बाळगीत विजेच्या धक्क्याने कर्मचार्‍याचा खांबावरच मृत्यू | पुढारी

बाळगीत विजेच्या धक्क्याने कर्मचार्‍याचा खांबावरच मृत्यू

दक्षिण सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी येथे काम करीत असताना महावितरणच्या कंत्राटी कर्मचार्‍याचा विजेचा धक्‍का लागून खांबावरच दुर्दैवी मृत्यू झाला. अब्दुलगणी बंदगीसाब शेख (वय 33, रा. भंडारकवठे) असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे. 

अब्दुलगणी शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्याच्या महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान ते बाळगी येथे विजेच्या खांबावर काम करीत होते. त्यावेळी अचानक त्यांना विद्युतवाहक तारेचा धक्‍का लागला. हा धक्‍का एवढा जबरदस्त होता की, ते तारेला चिकटून मरण पावले. बाळगी पोलवर ते काम करत असताना आंबेडकरनगर सर्किट आणि बाळगी सर्किट अशा दोन ठिकाणी सर्किट आहेत. 

शेख हे विजेच्या खांबावर काम करीत असताना बाळगी सर्किट बंद होते, तर आंबेडकर नगर सर्किट हे चालूच राहिल्यामुळे त्यांना विजेच्या प्रवाहाचा जोराचा धक्का लागला. त्यातच ते जागीच मरण पावले. या घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शेख यांचा मृतदेह खांबावरून काढून शवविच्छेदनासाठी मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेची मंद्रुप पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली. 

 

Back to top button