महाविकास आघाडी सरकारमध्ये ‘एक सीएम’ आणि ‘चार सुपर सीएम’! | पुढारी

महाविकास आघाडी सरकारमध्ये 'एक सीएम' आणि 'चार सुपर सीएम'!

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये “एक सीएम” आणि बाकीचे “चार सुपर सीएम” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हाणला आहे. राज्यातील १८ जिल्हे अनलॉक होणार याबाबत उडालेल्या गोंधळावर फडणवीस यांनी आज (शुक्रवार) नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना महाविकास आघाडीवर टीका केली. 

अधिक वाचा : महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही विसंवाद नाही : बाळासाहेब थोरात 

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, राज्यात एक मुख्यमंत्री अन बाकीचे चार सुपर मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये निर्णय जाहीर करण्याची चढाओढ लागली असून, घाई झाली आहे असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी केलेल्या राज्य अनलॉकच्या घोषणेनंतर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयाने हा निर्णय विचाराधीन असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर वडेट्टीवार यांनी केलेल्या घोषणेबाबत सारवासारव करून अनलॉकचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील असे स्पष्टीकरण दिले होते. 

अधिक वाचा : अशोक सराफ यांना मामा नाव कसे पडलं? 

यावर फडणवीस यांनी ही टीका केली आहे. दरम्यान पाच टप्प्यात राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्‍याच्या निर्णयावर विजय वडेट्टीवार ठाम आहेत. आज (शुक्रवार) दुपारपर्यंत अनलॉक संदर्भात नोटीफिकेशन निघणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा सांगितले आहे.

Back to top button