Interim Budget 2024 | अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर, मोरारजीभाईंच्या विक्रमाशी बरोबरी, मनमोहन सिंग यांनाही मागे टाकले | पुढारी

Interim Budget 2024 | अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर, मोरारजीभाईंच्या विक्रमाशी बरोबरी, मनमोहन सिंग यांनाही मागे टाकले

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज गुरुवारी (दि. १ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर केला. निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करत माजी अर्थमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्या सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. सीतारामन यांनी याआधी सलग ५ पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. सहाव्यांदा त्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामुळे सीतारामन यांनी माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी. चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांनाही मागे टाकले. (Interim Budget 2024)

या नेत्यांनी सलग ५ अर्थसंकल्प सादर केले होते. मोरारजीभाई देसाई यांनी १९५९-१९६४ दरम्यान ५ वार्षिक आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. पुढेही देसाई अर्थमंत्री झाले होते आणि त्यांच्या नावावर सर्वाधिक १० अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांपर्यंत म्हणजे आणखी ५ महिने हे सरकार काम करेल. अशा स्थितीत अर्थमंत्री वर्षभराचा अर्थसंकल्प तयार करू शकत नाहीत. या काही महिन्यांसाठीचेच बजेट त्या सादर करतील. नवे सरकार जून-जुलैमध्ये संपूर्ण अर्थसंकल्प सादर करेल.

देशाचा अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या संपूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असतो. पैसा कोठून येणार आणि सरकार तो कुठे व कसा खर्च करणार याचा हा एक आराखडा असतो. वार्षिक आर्थिक विवरण असेही त्याला म्हणतात. अंतरिम अर्थसंकल्प मात्र सध्याच्या सरकारला नवीन सरकार येईपर्यंत आणि पूर्ण अर्थसंकल्प सादर होईपर्यंत देश चालवण्यासाठी पैसे पुरवतो.

बॅगऐवजी वहीखाते आणण्याची प्रथा

ब्रिटिश काळात अर्थमंत्री सगळ्या खात्यांचा लेखाजोखा एका चामडी पिशवीत आणायचे. या पिशवीला फ्रेंचमध्ये बुगेट आणि इंग्रजीत बजेट असे म्हणतात. अशाप्रकारे या पिशवीचेच नाव अर्थसंकल्पासाठी पुढे रूढ झाले.

निर्मला सीतारामन यांनी मात्र चामड्याच्या बॅगऐवजी वहीखाते आणण्याची प्रथा सुरू केली. चामड्याची बॅग ही इंग्रजांची परंपरा होती. वहीखाते ही भारतीय परंपरा आहे. माझ्या आईनेच मला राजमुद्रेसह नव्या पिशवीचे डिझाईन तयार करून दिले, असेही सीतारामन म्हणाल्या होत्या.

हे ही वाचा :

बजेटपूर्वी बाजारात उत्साह! गुंतवणूकदारांना ४.६२ लाख कोटींचा फायदा

अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताची हमी..? जाणून घ्या याविषयी अधिक

 

Back to top button