‘इंडिया’ आघाडीला धक्‍का, चंदीगडमध्‍ये भाजपचाच महापौर | पुढारी

'इंडिया' आघाडीला धक्‍का, चंदीगडमध्‍ये भाजपचाच महापौर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भाजपविरोधातील इंडिया आघाडीची पहिली लढाई अशी ओळख झालेल्‍या चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह आघाडीकडे एकूण 20 मते होती. विजयासाठी १९ मतांची आवश्‍यकता होती. भाजपचे मनोज सोनकर यांची महापौरपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपला १६ मते मिळाली आहे. आप आणि काँग्रसला १२ मते मिळाली. तर आठ मते अवैध ठरली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ( Chandigarh Mayor Election Results 2024 )

पीठासीन अधिकाऱ्यावर मतांमध्‍ये फेरफार केल्‍याचा आरोप

पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी मतांमध्ये फेरफार केल्‍याचा आरोप आप आणि काँग्रेसने केला आहे. व्हिडीओमध्ये अनिल मसिह अनेक मतांवर पेन वापरताना दिसत असल्याचा आरोप काँग्रेस आणि आपचे नगरसेवक करत आहेत. याचा पुरावाही व्हिडिओमध्ये आहे, असा दावा त्‍यांनी केल्‍याने एकच गदारोळ माजला. यामुळे सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. ( Chandigarh Mayor Election Results 2024 )

इंडिया आघाडी पहिलीच निवडणूक हरली : भाजप अध्‍यक्ष जेपी नड्डा

इंडिया आघाडीने भाजपविरोधात लढवलेली ही पहिलीच निवडणूक होतीती. चंदीगडचा भाजपने चौफेर विकास केला आहे. त्‍यामुळेच आज इंडिया आघाडीला भाजपकडून पराभव पत्‍करावा लागला आहे. याचा अर्थ राजकारणात अंकगणित आणि रसायनशास्‍त्र काम करत नाही हे स्‍पष्‍ट झाले आहे, अशा शब्‍दांमध्‍ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या निवडणूक निकालावर आपली प्रतिक्रिया दिली.
( Chandigarh Mayor Election Results 2024 )

आप-काँग्रेसचे उमेदवार कुलदीप टीटा यांना अश्रू अनावर

चंदीगड महापौर निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचे उमेदवार कुलदीप टीटा होतो. मनोज सोनकर यांची महापौरपदी निवड झाल्‍यानंतर या पराभवामुळे कुलदीप टीटा यांना अश्रू अनावर झाले. ते धाय माकलून रडले.

आप आणि काँग्रेस नेते राज्‍यपालांची भेट घेणार

राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासह चंदीगडचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते पवनकुमार बन्सल आज दुपारी राज्‍यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेणार आहे. चंदीगड महापौर निवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेतील नियमांच्या उल्लंघन झाल्‍याची तक्रारी ते या भेटीत करणार आहेत.

उच्‍च न्‍यायालयात दाद मागणार : आम

पराभवामुळे संतप्त झालेल्या आम आदमी पार्टीचे नगरसेवक प्रेमलता यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. आज भाजप फसवणुकीने जिंकला आहे. माझ्या हातातून मतपत्रिका हिसकावून घेतली. आठ मते अवैध कशी होऊ शकतात, असा सवालही त्‍यांनी केला.

 

 

Back to top button