नेमकी निवडणुकीच्या आधीच केजरीवालांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाचा ईडीवर प्रश्नांचा भडिमार | पुढारी

नेमकी निवडणुकीच्या आधीच केजरीवालांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाचा ईडीवर प्रश्नांचा भडिमार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नेमकी निवडणूक जाहीर होण्याआधीच अरविंद केजरीवाल यांना अटक का करण्यात आली, तपास आणि अटक यात इतका मोठा कालावधी कसा, असे प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला विचारले. या प्रश्नांना शुक्रवारी उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात करण्यात आलेल्या अटकेला केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याची सुनावणी न्या. संजीव खन्ना, न्या. दीपांकर दत्ता यांच्यासमोर झाली. सुनावणीदरम्यान न्या. खन्ना यांनी केजरीवाल यांच्या अटकेच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणात आतापर्यंत कोणतीही जप्तीची कारवाई करण्यात आलेली नाही आणि ती जर झाली असती तर केजरीवाल यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे दिसले असते. मग निवडणुकीच्या नेमके काही दिवस आधी अटक का करण्यात आली? आयुष्य आणि स्वातंत्र्य या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे कोर्टाने नमूद केले. तपासाची प्रक्रिया संपल्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यासाठी एवढा विलंब का झाला, अशी विचारणा न्यायालयाने केली. या प्रश्नांची उत्तरे शुक्रवारी देण्यास न्यायालयाने ईडीला सांगितले आहे.

Back to top button