आहेत, त्याचप्रमाणे देशाने काळजी करावी, अशाही काही बाबी पंजाबमध्ये घडत असतात. नव्वदच्या दशकातील दुःस्वप्न संपल्यानंतरच्या परिस्थितीत पंजाबने अत्यंत जबाबदारीने व्यवहार केला आहे. मात्र काही शक्ती वातावरण बिघडवण्याचा आणि देशाच्या एकात्मतेला आव्हान देण्याचाही सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्यामुळे पंजाबमधील कोणत्याही प्रश्नाची हाताळणी अत्यंत नाजूकपणे आणि काळजीपूर्वक करावी लागते.

पतियाळा शहरात कट्टरपंथी शीख संघटना आणि शिवसेनेचे बॅनर घेतलेल्या हिंदुत्ववादी संघटनेमध्ये संघर्ष झाला. संघर्षात शिवसेनेचे नाव आल्यामुळे त्याबाबत महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय पातळीवरूनही लक्ष वेधले गेले. महाराष्ट्रात सत्तेवर असलेली शिवसेना पंजाबसारख्या राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करीत असल्याचे चित्र सुरुवातीच्या काळात निर्माण झाले. परंतु शिवसेनेकडून तातडीने स्पष्टीकरण देऊन आणि संबंधितांवर कारवाई करून संशय दूर करण्यात आला. खलिस्तानच्या विरोधात भूमिका घेण्याबद्दल कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु त्यावरून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न आक्षेपार्ह ठरतो. देशभरामध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये अनेक राज्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या.

मात्र पंजाबमधील घटनेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संदर्भानेही अनेक अर्थ आहेत. पंजाबमध्ये अलीकडेच सत्तांतर झाले असून तिथे भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आले आहे. काँग्रेस आणि अकाली दल या दोन पारंपरिक विरोधकांचे वर्चस्व मोडून काढून आम आदमी पक्षाने सत्ता मिळवली आहे. भगवंत मान यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक आश्वासनांच्या पूर्ततेबरोबरच नावीन्यपूर्ण योजनांचाही धडाका लावला आहे. अशा परिस्थितीत तेथे हिंदू आणि शीख समुदायांमध्ये संघर्ष निर्माण होणे आणि त्यातून हिंसाचार घडणे नव्या सरकारच्या वाटचालीत अडथळा निर्माण करणारे ठरते. शिवाय सीमेपलीकडून दहशतवादाला चिथावणी देणार्‍या घटकांनाही ते पूरक ठरणार आहे.

शिवसेनेने पंजाबचे कार्यकारी अध्यक्ष हरिश सिंगला यांना पक्षातून काढून टाकून आपली भूमिका स्पष्ट केली, हे शिवसेनेच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिमेसाठी योग्य ठरले. मुळात पंजाबमध्ये जी घटना घडली, तीही संक्षेपाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. भारतात बंदी असलेल्या शीख फॉर जस्टिस या संघटनेने काही दिवसांपूर्वी उपायुक्त कार्यालयात खलिस्तानचा झेंडा फडकावण्याचे आवाहन केले होते. त्याविरोधात काही हिंदू संघटनांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली. या मोर्चाविरोधात काही शीख संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यातून हिंदू-शिखांमध्ये संघर्ष सुरू झाला. अन्य राज्यांमध्ये असा संघर्ष हिंदू-मुस्लिमांमध्ये असतो. पंजाबमध्ये हिंदू-शीख यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली, यावरून देशभरातील वारे एकाच दिशेने वाहत असल्याचे स्पष्ट होते.

दोन गटांतील या संघर्षामध्ये दगडफेक झाली, तलवारी नाचवण्यात आल्या. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी इंटरनेट सेवा बंद केली. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीन प्रमुख पोलिस अधिकार्‍यांवर बदलीची कारवाईसुद्धा केली.

पंजाबच्या जनमानसामध्ये फारसे स्थान नसलेल्या मूठभर घटकांनी या संघर्षाच्या निमित्ताने पंजाबमधील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला. आता घटना घडून तर गेली आहे.तिची उजळणी करीत न बसता दोन्ही समुदायांमधील मतभेद दूर करून सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पंजाबमधील अस्वस्थता भले कुणाला राजकीय फायद्याची वाटत असली, तरी देशासाठी ती परवडणारी नाही!

Back to top button