Corona Third Wave : तिसरी लाट आल्यास केंद्राची दिवसाला ५ लाख रुग्णांना उपचार देण्याची तयारी | पुढारी

Corona Third Wave : तिसरी लाट आल्यास केंद्राची दिवसाला ५ लाख रुग्णांना उपचार देण्याची तयारी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या ओमायक्रॉन स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आरोग्यविषयक सुविधाही मजबूत केली जात आहे. संभाव्य तिसरी लाट येणार हे गृहीत धरून रुग्णालयांमध्ये बेडस आणि ऑक्सिजन बेडसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली जात आहे. याशिवाय देशात ठिकठिकाणी चार हजार पीएसए ऑक्सीजन संयंत्र स्थापन केले जात आहेत. (Corona Third Wave)

युरोप आणि अमेरिकेत ओमायक्रॉन स्ट्रेनने सध्या धुमाकूळ घातलेला आहे. भारतातही या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या बाराशेच्या पुढे गेली आहे. भविष्यात तिसरी लाट आलीच तर गतवेळसारखी फजिती होऊ नये, यासाठी केंद्र सरकार आतापासून तयारीला लागले आहे.

Corona Third Wave : एका दिवसात पाच लाखांपर्यंत रुग्ण संख्या हाताळण्याची तयारी

त्या दृष्टीने आयुष क्लीनिक बनविण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. दुसरीकडे रेल्वे खात्याकडून कोविड केअर कोच बनवले जात आहेत. एका दिवसात पाच लाखांपर्यंत रुग्ण संख्या हाताळण्याची तयारी सरकार करीत आहे.

रेल्वे मंत्रालयाने ५ हजार ६०१ कोविड केअर कोच तसेच ८९ हजार ५०० बेडसचा विकल्प ठेवला आहे. नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार देशात सध्या ८.३६ लाख बेड संख्या उपलब्ध आहे. याशिवाय कोविड-१९ देखभाल केंद्रांमध्ये सुमारे १० लाख बेड उपलब्ध आहेत.

ऑक्सिजन सुविधा असलेल्या बेडसचा विचार केला तर अशा बेडसची संख्या ४.८६ लाख इतकी आहे. दुसरीकडे आयसीयु बेडसची संख्या १.३५ लाख इतकी आहे. देशात सध्या १२०० पीएसए ऑक्सीजन संयंत्र काम चालू आहेत. जवळपास प्रत्येक जिल्ह्यात हे संयंत्र आहे. तिसऱ्या लाटेवेळी ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी चार हजार पीएसए ऑक्सीजन संयंत्र स्थापन केले जात आहेत.

Back to top button