ओमायक्रॉन व्हेरियंटचा वेग वाढला; एका दिवसांत ‘इतके’ रुग्ण | पुढारी

ओमायक्रॉन व्हेरियंटचा वेग वाढला; एका दिवसांत ‘इतके’ रुग्ण

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : भारतात ओमायक्रॉनचा धोका वाढत असून एका दिवसात १४ रुग्ण आढळले आहेत. (ओमायक्रॉन रुग्ण) ओमायक्रॉनचा पसरण्याचा वेग प्रचंड असून सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण आहेत.

गुरुवारी एकाच दिवशी १४ नवीन रुग्ण सापडले असून दिल्लीत ४, गुजरातमध्ये १, तेलंगणमध्ये ४ आणि कर्नाटकमध्ये ५ नवे रुग्ण आढळले.

भारतात ओमायक्रॉनचे पहिले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळले होते. गुरुवारी एका दिवसात कर्नाटकात सर्वाधिक पाच रुग्ण आढळले आहेत. यात ४ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर के. यांनी याबाबत माहिती दिली.

ब्रिटनमधून आलेल्या १९ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. अन्य एक ३३ वर्षीय बाधित व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून आली आहे. नायजेरियातून आलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीही ओमायक्रॉनी लागण झाली आहे.

तेलंगणामध्येही गुरुवारी हैदराबादमध्ये ४ नवीन ओमायक्रॉन बाधितांची भर पडली. याआधी तेथे दोन रुग्ण सापडले आहेत. राजधानी दिल्लीत ४ नवे रुग्ण सापडले आहेत. याआधी दिल्लीत ५ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली होती. गुजरातमधील विजापूर येथे एका महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली. या महिलेचा एक नातेवाईक झिम्बाब्वे येथून परतला होता व एका अंत्ययात्रेत त्याची भेट झाली होती. त्याच्यामुळे तिला लागन झाली आहे. त्याच्या संपर्कातील अन्य व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

या राज्यात आहेत इतके रुग्ण :

महाराष्ट्र : ३२, राजस्थान : १७, दिल्ली : १०, गुजरात : ५, कर्नाटक : ८, तेलंगणा : ६, केरळ : ५, आंध्र प्रदेश: १, चंदीगड : १, पश्चिम बंगाल : १, तामिळनाडू : १.

‍ओमायक्रॉन व्हेरियंट हवेतून वेगाने पसरतो

जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची धास्ती आहे. याआधी डेल्टा व्हेरियंट वेगाने पसरला होता. डेल्टाचा फुफ्फुसावर होणारा संसर्ग अधिक होता. यामुळे दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक होते. आता कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिंयंटबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट हवेतून वेगाने पसरतो पण फुफ्फुसाला संसर्ग होण्याचा धोका कमी आहे, असे एका प्राथमिक स्वरुपातील संशोधनातून आढळून आले आहे.

हाँगकाँग विद्यापीठाने जारी केलेल्या एका वृत्तात, अभ्यास करणाऱ्या पथकाचे प्रमुख डॉ. मायकेल चॅन ची-वाई यांनी म्हटले आहे, “मानवांमध्ये रोगाची तीव्रता केवळ विषाणूंच्या प्रतिकृतीद्वारे निश्चित केली जात नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या संक्रमणास दिल्या जाणाऱ्या रोगप्रतिकारक प्रतिसादावर निश्चित केली जाते. संसर्ग हा कधीकधी जीवघेणा ठरतो.”

हेही वाचा : 

Back to top button