दिलीप मोहितेंचा माज शिवसेना उतरवेल : संजय राऊत | पुढारी

दिलीप मोहितेंचा माज शिवसेना उतरवेल : संजय राऊत

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगूनही खेडमध्ये काही घटना वारंवार घडत आहेत. येथील आमदार घाणेरडे राजकारण करीत आहेत. त्यांना कसला माज आहे माहित नाही. शिवसेना तो योग्य वेळी मोडून काढेन अशा कडक शब्दात शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांना इशारा दिला.

खेड पंचायत समितीतील राजकीय घडामोडी, गोळीबार प्रकरण आणि इमारतीच्या जागेचा वाद यावर पत्रकारांशी बोलण्यासाठी खासदार राऊत शुक्रवारी (दि. ४) राजगुरुनगर येथे आले होते. त्यावेळी विविध प्रश्नांवर राऊत यांनी बेधडक मते मांडली.

राज्यात महाआघाडी कायम राहिली तरी मोहितेंच्या विरोधात खेडमधून शिवसेना उमेदवार देणार व त्यांना घरी बसवणार. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीतही खेडसाठी शिवसेना स्वतंत्रपणे उमेदवार देणार असून शिवसेनेने बांगड्या भरलेल्या नाहीत, याची जाण या आमदाराने ठेवावी असेही राऊत यांनी सुनावले.

माजी खासदार, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेतील गटनेते देवीदास दरेकर, सदस्य बाबाजी काळे, अरुण गिरे, अमोल पवार, विजयाताई शिंदे, अशोक खांडेभराड, राहुल गोरे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, विजयसिंह शिंदे पाटील आदी यावेळी उपस्थित  होते.

खेड येथील प्रकरण गंभीर आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी चर्चा केली. त्यावर मत व्यक्त करण्यासाठी मला खेडला जाण्यास सांगण्यात आल्याने मी येथे आलो आहे असे सांगून राऊत म्हणाले, खेड पंचायत समितीच्या इमारतीची स्व. आमदार सुरेश गोरे यांनी निश्चित केलेली जागा बदलण्याचा प्रयत्न, सत्तेत एकत्र असताना सेनेचे पंचायत समिती सदस्य जबरदस्तीने पळवून नेणे व त्यावरून सभापतीवर खोटे गुन्हे दाखल करणे या घटना लहान वाटत असल्या तरी त्याचे राज्यात पडसाद उमटत आहेत. स्व. आमदार गोरे यांनी भावनिकदृष्ट्या जागा व इमारत निश्चित केली होती. त्यांच्या मृत्युनंतर हा वाद सोडून द्यायला हवा होता. मात्र शरद पवारांच्या पक्षात राजकारणात लायक आमदार नसल्याने तसे घडताना दिसत नाही. हा आमदार म्हणजे माणुसकीला काळीमा आहे, अशी टीका खासदार राऊत यांनी आमदार मोहितेंचे नाव टाळून केली.

राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या मुलाने गोळीबार केला, त्याला बुरखा घातला, त्याचे पोलिसांसोबत फोटो काढले नाही. खेड पंचायत समितीच्या सभापतीबाबत मात्र असे हे घडले नाही. येथील आमदाराची वागण्याची तऱ्हाच वेगळी आहे. खेडच्या माध्यमातून पुण्यात वेगळे घडत असेल, अजित पवारांना सांगूनही बदल होत नसेल तर खेड पुरता शिवसेना आपल्या पध्दतीने निर्णय घेईन त्याचे परिणाम काहीही असोत, असे राऊत यांनी सांगितले.

Back to top button