ओमायक्रॉनचा भारताला धोका कमी, फेब्रुवारीपर्यंत सौम्य लाट येऊ शकते : कोव्हिड सुपरमॉडेल पॅनेल | पुढारी

ओमायक्रॉनचा भारताला धोका कमी, फेब्रुवारीपर्यंत सौम्य लाट येऊ शकते : कोव्हिड सुपरमॉडेल पॅनेल

पुढारी ऑनलाईन डेस्क

जगभरात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. ब्रिटनमध्येही वाढत्या रुग्णसंख्येने चिंता निर्माण झालीय. पण भारताला कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका कमी आहे. तरीही फेब्रुवारीपर्यंत सौम्य स्वरुपाची लाट येऊ शकते, असा अंदाज नॅशनल कोव्हिड १९ सुपरमॉडेल समितीने व्यक्त केला आहे.

ब्रिटनमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. पण याबाबत ब्रिटनच्या मॉडेलचा संबंध भारताशी लावू शकत नाही, असे नॅशनल कोव्हिड १९ सुपरमॉडेल समितीचे प्रमुख एम विद्यासागर यांनी म्हटले आहे. एम विद्यासागर हे हैदराबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)चे प्रोफेसर आहेत.

दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे ब्रिटनमध्ये कमी सेरो पॉझिटिव्हिटी आहे आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. भारताकडे हे दोन्हीही आहे. यामुळे भारताला ओमायक्रॉनचा धोका कमी आहे. ब्रिटनमध्ये mRNA vaccines ही लस मोठ्या प्रमाणात घेण्यात आली आहे. यामुळे अल्प कालावधीसाठी संरक्षण मिळते असे दिसते. पण भारतात या लसीचा वापर करण्यात आलेला नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.

सेरो पॉझिटिव्हिटी कमी असणे म्हणजे नैसर्गिक संसर्गामुळे कमी संसर्ग होणे. प्रोफेसर विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या नॅशनल कोव्हिड १९ सुपरमॉडेल समितीमध्ये आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल आणि आर्मी मेडिकल सर्व्हिसचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचाही समावेश आहे. कोरोना काळात मोदी सरकारने या समितीची स्थापना केली होती.

भारतात ओमायक्रॉनचा संसर्ग सुरु झाल्यानंतर समितीच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या ताज्या अंदाजानुसार, देशात जानेवारीमध्ये रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या अखेरीस पीक येऊ शकतो. पण याबाबतची माहिती त्यांनी सरकारला दिलेली नाही. केवळ वैयक्तिक स्तरावर ओमायक्रॉन स्थितीबाबत त्यांनी भाष्य केले आहे. या समितीची शेवटची बैठक सप्टेंबर २०२० मध्ये झाली होती.

समितीचे सदस्य मनिंद्र अग्रवाल यांनी, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन आणि डेन्मार्कमधून आलेल्या डाटाच्या मुल्याकनांच्या आधारे जानेवारीमध्ये रुग्णसंख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस पीक येऊ शकतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी जेवढे बाधितांचे प्रमाण अधिक होते तेवढे प्रमाण यावेळी असणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. हा तात्पुरत्या स्वरुपाचा अंदाज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Omicron Corona जाणून घ्या सर्व माहिती? डॉ. रमण गंगाखेडकर | All you need to know about Omicron Corona

Back to top button