सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीला धक्का, समान मते पडल्याने झाला टाय, सतीश सावंत पराभूत | पुढारी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीला धक्का, समान मते पडल्याने झाला टाय, सतीश सावंत पराभूत

सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी चुरशीने मतदान झाले. दरम्यान, आज 31 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सिंधुदुर्गनगरी येथे शिक्षक पतपेढी सभागृहात मतमोजणी सुरु आहे. यात महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. त्यांच्या विरोधात राणे गटातील विठ्ठल देसाई होते. दोघांनाही १७-१७ मते पडल्याने टाय झाले. पण चिठ्ठी काढून विठ्ठल देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या 19 जागांपैकी भाजपला ११ तर महाविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत, विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली पराभूत झाले आहेत.

काल झालेल्या मतदानावेळी जिल्ह्यातील एकूण 981 पैकी तब्बल 968 मतदारांनी म्हणजे 98.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 115 महिला व 853 पुरुषांचा समावेश होता.

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या निवडणुकीचा फैसला काय असेल? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.

कुडाळ, दोडामार्ग, मालवण या तीन तालुक्यात 100 टक्के तर वेंगुर्ले तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 94.97 टक्के मतदान झाले होते.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणूक मतमोजणी ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी हॉल मध्ये होत असून या मतमोजणीसाठी जवळपास 60 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : या राजकीय घडामोडींनी गाजले 2021 साल | Rewind 2021

Back to top button