आपत्कालीन यंत्रणांच्या मर्यादा

आपत्कालीन यंत्रणांच्या मर्यादा

[author title="विश्वास सरदेशमुख, ज्येष्ठ विश्लेषक" image="http://"][/author]

गेल्या आठवड्यात दोन दिवसांत आगीच्या तीन घटना घडल्या असून, यामध्ये लहान मुलांसह 35 हून अधिक जणांचा दुर्दैवी अंत झाला. यापैकी गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये लागलेली भीषण आग आणि दिल्लीच्या चाईल्ड केअर युनिटमधील अग्नितांडव हे निर्ढावलेल्या व्यवस्थेचे घोर अपयश आहे. दुर्घटनेनंतर कारवाईचे ढोंग करून पीडितांसह समाजात पसरलेल्या संतापाचे शमन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला, तरी त्यामुळे गेलेले जीव परत येत नाहीत. उलट या दिखाऊ उपाययोजनांमुळे पुनःपुन्हा दुर्घटना घडतच राहतात.

उन्हाळ्यात आग लागण्याचा धोका अधिक असतो. विशेषत: तापमान अधिक असते, तेव्हा विद्युत तारा वितळण्याचा, एकमेकांना चिकटून जळण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या इमारतींमध्ये आग लागल्यास सुरक्षेच्या उपाययोजनांकडे विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे; परंतु व्यावसायिक हितसंबंधांना महत्त्व देणारे कॅम्पस अनेकदा अशा उपाययोजनांबाबत बेफिकीर असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा ठिकाणी आग लागून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. गुजरातमधील राजकोटमधील क्रीडा संकुलाला आणि दिल्लीतील मुलांच्या रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटना ही त्याची ताजी उदाहरणे आहेत.

राजकोटमधील क्रीडा संकुलातील गेमिंग सेंटरला लागलेल्या आगीत 12 मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाला. उन्हाळ्याच्या हंगामातील सोसाट्याच्या वार्‍यात लहान मुले व पालकांच्या उपस्थितीत वेल्डिंगचे काम केले जात असताना कमालीचा निष्काळजीपणा दिसून आला, जे आगीचे कारण असल्याचे बोलले जात आहे. परिस्थिती इतकी भीषण होती की, मृतदेहांची ओळख पटवणे कठीण होत असून, मृतदेहांचे डीएनए नमुने घेऊन त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीच्या बाल रुग्णालयात नवजात बालकांच्या देखभालीसाठी ठेवलेल्या सात बाळांचा मृत्यू झाला, तर पाच गंभीर जखमी झाले. दोन्ही ठिकाणी अपघात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यूची कारणे सारखीच आहेत. दोन्ही ठिकाणचे आपत्कालीन मार्ग अत्यंत अरुंद होते. अग्निशमनाशी संबंधित ना हरकत प्रमाणपत्र दोन्हीही ठिकाणी मिळाले नाही, ही बाब धक्कादायक आहे. याखेरीज तेथे ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे साठवले गेले.

ज्या ठिकाणी हे अपघात झाले, त्या ठिकाणच्या व्यवस्थापकांना अन्य ठिकाणी होणार्‍या अपघातांची माहिती नव्हती असे नाही, तरीही ते सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत इतके बेफिकीर कसे होते, हे समजण्यापलीकडचे आहे. राजकोटच्या क्रीडा संकुलात ज्या ठिकाणी आग लागली, ती इमारत लाकूड, कापड, थर्माकोल, प्लास्टिक शीट आदींचा वापर करून बांधल्याचे सांगण्यात येत आहे. येथे तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा होता. तेथे सुरू असलेल्या बांधकामामुळे एक ठिणगी ज्वलनशील पदार्थांच्या संपर्कात आली व संपूर्ण इमारतीला आग लागली. दिल्लीच्या रुग्णालयातही अशीच कारणे आढळून आली आहेत. खालील मजल्यावर ऑक्सिजन सिलिंडर बेकायदेशीरपणे भरले जात होते, ज्याचा स्फोट झाला व संपूर्ण रुग्णालय आगीत जळून खाक झाले. आता या अपघातांबाबत प्रशासन सक्रिय झाले असून, या घटनांना जबाबदार असणार्‍यांना अटक केली आहे; परंतु दरवेळी बैल गेला आणि झोपा केला, ही भूमिका प्रशासनामध्ये का दिसते?

राजकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलबाहेर प्रियजनांच्या मृतदेहांचा शोध घेणार्‍या लोकांचे अश्रू आणि संताप व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. गेम झोनमधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता, असे सांगितले जाते. मोरबी झुलता पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक तृतीयांश मुले होती. सुरतमधील तक्षशिला कॉम्प्लेक्स आगीच्या दुर्घटनेत 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला; मात्र या घटनांमधून प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही. निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळ करणार्‍या घटकांकडे दुर्लक्ष करणे ही व्यवस्थेची सवयच बनल्याचे दिसते. वडोदराच्या हरणी तलावातही या वर्षी जानेवारी महिन्यात जीवरक्षक जॅकेटशिवाय बोटीतून प्रवास करणार्‍या 12 मुलांचा आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. दिल्लीतील विवेक विहारच्या बेबी केअर सेंटरमध्ये सात नवजात बालकांच्या मृत्यूने सर्वांनाच शोकाकुल बनवले होते.

दिल्लीतील घटनेविषयी अधिक संताप व्यक्त होण्याचे कारण म्हणजे सार्वजनिक रुग्णालयांत अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. कोरोना काळात वेगवेगळ्या रुग्णालयांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचा मृत्यू झाला. जबलपूरच्या दोन रुग्णालयांत पाच नागरिकांचा, मुंबईच्या नालासोपारा येथील सात जणांचा, शहाडोल येथे 12 जणांचा, कनोज येथे चार जणांचा मृत्यू हा ऑक्सिजनअभावी झाला. महाराष्ट्रात नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीने 22 हून अधिक जणांचा झालेला मृत्यू कुणीही विसरू शकणार नाही.

नाशिकच्या घटनेच्या दिवशीच बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे ऑक्सिजन न मिळाल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. गतवर्षी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 16 रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरवेळी अशा घटना घडल्या की, सुरक्षेसंदर्भातील ऑडिट करण्याचे, कामात हलगर्जीपणा करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे फतवे काढले जातात, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या जातात; पण अशा घोषणा केवळ जनतेतून व्यक्त होणारा संताप शांत करण्यासाठीची बोळवण असते, ही बाब आता सिद्ध झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news