Delhi Bomb Threat : दिल्लीतील १०० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी | पुढारी

Delhi Bomb Threat : दिल्लीतील १०० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरातील जवळपास १०० शाळांना बॉंबने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धमकी एकाच ई-मेलवरून पाठवण्यात आली होती. धमकीचा हा ई-मेल बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास शाळांना पाठवण्यात आला. पोलिसांच्या तपासानंतर मिळालेल्या माहितीनूसार हा ई-मेल बनावट असल्याचे सांगितले.

जवळपास १०० शाळांना बॉंबने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांसह बॉम्बशोधक पथक, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने सर्व शाळांमध्ये पोहोचवण्यात आल्या होत्या. सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र पालकांना ही माहिती समजल्यानंतर काही काळ पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
धमकी मिळाल्यानंतर शाळांनी सर्वप्रथम पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांच्या सायबर सेलने मेल ट्रॅक करण्यासाठी काही पथके तैनात केली. त्यांनतर सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्यात आले आणि शाळा रिकामी करून मुलांना घरी पाठवण्यात आले. दरम्यान, सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात असून पालकांनी काळजी करू नये, असा सल्ला पोलिस आणि प्रशासनाने दिला. काही पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, ते बस स्टॉपवर असताना मेसेज आला की शाळेला सुट्टी आहे. काहींना शाळेत गेल्यावर सुट्टी असल्याचे कळले.

 मागील वर्षीही शाळांना धमकी

गेल्या वर्षी दिल्लीतील चार शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. मथुरा रोडवरील दिल्ली पब्लिक स्कुलला बॉम्बची धमकी मिळाली होती. नंतर ती खोटी धमकी असल्याचे निष्पन्न झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button