अन् एन.डी. बनले पवार कुटुंबाचे लाडके जावई! | पुढारी

अन् एन.डी. बनले पवार कुटुंबाचे लाडके जावई!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ज्येष्ठ नेते कॉ. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे मार्ग वेगळे असले तरी साध्य एकच होते. एकेकाळी वाळवा तालुक्यातील एन.डी. पाटील यांना तुमची मुलगी देऊ नका, अशी पत्रे आई-वडिलांना बारामतीत आली. तेच एन.डी.कालांतराने पवार कुटुंबीयांचे लाडके जावई बनले. आयुष्यात खडतर प्रवास करीतच प्रा. एन. डी. पाटील यांच्यासमवेत संसार संभाळला, अशा भावना त्यांच्या पत्नी सरोज ऊर्फ माई पाटील यांनी व्यक्‍त केल्या.

प्रा. एन. डी. पाटील यांचे सोमवारी वार्धक्याने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसायची, तरीही माईंनी औषधोपचार करीत शेवटच्या श्‍वासापर्यंत साथ दिली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने कोल्हापुरातील शिक्षक संघटनांनी एन. डी. पाटील यांचा देशातील सर्वांत ज्येष्ठ शिक्षक म्हणून गौरव केला. त्यावेळी माईंनी जीवन प्रवास उलगडला. पवार-पाटील कुुटुंबीयांमधील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आमच्या घरची त्यावेळेस हलाखीची परिस्थिती होती. पाच भावंडे रयत शिक्षण संस्थेत ‘कमवा शिका’ योजनेतून शिकली. आबा आणि बाईंनी 11 भावंडांच्या मागे कधीही अभ्यासाचा रेटा लावला नाही. त्याकाळी मुलींना घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते, अशा काळात आई टांगा चालवित काटेवाडीला जाऊन काम करून घरी येत. त्यावेळी वडिलांनी साथ दिल्यानेच शक्य झाले. दोघांनी समाजाची पर्वा केली नाही. आईच्या कणखर वृत्तीमुळे आयुष्यात उभे राहता आले. लग्न झाल्यावरही आईने संसारास हातभार लावत बारीकसारीक गोष्टी सांगितल्याचे माईंनी सांगितले.

संबंधित बातम्या

एन. डी. पाटील यांच्यासमवेत लग्नाची गोष्ट सांगताना वाळवा तालुक्यातील प्राध्यापक मुलगा तुमच्या मुलीला काय सांभाळणार? मुलीला एकवेळ विहिरीत ढकला; पण एन.डीं.च्या हातात मुलीचा हात देऊ नका, अशी निनावी पत्रे आल्याने कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. अशा परिस्थितीतही संयमाने घेत साधा संसार कुणीही करील; पण असामान्य माणसाबरोबर राहून माझी मुलगी संसार करील, म्हणत आईने त्यांच्याशी विवाहास संमती दिली, असे त्या आपल्या आठवणींना उजाळा देताना म्हणाल्या.

लग्नानंतर काही वर्षांनी विलेपार्ले येथील चाळीत राहायची वेळ आली. एकेदिवशी आई घरी आली. ‘रडतेस काय? शिकलेली आहेस, चल ऊठ कामाला लाग,’ असे सांगत बी.एड. करायला सांगितले. हे सांगताना सरोज पाटील यांना भावना अनावर झाल्या होत्या. विलेपार्ले येथील शिवाजी हायस्कूलमध्ये 20 वर्षे नोकरी करीत विद्यार्थी घडविले.

त्यातील दोन आमदार, दहा नगरसेवक व अनेक प्रशासकीय अधिकारी बनले आहेत. खा. शरद पवार आणि एन.डी. यांची फारशी भेट होत नसली तरी शरद पवार आस्थेने त्यांची चौकशी करायचे. दोघांचे विचार, मार्ग वेगळे असले तरी समाजासाठी काहीतरी करायचे ही भावना मनात ठेवून जीवन खर्ची घातले. एन. डी. पाटील यांनी संसाराबरोबर समाजकार्य केले. यात आई-वडील, भावडांनी मोलाची साथ दिल्याची भावना सरोज पाटील यांनी व्यक्‍त केली.

Back to top button