Kota Student News: कोटा येथील विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर राजस्‍थान सरकारने घेतला मोठा निर्णय | पुढारी

Kota Student News: कोटा येथील विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर राजस्‍थान सरकारने घेतला मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंजिनिअर आणि डॉक्टर बनण्याच्या इच्छेखातर उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रासह देशभरातून अनेक विद्यार्थी राजस्थानच्या कोटा येथे मोठ्या आशेने येतात. येथे नीट, आयआयटी आणि इतर परीक्षांची तयारी करू लागतात. काही कालावधी गेल्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी येते. गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यात विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले आहे. (Kota Student News) रविवार दि. २७ ऑगस्‍ट राेजी काेटा येथे आणखी दाेन  विद्यार्थ्यांनी जीवन संपविल्‍याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गेल्या आठ महिन्यांत कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आलेल्या २३ मुलांनी अभ्यासाच्या तणावामुळे  मृत्यूला जवळ केले आहे. ऑगस्ट आणि जून महिन्यात सर्वाधिक ७ मुलांचा मृत्यू झाला आहे. जुलैमध्ये २  तर  मे महिन्यात ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
या वाढत्या घटनांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने अनेक पावले उचलूनही या घटना कमी झालेल्या नाहीत. आता सरकारने मुलांच्या मानसिक आरोग्याचे कारण देत कोचिंग संस्थांच्या परीक्षांवर दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी कोटा येथे कार्यरत असलेल्या सर्व कोचिंग संस्थांच्या परीक्षांवर पुढील दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. (Kota Student News)

Kota Student News : सीएम गेहलोत यांनी केली समिती स्थापन

ऑगस्‍ट महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली होती. या प्रकरणांच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली होती. ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे.

…अन्यथा कोचिंग माफियांवर राजस्थान काँग्रेस कारवाई करेल

राजस्थानचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास म्हणाले की, राजस्थानमधील कोचिंग संस्था चालकाकडे खूप पैसा आहे, परंतु ते त्या आधारावर विद्यार्थ्यांना धमकी देऊ शकत नाहीत. मी पालकांना सांगेन की त्यांची मुले कोचिंगमुळे यशस्वी होत नाहीत तर ते आधीच हुशार आहेत. कोचिंग संस्था चालक विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आणत आहेत. सरकारने या कोचिंग माफियांविरुद्ध कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी एसपी आणि कलेक्टर यांना दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करावी अन्यथा राजस्थान काँग्रेस कारवाई करेल, असा इशारा खाचरियावास यांनी दिला.

दरम्यान,  राजस्थानमधील कोटा येथे नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याने कोचिंग इन्स्टि्टयूटच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले. ही घटना रविवारी घडली. अविष्कार संभाजी कासले (रा.उजना, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अविष्कारचे पार्थिव गावी आणण्यासाठी त्याचे पालक व नातेवाईक कोट्यास रवाना झाले आहेत. या घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. परंतु, चाचणी परीक्षेत कमी गुण पडल्याने आलेल्या नैराश्यातून अविष्कारने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

 

हेही वाचा 

Back to top button