मंगळाच्या दरीतील जमिनीखाली पाण्याचे अस्तित्व | पुढारी

मंगळाच्या दरीतील जमिनीखाली पाण्याचे अस्तित्व

पॅरिस : मंगळ ग्रहावर मानवी वसाहत स्थापन करण्याची स्वप्ने पाहणार्‍यांसाठी आता एक खूशखबर आली आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे की मंगळावरील विशाल दरीत जमिनीखाली मोठ्या प्रमाणात पाण्याचे संकेत मिळाले आहेत. ‘एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटर’ने या पाण्याचा छडा लावला आहे. वल्लेस मरीनर्स नावाच्या ठिकाणी पृष्ठभागापासून अवघ्या तीन फूट खोलीवर पाण्याचा हा खजिना आहे!

वल्लेस मरिनर्स ही मंगळावरील एक विशाल दरी असून ती 3862 किलोमीटर परिसरात फैलावलेली आहे. तेथील पाण्याने भरलेला परिसर आकाराने नेदरलँडइतका आहे. तो कँडोर चाओस दरीचा एक भाग आहे. संशोधक अ‍ॅलेक्सी मलाखोव यांनी म्हटले आहे की वल्लेस मरिनर्सचा मध्यवर्ती भाग पाण्याने पूर्णपणे भरलेला असल्याचे आम्हाला आढळले आहे. हे पाणी आमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक प्रमाणात आहे.

पृथ्वीवर ज्याप्रमाणे अनेक भाग बर्फाने आच्छादित असतात व त्याच्या स्तराखाली पाणी असते, तसाच हा भाग आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने 2006 मध्येही मंगळावर पाण्याचे पुरावे सापडले असल्याचे म्हटले होते. त्यावेळी ‘नासा’ने काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली होती. मंगळावर द्रवरूप पाण्याचे अस्तित्व असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

31 जुलै 2008 मध्ये ‘नासा’च्याच फिनिक्स मार्स लँडरनेही मंगळावर पाण्याचा बर्फ असल्याची पुष्टी केली होती. त्यामध्ये पृथ्वीवरील पाण्यात आढळणारेच घटक असल्याचेही दिसून आले होते. मंगळावर अनेक खोरे व नद्यांच्या पात्राच्या खुणा आढळतात. त्यावरून एकेकाळी तिथे वाहते पाणी होते हे स्पष्ट होते.

Back to top button