यंदा मान्सून सामान्य; महाराष्ट्रासह २३ राज्यांत चांगला पाऊस : स्कायमेट | पुढारी

यंदा मान्सून सामान्य; महाराष्ट्रासह २३ राज्यांत चांगला पाऊस : स्कायमेट

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : यंदा देशात मान्सूनची स्थिती सामान्य राहील. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीएवढा पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तविलेला आहे. मान्सून हंगाम 102 टक्के (5 टक्के अधिक-वजा मार्जिन) असेल, असे म्हटलेले आहे. सरासरीएवढा पाऊस पडणे म्हणजे पर्जन्यस्थिती चांगली असणे, असेच मानले जाते. हवामान विभागाकडूनही 96 ते 104 टक्क्यांदरम्यानच्या पावसाला सरासरीएवढा अथवा समाधानकारक मानले जाते. असा पाऊस पिकांसाठी तसेच पाण्याच्या इतर गरजांसाठी उत्तम मानला जातो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामातील सरासरी 868.6 मि.मी. राहील.

महाराष्ट्रासह 23 राज्यांत चांगला पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटलेले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, लक्षद्वीप या राज्यांचा तसेच केंद्रशासित प्रदेशांचाही त्यात समावेश आहे. बिहारसह चार राज्यांत मात्र यंदाच्या मान्सूनमध्ये कमी पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तविलेला आहे. झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालचा त्यात समावेश आहे. जुलै ते ऑगस्टदरम्यान या राज्यांत पाऊस कमी असेल; पण त्यानंतर येथील पावसाची स्थिती सामान्य असेल, असे स्कायमेटने म्हटले आहे.

अल निनो झपाट्याने ला लिनामध्ये बदलत आहे. हे एक चांगले लक्षण आहे. अल निनोचे ला नीनामध्ये रूपांतर झाल्याने मान्सून चांगला असेल. सुरुवातीला मात्र अल निनोच्या अवशिष्ट प्रभावामुळे थोडा परिणाम जाणवणे शक्य आहे. दुसर्‍या टप्प्यात मात्र उत्तम पाऊस होईल.
स्कायमेटने यावर्षी दुसर्‍यांदा मान्सूनचा अंदाज जारी केला आहे. यापूर्वी 12 जानेवारी 2024 रोजीही स्कायमेटने मान्सून सामान्य राहण्याची शक्यता व्यक्त केली होती.

Back to top button