दोन्ही शिवसेनेसह स्वाभिमानी, वंचितची परीक्षा | पुढारी

दोन्ही शिवसेनेसह स्वाभिमानी, वंचितची परीक्षा

हातकणंगले लोकसभा मतदार संघात सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे कोण कोणाची किती मते खाणार व त्याचा धोका कोणाला, याचीच चर्चा आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फटका बसून लक्षवेधी लढतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पराभव झाला होता. आता शिवसेनेतील फुटीमुळे शिंदे व ठाकरे गटात विभागली जाणारी शिवसेनेची मते शिंदेंबरोबर भाजप व अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंबरोबर काँग्रेस व शरद पवारांचा राष्ट्रवादी, स्वाभिमानीचे एकला चलो रे, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार, असा सगळा राजकीय मामला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चार व सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये पहिल्यांदाच सर्व पक्ष व नेत्यांना दुर्गम असा शाहूवाडी फॅक्टर विचारात घ्यावा लागणार आहे. त्याला जोडूनच सांगलीतील शिराळा व इस्लामपूर हे मतदारसंघ आहेत. त्यामुळे यापूर्वीच्या निवडणुकीत इचलकरंजी शहर व शिरोळ, हातकणंगले मध्यवर्ती चर्चेत असत. आता पहिल्यांदाच शाहूवाडी लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण ठाकरे शिवसेनेने म्हणजेच महाविकास आघाडीने येथून शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना मैदानात उतरविले आहे. त्यांच्यामागे काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादीची ताकद आहे. शिराळा व इस्लामपूरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर शिराळ्याच्या साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद सत्यजित पाटील-सरुडकर यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर यांच्याकडे आहे. त्यामुळे एरव्ही चर्चेतून दूर असणारा हा भाग पहिल्यांदाच चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

शाहूवाडीच्या उमेदवारीने संदर्भ बदलले

एरव्ही इचलकरंजी शहर, शिरोळ व हातकणंगले झाले की हातकणंगले व जुन्या इचलकरंजीची जोडणी झाली, हे समजले जायचे. आता ही परिस्थिती नाही. विद्यमान खासदार शिंदे शिवसेनेचे धैर्यशील माने हातकणंगले तालुक्यातील आहेत. स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे शिरोळमधील आहेत. तर वंचितचे डी. सी. पाटील हे हातकणंगले तालुक्यातील आहेत. त्यामुळे या सर्वांना सत्यजित पाटील यांच्या पन्हाळा-शाहूवाडी मतदार संघासह इस्लामपूर व शिराळ्याकडेच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. सलगचे मतदारसंघ व शिराळा इस्लामपूरचे महाविकास आघाडीचे शरद पवार राष्ट्रवादीचे अनुक्रमे मानसिंग नाईक व जयंत पाटील हे आमदार आहेत. यामुळे एका पट्ट्यात एकवटलेल्या उमेदवारांना शाहूवाडीसह सांगली जिल्ह्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकीच्या समीकरणांची नव्याने मांडणी करणारी ही निवडणूक आहे.

राजकीय बलाबल समसमान, त्यामुळे काटाजोड लढत

पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे असून, त्यांचा पक्ष महायुतीतील घटक पक्ष आहे. हातकणंगलेचे आमदार राजूबाबा आवळे हे काँग्रेसचे आमदार आहेत. इचलकरंजीचे आमदार ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे आहेत. त्यांचा पक्षही महायुतीचा घटक पक्ष आहे, तर शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष असून शिंदे शिवसेनेत ते सहभागी झाले आहेत. महायुती व महाविकास आघाडीचे राजकीय बलाबल समसमान आहे.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

त्याशिवाय इचलकरंजीत ठाकरे शिवसेना कार्यरत आहे. माजी आमदार भाजपचे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आहेत. शाहूवाडी-पन्हाळ्यात गायकवाड गट, पाटील गट, कोरे गट यांची ताकद आहे. शिरोळमध्ये स्वाभिमानीसह ठाकरे व शिंदे शिवसेना, काँगे्रस मजबुतीने उभी आहे. हातकणंगलेत काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना व भाजपची ताकद आहे. तर सांगलीत शरद पवार राष्ट्रवादीबरोबरच महायुतीत महाडिक गटाची ताकद आहे. त्यामुळे लढत काटाजोड आहे. संदर्भ बदलले तरी चुरस कायम आहे. वंचितने गेल्यावेळी शेट्टी यांना संसदेतून शिवारात आणले. आता दोन शिवसेना, स्वाभिमानी व वंचितच्या खेळात बाजी कोणाची, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Back to top button