महाकाय कृष्णविवराभोवती फिरणारे तारे झाले कॅमेराबद्ध | पुढारी

महाकाय कृष्णविवराभोवती फिरणारे तारे झाले कॅमेराबद्ध

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या ‘मिल्की वे’ आकाशगंगेच्या महाकाय कृष्णविवराभोवती फिरत असलेल्या तार्‍यांचा शोध लावला आहे. अशा तार्‍यांना प्रथमच कॅमेराबद्ध करण्यातही यश आले आहे. एखाद्या कृष्णविवराच्या इतक्या जवळून फिरत असलेले तारे दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचा व्हिडीओ 2021 च्या प्रारंभीच टिपण्यात आला होता जो यूरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीने (ईएसओ) आता प्रसिद्ध केला आहे.

या व्हिडीओमध्ये अनेक तारे ‘सॅजिटेरियस ए’ कृष्णविवराभोवती आपल्या कक्षेत फिरत असल्याचे दिसून येते. त्यांना कॅमेर्‍यात टिपून घेण्यासाठी उत्तर चिलीतील अटाकामा वाळवंटातील व्हेरी लार्ज टेलिस्कोपचा वापर केला गेला. या द़ृश्याला कॅमेराबद्ध करण्यासाठी टेलिस्कोपच्या लेन्सला आधीपेक्षा वीस पटीने अधिक झूम करावे लागले. या कृष्णविवराजवळ एका अशा तार्‍याचा शोध घेण्यात आला जो यापूर्वी कधीही दिसला नव्हता.

संशोधकांनी या तार्‍याला ‘एस 300’ असे नाव दिले आहे. या कृष्णविवराचे द्रव्यमान सूर्याच्या तुलनेत सुमारे 43 लाख पटीने अधिक आहे. या कृष्णविवराच्या द्रव्यमानाचे आतापर्यंतचे सर्वात अचूक अनुमान आहे. हे कृष्णविवर पृथ्वीपासून सुमारे 27 हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहे.

Back to top button