आपण नेहमी गिर्‍हाईकच! | पुढारी

आपण नेहमी गिर्‍हाईकच!

अरे वा! जोरदार खरेदी झालेली दिसतेय.
केलीये उगाच थोडीशी. फार खरेदी करणं कोणाला परवडणार? मुलीसाठी शाम्पू क्रीमवर फ्री, मुलासाठी मोबाईल कव्हर निम्म्या किमतीत आणि बायकोसाठी महागडी पर्स.
आणि स्वतःसाठी काय घेतलंत?

महिनाअखेर थोडेफार पैसे शिल्लक राहिले तर घेईन फार तर एखादा हातरूमाल.
काय ही पुरुषजन्माची कहाणी! बायकापोरांवरच उधळायची खिशातली नाणी.
आताच तो ‘जागतिक ग्राहक दिन’ की, काय झाला ना. दुकानदारांनी स्किमा जाहीर केल्या. म्हटलं त्याचा फायदा घेऊन घरच्यांना खूश करावं.

मग झाले का ते खूश?
फार तोंड भरून कोण कौतुक करणार आहे? खरे खूश होते दुकानदार. अजून सवलत घ्या, माल घ्या, असं करत होते, तेही आधीच पंधरा टक्के सवलत दिल्यानंतर.
कशाच्या पंधरा टक्के?
काय ते यमार्पी का काय असतं ते!

संबंधित बातम्या

सरळ छापील किंमत म्हणा ना. जिच्यावर डिस्काऊंट वगैरे देतात ती. दहा, पंधरा, वीस टक्केपण देतात कोणी.
सवलतीत विकायला परवडतं तर मुळात एवढी जास्त किंमत का छापत असतील?
आपल्याला काय करायचंय? पैसे वाचले की झालं.
म्हणजे खरी किंमत एवढी कमीच असते का?

कोण जाणे! आपण तसला विचार करत नाही. कमी तिथे आम्ही, हे तेवढं पाळतो. फ्रीमध्ये काहीपण भेटलं की लगेच घेतो. परवाच मुलीच्या दोन नेलपॉलिशवर तेलाची बाटली फ्री होती, लगेच घेतली.
तुमच्यासाठी केशतेल? पण तुमचं ‘माथेरान’ तर पुरतंच वैराण दिसतंय.
असू दे. पुढेमागे चुकून केस आलेच तर होईल तेल चोपडायला. बायकोने एक स्कर्टपण असाच स्किमवर पटकावलाय. अंगाने बारीक झाले की घालेन म्हणतेय.
स्किमवर स्विमिंग सूटपण असतील ना?

आहेत, पण ते ऑनलाईन. त्या नेटशॉपिंगची तर फारच भीती वाटते, पुरतं गंडवतात लेकाचे! आपल्या हातात काहीच राहात नाही. आमच्या मित्राने पाणी थंड करण्याचा ‘मॅजिक कूलर’ ऑनलाईन मागवला, तर 1000 रुपये टाकल्यावर, चक्क लाल मातीचा माठ घरी आला होता, माहितीये? असे ‘माठ’ बनवतात ते आपल्याला.
शेवटी सगळेच दुकानदार आपल्याला बनवतात हो. थंड पेयाची बाटली फ्रीजमधली दिली की जास्त पैसे मागतात. वजनात ‘काटा मारतात.’ 500 ग्रॅमच्या पाकिटावर 100 ग्रॅम जादा दिल्याचं सांगतात. सोन्याचा खरा कस, ‘टच’ तर बापजन्मी कळत नाही आपल्याला.
म्हणजे आपण खरेदीला जातो तेव्हा फसवून घ्यायलाच जातो म्हणा की.

प्रश्नच नाही. आपण नेहमी ‘गिर्‍हाईकच’ असतो. कोणीही गंडवावं असं. तरीही आपण पुनःपुन्हा कारणं शोधून शॉपिंगला जातोच. मस्त तयार होऊन बाजारात जाणं, चार दुकानं फिरणं, घासाघीस करणं, खरेदीची पिशवी मिरवत घरी आणणं, शेजारीपाजारी भाव मारणं ह्यातला आनंद गमवायचा नसतो ना आपल्याला? हे काय? तिकडे कुठे चाललात?
अहो, त्या दुकानात फोटोचे अल्बम एकावर एक फ्री देताहेत. आम्हाला सध्या काही अल्बम वगैरे नकोय; पण फ्रीत मिळतोय म्हणून घेऊन टाकूया. चला!

-झटका 

Back to top button