Gobi Manchurian | म्हपसात गोबी मंचुरियनवर बंदी..! नगर परिषदेने 'या' कारणाने घेतला निर्णय | पुढारी

Gobi Manchurian | म्हपसात गोबी मंचुरियनवर बंदी..! नगर परिषदेने 'या' कारणाने घेतला निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोव्यातील म्हपसा शहरात स्टॉलवर आणि मेजवाण्यांत गोबी मंचुरियनवर बंदी घालण्यात आली आहे. गोबी मंचुरियनमध्ये कृत्रिम रंगाचा वापर केला जातो आणि स्टॉलवर पुरेशी स्वच्छता नसेल या कारणांमुळे ही बंदी घालण्यात आलेली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी दिली. (Gobi Manchurian)

“विक्रेते गोबी मंचुरियन बनवण्यासाठी कृत्रिम रंगाचा वापर करतात, तसेच स्वच्छेतीची काळजी घेतली जात नाही, अशी तक्रार नगरसेवकांनी केली होती. या तक्रारींच्या आधारे शहरात गोबी मंचुरियनच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे,” असे नगराध्यक्षा प्रिया मिशाळ म्हणाल्या. (Gobi Manchurian)


गोबी मंचुरियन बनवणारे स्टॉलधारक दर्शनी भागात चांगल्या प्रकारच्या सॉसच्या बाटल्या ठेवतात, पण प्रत्यक्षात गोबी मंचुरियन बनवताना मात्र कमी दर्जाचे सॉस वापरले जातात. तसेच गोबीला कुरकुरीतपणा आणण्यासाठीही विशिष्ट प्रकारची पॉवडर वापरली जाते, अशी माहिती एका अधिकाऱ्यांने दिल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले आहे.

यापूर्वीही झाले होते बंदीचे प्रयत्न

श्री देव बोडगेश्वर देवस्थान समितीने गेल्या वर्षीही गोबी मंचुरियन स्टॉल्स ना परवानगी देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले होते परंतु गोबी मंचूरियनचे स्टॉल थाटण्यात आले होते आणि नगरपालिकेनेही त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. यावर्षी पुन्हा देवस्थान समितीने गोबी मंचुरियन स्टॉल्सना परवानगी दिली. नगरपालिका त्यावर जी कारवाई करेल त्यास देवस्थान समितीची कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे म्हापसा नगरपालिकेने ठराव घेऊन गोबी मंचुरियन चे स्टॉल्स बंद पडले होते.

गेल्या वर्षी म्हापसा नगरपालिकेने मिलाग्रीस फेस्ताच्या वेळीही गोबी मंचुरियन स्टॉल्सना परवानगी नाकारली होती. उघड्यावर करण्यात येणारे गोबी मंचुरियन आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतात तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ ही घातक असतात असा निष्कर्ष अन्न व आरोग्य खात्याने दिलेला असल्याने या पदार्थाच्या विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी सतत होत असते. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या गोबी मंचुरियनपेक्षा जत्रा व फेरीतून मिळणारे गोबी मंचुरियन स्वस्तअसल्यामुळे युवक युवती या पदार्थाकडे आकर्षिले जातात.

गोबी मंचुरियन भारतात कसे आले? Gobi Manchurian

1975ला क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये नेल्सन वँग यांनी सर्वप्रथम चिकन मंचुरियन बनवले. त्यांनी कॉर्न फ्लॉवर, सोया सॉस, व्हिनेगर, टोमॅटो सॉस, साखर यांचा वापर करून चिकन मंचुरियन बनवले होते. चिकन मंचुरियनचा शाकाहारी अवतार म्हणजे गोबी मंचुरियन होय.

हेही वाचा

Back to top button