Stock Market performed on Budget | बजेटवर शेअर बाजाराने ‘कसा’ दिला प्रतिसाद, कोणते शेअर्स वधारले? | पुढारी

Stock Market performed on Budget | बजेटवर शेअर बाजाराने 'कसा' दिला प्रतिसाद, कोणते शेअर्स वधारले?

पुढारी ऑनलाईन : एकीकडे संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना दुसरीकडे शेअर बाजाराने चढ-उतार दिसून आला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ७२,१०० वर गेला. त्यानंतर सेन्सेक्स ७२ हजारांच्या खाली येऊन सपाट पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी २१,७०० च्या वर आहे. (Stock Market performed on Budget)

ऑटो, एफएमसीजी आणि एनर्जी शेअर्समध्ये खरेदी तर फार्मा, पीएसयू बँका आणि मेटल शेअर्समधील तोट्याने नफा मर्यादित केला.

सेन्सेक्सवर मारुती, पॉवर ग्रिड हे शेअर्स प्रत्येकी ४ टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर एनटीपीसी, टीसीएस, एम अँड एम, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्सही वाढले. तर बजाज फायनान्स, एलटी, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, विप्रो हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर पॉवरग्रिड, मारुती, एनटीपीसी, एम अँड एम, सिप्ला हे टॉप गेनर्स आहेत. तर डॉ. रेड्डीज, LTIMINDTREE, ग्रासीम, बजाज फायनान्स हे टॉप लूजर्स आहेत.

गेल्या १० वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत खूप मोठे परिवर्तन झाले आहे. २०१४ मध्ये देशासमोर मोठी आव्हाने होती. पण सरकारने त्या आव्हानांवर मात करून संरचनात्मक सुधारणा केल्या. लोकानुकूल सुधारणा हाती घेतल्या. नोकऱ्या आणि उद्योजकतेसाठी वातावरण तयार झाले. विकासाची फळे मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचू लागली. देशाला नवीन उद्देश आणि आशेची जाणीव झाली, असे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या.

“आम्ही गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे; त्यांच्या गरजा आणि आकांक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले आहे.

यूएस फेडकडून सलग चौथ्यांदा व्याजदर जैसे थे

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीने बुधवारी व्याजदर ५.२५-५.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यूएस फेडने सलग चौथ्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की मार्चच्या सुरुवातीला व्याजदरात कपात होण्याची शक्यता नाही. पण त्यांनी हेदेखील कबूल केले की पतधोरण समितीतील प्रत्येकाचा यावर्षी कपात करण्याकडे कल दिसत आहे. “महागाई अजूनही खूप जास्त आहे. ती कमी होईल की नाही याबाबत निश्चित काही सांगू शकत नाही,” असे पॉवेल यांनी फेडच्या पतधोरण-निर्धारण समितीने बेंचमार्क ५.२५-५.५० टक्क्यांच्या श्रेणीत व्याजदर ठेवल्यानंतर आणि व्याजदर कपात योग्य होणार नाही असे जाहीर केल्यानंतर सांगितले.

अमेरिकेसह आशियाई बाजारात घसरण

फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याचे संकेत दिल्यानंतर गुंतवणूकदारांची निराशा झाली. परिणामी बुधवारी अमेरिकेतील बाजारात घसरण झाली. फेडच्या निर्णयानंतर अमेरिकेसह आशियाई बाजारातही घसरण दिसून आली. एमएससीआयचा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक ०.३ टक्क्यांनी घसरला. जपानचा निक्केई ०.५ टक्क्यांनी कमी झाला, तर दक्षिण कोरियाच्या कोस्पीने ०.७ टक्क्याने उसळी घेतली. कारण १९ महिन्यांत प्रथमच कारखान्यांची उलाढाल वाढत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. चिनीचा ब्लू चिप्स ०.४ टक्क्यांनी खाली आला.

हे ही वाचा :

२०४७ पर्य़ंत भारत विकसित देश होणार – निर्मला सीतारामन

अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर

 

 

Back to top button