Gold Loan : नवीन गोल्ड लोन देण्यावर आरबीआयचे निर्बंध | पुढारी

Gold Loan : नवीन गोल्ड लोन देण्यावर आरबीआयचे निर्बंध

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आयआयएफएल फायनान्सवर नवीन गोल्ड लोन देण्यावर निर्बंध घातले आहेत. आयआयएफएलच्या गोल्ड लोन प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

सोन्याचे मूल्य आणि कर्जाची रक्कम यांच्यातील तफावत, आरबीआयने घालून दिलेल्या नियामक मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम वितरित करणे, सोन्याच्या लिलाव प्रक्रियेतील अनियमितता आणि ग्राहकांच्या खात्यांवर लागू केलेल्या शुल्काबाबत पारदर्शकतेची कमतरता आढळून आल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे. या त्रुटी केवळ प्रक्रिया आणि नियमांचे उल्लंघन करत नाहीत तर त्यामुळे ग्राहकांच्या हितावर अनिष्ट परिणाम होत आहे. आरबीआयने गेल्या काही महिन्यांपासून आयआयएफएलचे व्यवस्थापन आणि लेखा परीक्षणाची माहीती घेतली. त्या माहितीच्या आधारे सुवर्ण कर्ज पोर्टफोलिओमध्ये आढळलेल्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या त्रुटी गंभीर असल्याने आरबीआयने आयआयएफएलला नवीन गोल्ड लोन देण्यावर तत्काळ बंदी घालून कंपनीच्या आर्थिक स्थितीचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

या कारवाईचे परिणाम आयआयएफएल आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. नवीन सुवर्ण कर्जे थांबवल्यामुळे आयआयएफएलला आर्थिक तोटा सहन करावा लागेल आणि विशेष लेखापरीक्षणात आढळलेल्या समस्या सुधारण्याशी संबंधित खर्चही करावा लागेल. विद्यमान आयआयएफएल गोल्ड लोन ग्राहकांना त्यांच्या कर्जावरील व्याज दर किंवा ईएमआयमध्ये (समान मासिक हप्ता) वाढ होऊ शकते.

Back to top button